2022 वर्ष भारतातील सेवा क्षेत्रासाठी चांगले गेल्याचे नुकत्याच हाती आलेल्या आकडेवारीतून दिसून येत आहे. कोरोनामुळे दोन वर्ष सेवा आणि पर्यटन क्षेत्राची वाढ खुंटली होती. मात्र, कोरोना साथ ओसरल्यानंतर 2022 ला पर्यटकांचे लोंढे भारतामध्ये दाखल होऊ लागले. 2021 वर्षाच्या तुलनेत 2022 मध्ये भारतात येणाऱ्या पर्यटकांची संख्या तब्बल 300 टक्क्यांनी वाढली.
2021 वर्षात भारतात सुमारे 15 लाख पर्यटक आले होते. त्या तुलनेत 2022 मध्ये सुमारे 62 लाख परदेशी पर्यटकांनी भेट दिली. सेवा क्षेत्राला याचा मोठा फायदा झाला. हॉटेल, विमान, पर्यटन स्थळे, ट्रॅव्हल क्षेत्रातील कंपन्यांना फायदा झाला. ही आकडेवारी केंद्र सरकारच्या ब्युरो ऑफ इमिग्रेशनने जाहीर केली आहे. केंद्रीय पर्यटन मंत्री जी. किशन रेड्डी यांनी राज्यसभेमध्ये एका प्रश्नाला उत्तर देताना म्हटले की, "कोरोनंतर पर्यटन क्षेत्रातील वाढीचे संकेत मिळत आहेत. कोरोनानंतर पर्यटन पुन्हा उभारी घेत आहे".
कोरोनापूर्व आकडेवारी गाठली नाही
दरम्यान, 2022 सालातील पर्यटकांची आकडेवारी दिलासादायक असली तरी कोरोनापूर्व काळातील पर्यटकांची संख्या अद्याप गाठलेली नाही. 2019 साली म्हणजेच देशात कोरोनाचा फैलाव होण्याआधी सुमारे 11 कोटी विदेशी पर्यटकांनी भारत दर्शन घेतले होते. त्यानंतर कोरोनामुळे लॉकडाऊन सुरू झाल्याने पर्यटकांची संख्या तळाला पोहचली. विमानप्रवासावरही निर्बंध होते. 2022 सालातील वाढ चांगली असल्याने चालू वर्षात ही आकडेवारी आणखी वाढण्याची आशा निर्माण झाली आहे. चालू वर्षात 1 कोटी पर्यटक भारतात येतील असा अंदाज वर्तवला जात आहे.
परदेशी पर्यटकांच्या भेटीतून कमाई किती? (India revenue from Foreign tourist)
पर्यटन मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, 2022 मध्ये 1.34 लाख कोटी रुपये फॉरेन एक्सचेंजद्वारे भारतात आले. 2021 साली फक्त 65 कोटी रुपये जमा झाले होते. चालू वर्षात 2022 पेक्षा जास्त पैसे पर्यटकांकडून भारतीय तिजोरीत जमा होतील, असा अंदाज आहे. हॉटेल, टूर गाईड, टूर ऑपरेटर, एजन्सीज यांनाही परदेशी पर्यटकांकडून चांगला व्यवसाय मिळतो. ईशान्य भारतात मागील वर्षी सुमारे 1 लाख परदेशी पर्यटकांनी भेट दिली.
कोणत्या पर्यटकांची संख्या जास्त?
भारतामध्ये येणाऱ्या पर्यटकांपैकी सर्वाधिक पर्यटक हे मूळ भारतीय नागरिक असतात. जे परदेशात स्थायिक झालेले आहेत. दरवर्षी कुटुंबीय, मित्रपरिवार आणि नातेवाईकांना भेटण्यासाठी ते भारतात येतात. खास पर्यटनासाठी येणाऱ्या परदेशी पर्यटकांची संख्या 35% पेक्षा कमी आहे, असे इंडियन असोसिएशन ऑफ टूर ऑपरेटर संघटनेचे अध्यक्ष राजीव मेहरा यांनी सांगितले. अमेरिका, युरोप, बांग्लादेश, कॅनडा देशातील सर्वाधिक पर्यटक भारतात येतात.