पालकत्वाची जबाबदारी हा प्रत्येकाच्या आयुष्यातील एक वेगळा अनुभव असतो. प्रामुख्याने नव्याने पालक बनलेल्या जोडप्यांसाठी ही नवीन जबाबदारी असते. त्यामुळे मुलांचा सांभाळ करताना आर्थिक बाबींकडे लक्ष देणेही तेवढेच गरजेचे आहे. मुल जन्माला आल्यावर त्याच्यासोबतच खर्चात देखील वाढ होत असते, त्यामुळे आधीपासूनच योग्य आर्थिक नियोजन करणे गरजेचे आहे.
नव्याने पालक बनलेले जोडपे कशाप्रकारे मुलांच्या सुरक्षा व भविष्यासाठी आर्थिक नियोजन करू शकतात, याविषयी या लेखातून जाणून घेऊया.
प्रसूतीचा खर्च
बाळाच्या जन्मानंतर त्याच्या दैनंदिन गरजांपासून ते शाळा-कॉलेजचा खर्च वाढतच जाणार आहे. मात्र, बाळ जन्माला येण्यापूर्वीच काही गोष्टींसाठी आधीपासूनच पैशांची सोय करणे गरजेचे आहे. प्रसूतीच्या खर्चाचे आधीच नियोजन करणे आवश्यक असते. प्रसूतीचा खर्च हा सर्वसाधारणपणे 80 हजार रुपयांपासून ते दीड लाख रुपयांपर्यंत जातो. तुम्ही जर विमा काढलेला असल्यास त्यामध्ये प्रसुतीच्या खर्चाची तरतूद आहे का, हे देखील पाहायला हवे. तसेच, नोकरी करत असल्यास या काळात महिलांना कंपनीकडून दिल्या जाणाऱ्या सुविधांचा देखील लाभ घ्यावा.
नव्याने पालक बनलेल्या जोडप्यांसाठी आर्थिक नियोजनाच्या टिप्स
खर्चाचे बजेट तयार करा | बाळ जन्माला आल्यानंतर पालकांच्या खर्चांमध्ये प्रचंड मोठी वाढ होत असते. नियमित खर्चाच्या तुलनेत हा खर्च कितीतरी पटीने अधिक असतो. बाळाच्या कपड्यांपासून ते खेळण्यांपर्यंत, अशा अनेक गोष्टींसाठी महिन्याला हजारो रुपये खर्च येतो. याशिवाय, नियमित बालरोगतज्ञांनाच्या भेटीपासून ते पाळणाघरापर्यंत, असा अतिरिक्त खर्च महिन्याच्या बजेटमध्ये जोडला जातो. त्यामुळे बाळाच्या जन्मानंतर खर्चाचे नवीन बजेट तयार करायला हवे. |
विमा काढा | बाळाच्या जन्मानंतर त्वरित विमा काढणे गरजेचे आहे. सर्वसाधारणपणे बाळाच्या जन्माला 3 ते 6 महिने झाल्यानंतर विमा काढता येतो. तुम्ही बाळाचा वेगळा विमा काढू शकता, अथवा कौटुंबिक विम्यामध्ये त्याचा समावेश करू शकता. मात्र, विमा काढताना त्याच्यामध्ये कोणकोणत्या सुविधा उपलब्ध आहेत, ते नक्की पाहा. कारण, बाळाला नियमितपणे डॉक्टरांच्या तपासणीची गरज असते. याशिवाय, लस, औषधे व इतर वैद्यकीय खर्च देखील असतो. विमा काढलेला असल्यास तुमच्या महिन्याला हजारो रुपये वाचतील. |
आपत्कालीन निधीची करा तरतूद | मुलांच्या जन्माबरोबर पालकांची जबाबदारी वाढते. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीमध्ये आर्थिक समस्या निर्माण होणार नाही, याची काळजी घ्यायला हवी. नोकरी गमावणे, आजारपण अशा स्थितीला सामोरे जाण्यासाठी नेहमीच तयार असायला हवे. यासाठी बाळाच्या जन्मानंतर आपत्कालीन निधीत वाढ करावी. |
मुलांच्या भविष्यासाठी करा बचत | मुलांच्या जन्मानंतर त्यांच्या भविष्यासाठी बचत करायला सुरुवात करावी. मुलांच्या शाळा-कॉलेजचा खर्च, उच्च-शिक्षण, लग्नासाठीचा खर्च यासाठी आधीपासूनच गुंतवणूक करायला हवी. दरमहिन्याच्या उत्पन्नातील काही रक्कम मुलांच्या भविष्यासाठीसाठी गुंतवल्यास फायदाच होईल. |
निवृत्ती व मालमत्तेची नियोजन | मुलांच्या भविष्यासोबतच स्वतःचा विचार करणे देखील तेवढेच गरजेचे आहे. निवृत्ती नियोजनाकडे दुर्लक्ष करू नये. उत्पन्नातील काही रक्कम मुलांच्या भविष्यासोबतच निवृत्ती नियोजनातही गुंतवावी. तसेच, मालमत्तेच्या मालकीसंदर्भात इच्छापत्र देखील तयार करावे. |