SpiceJet Crisis: गेल्या वर्षा दोन वर्षात आर्थिक अस्थिरतेचा सामना करणाऱ्या स्पाईसजेट एयरलाईन्सने जुनी कर्जे फेडण्याचा सपाटा लावलाय. खरे तर 2012 पासून या ना त्या कारणामुळे एयरलाईन्सला आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. बँकांचे वाढते कर्ज, प्रवाशांची कमतरता आणि विमानांची देखरेख या सगळ्या गोष्टींचा ताळमेळ साधने कंपनीला अवघड होऊन बसले होते. अशातच एअरलाइन स्पाइसजेटने सोमवारी सांगितले की त्यांनी सिटी युनियन बँकेकडून घेतलेले 100 कोटी रुपयांचे कर्ज फेडले आहे.
100 कोटी रुपयांच्या या कर्जाचा शेवटचा हप्ता म्हणून 25 कोटी रुपये जूनमध्ये परतफेड करण्यात आल्याचे स्पाईसजेट एयरलाईन्सने म्हटले आहे. सर्वसामान्यांना परवडणारी एयरलाईन्स म्हणून स्पाईसजेट कंपनी नावारूपाला आली होती. इतर एयरलाईन्सच्या तुलनेत स्पाईसजेटने कमी दरात विमानप्रवासाची सुविधा उपलब्ध करून दिली होती. परंतु 2012 नंतर कर्मचाऱ्यांचे पगार देखील देणे कंपनीसाठी मुश्कील बनले होते. कंपनीच्या दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी आणि वाहतूक सेवा सुरळीत ठेवण्यासाठी कंपनीने बँकांकडून कर्ज घेतले होते. दिवाळखोरीची प्रक्रिया टाळण्यासाठी स्पाईसजेट एयरलाईन्सच्या संचालक मंडळाने हा निर्णय घेतला होता.
Minus 1!!
— JetArena (@ArenaJet) July 3, 2023
SpiceJet has settled the dues of City Union Bank.
Payment of Rs 100 crore has been done.
Last payment worth 25 crore was paid on 30 June.
This also means successful settlement with Nordic Aviation Capital.
This paves the way for re-induction of 3 Q400s in SG fleet. pic.twitter.com/z1jPeBkqy0
सिटी युनियन बँकेकडून घेतलेले 100 कोटी रुपयांचे कर्ज फेडल्यानंतर कर्जापोटी बँकेकडे तारण ठेवलेल्या सर्व मालमत्ताही परत करण्यात आल्या आहेत.
संकट अजून टळलेले नाही!
वाढते इंधन दर आणि त्यामुळे झालेला महागडा विमानप्रवास यामुळे स्पाईसजेटकडे प्रवाशांनी देखील पाठ फिरवली आहे. गेल्या सहा महिन्यात स्पाईसजेटच्या प्रवासी संख्येत 3% कपात नोंदवली गेली आहे. त्यामुळे देशांतर्गत विमानप्रवासासाठी दुसऱ्या क्रमांकावर असलेली ही एयरलाईन्स थेट पाचव्या क्रमांकावर पोहोचली आहे. चालू आर्थिक वर्षातील पहिल्या तिमाहीत 458 कोटींचा आणि दुसऱ्या तिमाहीत 789 कोटींचा तोटा स्पाईसजेट एयरलाईन्सला सहन करावा लागला आहे. कंपनीवर विविध बँकांचे 6408 कोटींचे कर्ज आहे. गो फर्स्ट विमान कंपनी दिवाळखोरीत निघाल्यानंतर स्पाईसजेटचे संचालक मंडळ देखील असा निर्णय घेतील अशी चर्चा होती. मात्र बँकांचे कर्ज लवकरात लवकर फेडून सर्व काही सुरळीत होईल असा विश्वास संचालक मंडळाने व्यक्त केला आहे.