उत्पन्न चालू असतानाच बचतीला (Saving) सुरुवात करायला हवी. बरेच जण पैशांची चणचण भासायला लागली की मग, बचतीच्या मागे लागतात. मात्र अशा परिस्थितीत बचत करणे शक्य होत नाही. बचत ही एका दिवसात होणारी गोष्ट नाही. 'थेंबे थेंबे तळे साचे' या म्हणीप्रमाणे दररोज थोडी थोडी केलेली बचत मोठा फंड तयार करण्यासाठी किंवा आर्थिक नियोजन (Financial Planning) करण्यासाठी मदत करते. खर्चाचे नियोजन करून बजेट प्लॅन (Budget Plan) करणे ही सध्याच्या काळाची गरज बनली आहे. अनेकदा आपल्या सवयीमुळे आपण अमाप पैसे खर्च करतो, ज्याचा फटका आपल्याला पुढे जाऊन बसतो. जर तुम्हाला देखील आर्थिक अडचणींना सामोरे जायचे नसेल, तर तुम्ही काही सवयी बदलायला हव्यात. त्या सवयी कोणत्या, जाणून घेऊयात.
Table of contents [Show]
आर्थिक नियोजन न करणे
आर्थिक अडचण येण्याचे पहिले कारण म्हणजे आर्थिक नियोजन न करणे. अनेकजण मिळालेले पैसे कोणताही विचार न करता थेट खर्च करतात. त्यांच्या या सवयीमुळे भविष्य काळासाठी कोणतीही तरतूद शिल्लक राहत नाही. याचा परिणाम असा होतो की त्या लोकांना आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागते. त्यामुळे तुम्हाला उत्पन्न मिळायला सुरुवात झाली की, तुम्ही आर्थिक नियोजन करायला सुरुवात करा. पैसे खर्च करण्यापूर्वी आणि खर्च झाल्यानंतर त्याची नोंद ठेवायला शिका. तुम्हाला मिळणाऱ्या मासिक उत्पन्नाचा भाग हा गुंतवणूक, मासिक खर्च इ. गोष्टींमध्ये विभागायला शिका.
स्वतःला चार्ज न करणे
महिन्याच्या शेवटी किंवा सुरुवातीला पगार हातात येताच, आपण खर्च करायला सुरुवात करतो.घरातील अनेक छोटी मोठी कामे आपण स्वतःहून करतो. हीच कामे बाहेर करायला दिली, तर त्यांना पगार द्यावा लागतो. त्यामुळे कोणतेही काम तुम्ही स्वतः केले, तर स्वतःला त्या कामाचा थोडा का होईना मोबदला द्यायला शिका. या मोबदल्याची रक्कम तुम्ही ठराविक ठिकाणी गुंतवू शकता किंवा बचत खात्यात ठेऊ शकता. ठराविक कालावधीनंतर ही एकरकमी रक्कम तुम्ही महत्त्वाच्या कामांसाठी वापरू शकता.
गरज Vs उपभोगाच्या वस्तूंमधील फरक न समजणे
अनेकांना अजूनही गरज आणि उपभोगाच्या वस्तूंमधील फरक समजत नाही. त्यामुळे ते गरज नसताना देखील अमाप पैसे खर्च करतात. गरजेच्या वस्तूंमध्ये अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण इ. गोष्टी समाविष्ट असतात. तर उपभोगाच्या वस्तूंमध्ये चैनीच्या वस्तूंचा समावेश करण्यात आलेला असतो. आजही अनेकजण 5 हजारांची गुंतवणूक करण्याऐवजी 15 हजारांचा मोबाईल खरेदी करण्यावर भर देतात. यासारख्या सवयीमुळे भविष्यात आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो.
उत्पन्नापेक्षा खर्च जास्त करणे
अनेकजण स्वतःच्या मासिक उत्पन्नापेक्षा जास्त खर्च करतात. यामुळेच महिन्याच्या अखेरीस त्यांच्या खात्यात काहीच शिल्लक राहत नाही. परिणामी आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो. सध्या बँकांकडून क्रेडिट कार्डची सुविधा उलब्ध करून दिली जाते. या कार्डवर बँक क्रेडिट लिमिट देते. या आधारे बँक खात्यात पैसे नसताना देखील लोक खरेदी करतात आणि त्याचे बिल नंतर भरतात. आपल्या मासिक उत्पन्नानुसार आपण खर्चाचा विचार करायला हवा. मिळालेल्या उत्पन्नातून बचत वजा करून मगच बाकीच्या रकमेचा खर्च करायला शिकले पाहिजे .
नाही म्हणता येत नाही
संकटकाळात एकमेकांना आर्थिक मदत करणे हे गरजेचे आहे. मात्र एखाद्या व्यक्तीच्या चैनीच्या गोष्टींसाठी पैसे देताना नाही म्हणता यायला हवे. अनेकजण स्वतःकडे पैसे नसताना देखील उधारी घेऊन किंवा कर्ज काढून दुसऱ्या व्यक्तीची आर्थिक मदत करतात. मात्र अशा परिस्थितीत स्वतः जोखीम पत्करणे महागात पडू शकते. जर आपल्याकडे पैसे असतील तरच आपण एखाद्या व्यक्तीची आर्थिक मदत करावी. शक्यतो कोणत्याही नात्यात पैशाचा व्यवहार करू नये. जरी केलात तरी तो दोन्ही बाजूंनी चोख असावा.
Source: achhikhabar.com