भारतीय विमान कंपन्या सध्या चर्चेत आहेत. देशांतर्गत विमान प्रवास सध्या कमालीचा महागला आहे. उन्हाळ्याच्या सुट्ट्यामध्ये लोक फिरण्यासाठी जात असतात. नेमक्या याच दरम्यान GoFirst च्या दिवाळखोरीचे प्रकरण समोर आले, गोफर्स्टने त्यांची उड्डाणे रद्द केली. आगाऊ विमान तिकीट बुक केलेल्या नागरिकांना रिफंड देताना कंपनीला अनेक अडचणींचा सामना करावा लागला होता. अशातच प्रतिस्पर्धी विमान कंपन्यांनी त्यांच्या विमानभाड्यात मोठ्या प्रमाणात वाढ केली होती. काही मार्गांवर तर चक्क 125% भाडेवाढ नोंदवली गेली होती. अशातच आता परदेशी विमान प्रवास देखील महागला असल्याची बातमी समोर येते आहे.
परदेशी सर्वात मोठी वाढ
एअरपोर्ट्स कौन्सिल इंटरनॅशनल (ACI) च्या म्हणण्यानुसार, आशिया पॅसिफिक देशांमध्ये फ्लाइट तिकिटाच्या भाड्यात आतापर्यंतची सर्वात मोठी वाढ नोंदवली गेली आहे. ACI च्या निरीक्षणानुसार आंतरराष्ट्रीय विमान भाड्यात 50 टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे. तर देशांतर्गत विमान प्रवासात सरासरी 10% वाढ नोंदवण्यात आली आहे. विशेषत: GoFirst एअरलाइनची उड्डाणे ज्या मार्गावर अधिक होती त्याच मार्गावरील विमान प्रवासात मोठी भाडेवाढ झाल्याचे देखील या अहवालात म्हटले आहे.
सर्वाधिक भाडेवाढ भारतात
एअरपोर्ट्स कौन्सिल इंटरनॅशनलने (ACI) आशिया पॅसिफिक देशांमधल्या टॉप 10 एव्हिएशन मार्केटमधील 36000 मार्गांवर हा अभ्यास केला आहे. या अभ्यासानुसार आंतरराष्ट्रीय विमान भाड्यात सर्वाधिक वाढ झालेल्या विमान व्यवसायात भारताचा पहिला क्रमांक लागतो. तसेच गेल्यावर्षीच्या तुलनेत भारतातील विमानप्रवास भाडे 41 टक्क्यांपर्यंत वाढले आहे असेही ACI ने म्हटले आहे. तर दुसरीकडे, यूएईमध्ये 34 टक्के, सिंगापूरमध्ये 30 टक्के आणि ऑस्ट्रेलियामध्ये 23 टक्के वाढ नोंदवली गेली आहे.
कोरोनानंतर विमान प्रवासात वाढ
गेली 3 वर्षे कोरोना संक्रमणामुळे परदेशी प्रवास, पर्यटन टाळला होता. मात्र जगभरात कोरोनाचे निर्बंध शिथिल झाल्यानंतर अनेक पर्यटकांनी परदेशात प्रवास करणे सुरु केले आहे. ऐन उन्हाळ्यात थंड हवेच्या ठिकाणी भारतीय नागरिक पर्यटनास जाणे पसंत करतात. स्वित्झर्लंड, मालदीव, सेशेल आदी देशांना भारतीय पर्यटक मोठ्या संख्येने भेट देत असतात, या मार्गावरील विमान प्रवासभाडे 30-40% महागले आहे.
तसेच अनेक विदेशी पर्यटक भारतात हिमाचल, काश्मीर, गोवा आदी स्थळांना भेट देण्यासाठी येत असतात. परदेशी पर्यटकांसाठी देखील आता भारतासाठीचा विमान प्रवास महागला आहे. विमान प्रवासाच्या वाढत्या मागणीचा परिणाम विमान तिकिटांच्या भाड्यावर सध्या दिसून येतो आहे.