दिवाळखोरीत गेलेल्या FTX ने आता हॅकर्सने हिसका दाखवला आहे. FTX च्या इंटरनॅशनल एक्सचेंज खात्यातून 323 मिलियन डॉलर्स आणि अमेरिकेन एक्सचेंजच्या खात्यातून 90 मिलियन असे एकूण 415 मिलियन डॉलर्सचे क्रिप्टो चलनांवर हॅकर्सने डल्ला मारला आहे. या सायबर हल्ल्यात FTX कडील उरलीसुरली रक्कम देखील चोरीला गेल्याचे कंपनीने म्हटले आहे.
गेल्याच आठवड्याच FTX ने दिवाळखोरीसंदर्भातील न्यायालयात मोठी अपडेट दिली होती. कंपनीने माजी सीईओ आणि संस्थापक सॅम बँकमन फ्रेड याने केलेल्या घोटाळ्यातून सावरली होती. FTX ने जवळपास 5 बिलियन डॉलर्स मूल्याची मालमत्ता वसूल केली होती. त्यात 3.5 बिलियन डॉलर्सचे क्रिप्टो करन्सी वसूल करण्यात आल्याची माहिती FTX कडून न्यायालयाला देण्यात आली होती.
मात्र आता हॅकर्सने जवळपास 415 मिलियन डॉलर्सची चोरी गेल्याने FTX व्यवस्थापनाला प्रचंड धक्का बसला आहे. सॅम बँकमन फ्रेड याने FTX मध्ये लाखो डॉलर्सची अफरातफर केली होती. अल्मेडा रिसर्च या कंपनीशी संगनमत करुन सॅम बॅंकमन फ्रेड यांने FTX मधील लाखो डॉलर्सचा गैरवापर केला. ज्यामुळे FTX ची आर्थिक स्थिती डबघाईला आली. कंपनीवर दिवाळखोरीची नामुष्की ओढवली होती. हा घोटाळा समोर येण्यापूर्वी जगभरातील क्रिप्टो मार्केटमध्ये सॅम बँकमन फ्रेड हा एक हाय प्रोफाईल गुंतवणूकदार आणि उद्योजक म्हणून ओळखला जात होता. डिसेंबर महिन्यात सॅम बँकमन फ्रेड यांना बहामाजमधून अटक करण्यात आली. त्याचे अमेरिकेकडे प्रत्यार्पण करण्यात आले होते. त्यानंतर 250 मिलियन डॉलर्सच्या हमीवर त्याला जामीन देण्यात आला होता.
वर्षभरापूर्वी FTX चे बाजार मूल्य तब्बल 32 बिलियन डॉलर्स इतके होते. मात्र आर्थिक घोटाळ्यांनी FTX संकटात सापडली. 11 नोव्हेंबर 2022 रोजी FTX ने दिवाळखोरीसाठी अर्ज केला होता.