भारतीय अर्थव्यवस्था ज्या वेगाने वाढत आहे त्याच वेगाने किंबहुना त्याहून अधिक वेगाने देशातील उद्योजकांची संपत्ती वाढत असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. जागतिक पातळीवरील फोर्ब्स या संस्थेने वर्ष 2023 मधील बिलेनिअर्स उद्योजकांची यादी जाहीर केली आहे. (Forbes Rich List 2023) त्यानुसार भारतात 169 बिलिनिअर्स असून त्यांच्याकडे एकूण 675 बिलियन डॉलर्सची संपत्ती असल्याचे म्हटले आहे. बिलेनिअर्सच्या संख्येच्या बाबती भारत अमेरिका आणि चीननंतर जगातील तिसरा देश ठरला आहे.
भारतातून मुकेश अंबानी, गौतम अदानी, शिव नाडार, फाल्गुनी नायर या उद्योजकांना बिलेनिअर्सच्या यादीत स्थान देण्यात आले आहे.वर्ष 2023 मध्ये जगभरातील 77 देशांमधील एकूण 2640 बिलेनिअर उद्योजकांचा समावेश करण्यात आला आहे. ( As per Forbes Rich List 2023 India become home of 169 billionaires) याशिवाय झिरोधाचे नितीन कामत आणि निखील कामत यांचा या यादीत समावेश करण्यात आला आहे.
फोर्ब्सच्या बिलेनिअर्सच्या यादीत सर्वाधिक 735 बिलेनिअर उद्योजक एकट्या अमेरिकेतील आहेत. मात्र श्रीमंत उद्योजकाचा मान फ्रान्सला मिळाला आहे. आजच्या घडीला बर्नाड अरर्नल्ट हे सर्वात श्रीमंत उद्योजक आहेत. ते मूळचे फ्रान्सचे असून त्यांची एकूण संपत्ती 211 बिलियन डॉलर्स इतकी आहे. त्याखालोखाल टेस्लाचे प्रमुख एलन मस्क, जेफ बेझॉस आणि बिल गेट्स यांचा फोर्ब्सच्या यादीत समावेश आहे.
अमेरिकेनंतर चीनमध्ये 495 बिलेनिअर्स आहेत. मात्र गेल्या वर्षाच्या तुलनेत चीनमधील बिलेनिअर्सची संख्या यंदा कमी झाली आहे. वर्ष 2022 मध्ये चीनमध्ये 539 बिलेनिअर्स होते.बिलेनिअर्सच्या संख्येत तिसरा देश भारत आहे. भारतात 169 अब्जाधिश असून त्यांच्याकडे एकूण 675 बिलियन डॉलर्सची संपत्ती आहे. फोर्ब्सच्या आकडेवारीनुसार गेल्या वर्षाच्या तुलनेत भारतीय बिलेनिअर्सच्या संपत्ती 75 बिलियन डॉलर्सची घसरण झाली आहे.
भारतीय बिलेनिअर्सच्या एकूण संपत्तीमधील घसरणीमागे उद्योजक गौतम अदानी यांच्या संपत्तीत झालेल्या घसरणीचे पडसाद उमटले आहेत. अमेरिकन संस्था हिंडेनबर्गने अदानी ग्रुपबाबत जाहीर केलेल्या संवेदनशील अहवालानंतर शेअर मार्केटमध्ये अदानी ग्रुपमधील सर्वच शेअर्समध्ये मोठी घसरण झाली. यामुळे गौतम अदानी यांच्या संपत्तीत प्रचंड घसरण झाली. अदानी ग्रुपमधील कंपन्याची मार्केट कॅप देखील जवळपास 12 लाख कोटींनी कमी झाली होती. हिंडेनबर्ग रिपोर्टनंतर गौतम अदानी यांनी 43 बिलियन डॉलर्सची संपत्ती गमावली आहे. गौतम अदानी यादीमध्ये 24 व्या स्थानी असून त्यांची एकूण संपत्ती 47.2 बिलियन डॉलर्स इतकी आहे.
बिलेनिअर्स उद्योजकांच्या संख्येनुसार जर्मनी चौथा देश ठरला आहे. जर्मनीमध्ये 126 बिलेनिअर्स उद्योजक आहेत. जर्मनीतील श्रीमंत उद्योकांची संख्या यंदा कमी झाली आहे. रशियामध्ये 105 बिलेनिअर्स असून हा यादीतील पाचवा देश आहे.
फोर्ब्सनुसार वर्ष 2023 मधील टॉप 10 श्रीमंत उद्योजक
फोर्ब्सने 10 मार्च 2023 पर्यंतची या उद्योजकांची संपत्ती ग्राह्य धरली आहे. त्यानुसार दुसऱ्या स्थानावर एलन मस्क असून त्यांच्याकडे 180 बिलियन डॉलर्सची संपत्ती आहे. तिसऱ्या स्थानी 114 बिलियन डॉलर्ससह अॅमेझॉनचे जेफ बेझॉस आहेत. लॅरि एलिसन हे चौथ्या स्थानी असून त्यांची एकूण संपत्ती 107 बिलियन डॉलर्स इतकी आहे. पाचव्या स्थानी प्रसिद्ध उद्योजक वॉरेन बफे आहेत. बफे यांची एकूण संपत्ती 106 बिलियन डॉलर्स इतकी आहे.सहाव्या स्थानी बिल गेट्स आहेत. त्यांची संपत्ती 104 बिलियन डॉलर्स इतकी आहे. सातव्या स्थानावर मायकल ब्लुमबर्ग असून त्यांची एकूण संपत्ती 94.8 बिलियन डॉलर्स इतकी आहे. आठव्या स्थानी 93 बिलियन डॉलर्ससह कार्लोस स्लीम हेलू अॅंड फॅमिली आहे. यादीत नवव्या स्थावावर रिलायन्स समूहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी असून त्यांची एकूण संपत्ती 83.4 बिलियन डॉलर्स इतकी आहे. दहाव्या स्थानावर स्टीव्ह बाल्मेर असून त्यांची संपत्ती 80.7 बिलियन डॉलर्स इतकी आहे.
 
     
     
                 
                                             
                                             
                                             
                                             
                                            