Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Food Truck Business : कमी खर्चात अधिक उत्पन्न मिळवून देणारा व्यवसाय

Food Truck Business

Business Idea : अलीकडे फुड ट्रक व्यवसाय ट्रेडिंग व्यवसाय म्हणून ओळखला जात आहे. या व्यवसायासाठी विशेष धोरण, नियमावली तयार करण्याचा विचार सरकार करत आहे. यासंदर्भात मुंबई महानगरपालिकेने सुद्धा नुकतंच धोरण मंजूर केलं आहे. तर कमीत कमी 10 ते 15 लाख रूपये गुंतवून आपणही हा व्यवसाय कसा करू शकतो ते पाहूयात.

Food Truck Business : बाहेर फिरायला गेल्यावर आपण पहिलं जेवण्याचं ठिकाण शोधत असतो. एखाद्या नवीन ठिकाणी गेल्यावर तेथील स्थानिक पदार्थांची चव घेणे यात वेगळाच आनंद असतो. फुड इंडस्ट्रीमधले सगळेच व्यवसाय उत्तमरीत्या नफा कमावत असल्याचे आपल्याला पाहायला मिळते.

एका पाहणी अहवालानुसार भारतीय व्यक्ती त्याच्या दैनंदिन उत्पन्नातील सरासरी 3.5 टक्के खर्च हा खाण्या-पिण्यावर करतो. भारतामध्ये पाश्चिमात्य संस्कृतीवर आधारित फास्ट फूड खाण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. भारतात फास्ट फुडच्या मार्केटमध्ये दरवर्षी 40 टक्क्याची वाढ होत आहे. यासोबतच भारतीय फास्ट फुडच्या पदार्थांनाही चांगली मागणी आहे. तुम्हाला व्यवसाय सुरू करायचा असेल आणि तुम्ही  खाण्याचे शौकीन असाल, विविध पदार्थ बनवण्याची तुम्हाला आवड असेल तर तुम्ही नक्कीच फुड व्यवसायाचा विचार करू शकता.

हॉटेल, कॅटरिंग या पारंपारिक पद्धतींना बगल देत तुम्ही सध्या ट्रेडिंग मध्ये असलेला फुड ट्रकचा पर्याय व्यवयासाठी निवडू शकता. एखादे हॉटेल सुरू करायला जेवढा खर्च येतो त्या तुलनेत 10 ते 25 टक्के खर्चामध्ये आपण हा व्यवसाय सुरू करू शकतो. फुड ट्रक व्यवसाय हा असा व्यवसाय आहे की, जिथं तुम्ही फुड ट्रक लावाल तिथं अन्नपदार्थाची विक्री करून उत्पन्न मिळवू शकता. हो, पण म्हणून हा मुक्तसंचार व्यवसाय आहे असा गैरसमज करून घेऊ नका. या व्यवसायासाठीसुद्धा तुम्हाला सर्व आवश्यक त्या परवानग्या घ्याव्याच लागतात. तर पाहुयात हा व्यवसाय कसा करता येईल.

गुंतवणूक व उत्पन्न

फुड ट्रकच्या व्यवसायासाठी आपल्याला साधारण 10 ते 15 लाख रूपये गुंतवणे गरजेचे आहे. यामध्ये गाडीची खरेदी, गाडीचे फुड ट्रकमध्ये रूपांतर, अन्नपदार्थ बनविण्यासाठी लागणारी सामुग्री, सरकारी परवानग्या आणि मनुष्यबळ अशा सर्व खर्चाचा समावेश होतो. या व्यवसायामधील उत्पन्न हे आपण कोणत्या स्वरूपाचे अन्नपदार्थ विकणार आहोत यावर अवलंबून असते. तरीही महिन्याला सरासरी 40  ते 50 हजारांचे उत्पन्न  मिळवू शकतो.

आवश्यक परवानग्या 

या व्यवसायासाठी कोणकोणत्या परवानग्या मिळवणे गरजेचं आहे ते पाहुयात.

  • अन्नपदार्थाची विक्री करणार आहोत म्हणून एफएसएसएआय (FSSAI) प्रमाणपत्र असले पाहिजे. 
  • ज्या गाडीचे रूपांतर आपण फुड ट्रक मध्ये करणार आहोत त्या गाडीची कागदपत्रे, गाडीच्या विम्याची कागदपत्रे आपल्याकडे असायला हवीत.
  • फुड ट्रक पार्क करण्यासाठी आरटीओ (RTO) विभागाकडून परवानगी घेणे. 
  • फुड ट्रकमध्ये आपण तयार पदार्थां ऐवजी अन्नपदार्थ प्रत्यक्ष शिजवून विकणार असू तर गॅस सिंलेडर बाळगण्यासाठी अग्निशमक दलाकडून ना हरकत (NOC) प्रमाणपत्र घेणे.
  • व्यापार प्रमाणपत्र व स्थानिक प्रशासनाकडूनही आवश्यक ते प्रमाणपत्र आपल्याकडे असायला हवे.

गाडीची निवड

आपला सगळा व्यवसाय हा एका गाडीवर अवलंबून असणार आहे. त्यामुळे योग्य त्या गाडीची आपण निवड केली पाहिजे. यासाठी आपण मिनी व्हॅन किंवा पिक-अप ट्रक सेकंड हॅन्डने खरेदी करू शकतो. आपले बजेट जर जास्त असेल तर आपण एखाद्या कंपनीकडून असं फुड ट्रक स्पेशल बनवून सुद्धा घेऊ शकतो. मात्र, त्यासाठी आपल्याला जवळपास दीड - दोन ते पाच लाखापर्यंतचा खर्च करावा लागेल. जर आपण सेकंड हॅन्ड गाडी घेणार असू तर त्या गाडीची कंडिशन, त्यातील जागा व्यवसायासाठी पुरेशी आहे की नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सर्व कागदपत्रे व्यवस्थित आहेत की नाहीत हे तपासून घ्यायचे आहेत.

जागेची निवड

फास्ट फुड ट्रक व्यवसायासाठी अचूक जागेची निवड करायची आहे. ज्याठिकाणी वर्दळ,जास्त लोकवस्तीच्या ठिकाणांसह धार्मिक ठिकाण, शाळा, कॉलेज, गार्डेन, मॉल, शॉपिंग एरिया अशा ठिकाणी सुद्धा चांगला व्यवसाय होऊ शकतो. जर आरटीओची परवानगी असेल तर तुम्ही वेळेनुसार वा दिवसानुसार आपले ट्रक एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हलवू शकता.  

मनुष्यबळ

आपण जर आपल्या ट्रकवर अन्नपदार्थ बनवणार असू तर शेफ सह किमान अन्य दोन कर्मचाऱ्यांची गरज भासू शकते. पण जर आपण तयार अन्नपदार्थ विकणार असू तर आपण स्वत:च किंवा एका माणसाच्या मदतीने सुद्धा काम करु शकतो. त्यातही जर एखादं कुटुंब मिळून हा व्यवसाय करणार असेल आणि कुटुंबातील व्यक्ति सक्रिय काम करणार असतील तर हा खर्चही वाचेल.

आवश्यक वस्तूंची खरेदी

या फुड ट्रकवरून जर फक्त तयार पदार्थ विकणार असू तर त्या पदार्थानुसार योग्य त्या सामुग्रीची खरेदी करावी. त्याची क्वालिटी ही चांगली असावी. जर आपण अन्नपदार्थ तयार करणार असू तर किमान सहा जणांची ऑर्डर एकाचवेळी बनवता येईल एवढ्या आकाराची भांडी खरेदी करावी.

फुड ट्रकची देखभाल

संपूर्ण व्यवयास हा एका ट्रकवर अवलंबुन असणार आहे त्यामुळे त्याच्या देखभालीवर जातीने लक्ष द्यावं लागेल. ट्रकमध्ये अग्निरोधक (Fire Extinguisher) असले पाहिजे. ते कसं वापरावं याचे प्रशिक्षणसुद्धा कर्मचाऱ्यांना दिले पाहिजे. अन्नपदार्थ बनविण्यासाठी कमर्शियल गॅस घ्यायचा. ट्रकमध्ये एका वेळी एकच सिंलेडर ठेवावा. सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वच्छतेवर जास्त भर द्यावा.