यंदाचा ऊस गाळप हंगाम (sugarcane crushing season) लांबणीवर पडण्याची शक्यता असतानाच गत वर्षीच्या ऊस बिलाचा दुसरा हप्ता मिळावा यासाठी शेतकऱ्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. गेल्या हंगामातील साखरेला चांगला दर मिळत असल्याने आणि शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चात वाढ झाल्यामुळे कारखान्यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना 400 रुपयांचा दुसरा हप्ता द्यावा, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून करण्यात आली आहे. त्यासाठी आज कोल्हापूरमध्ये मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.
400 रुपयांचा दुसरा हप्ता द्यावा-
साखर कारखान्यांचा 2022-23 या वर्षीच्या गाळप हंगामात शेतकऱ्यांना 3050 प्रतिटन या प्रमाणे एफआरपी जाहीर करण्यात आली होती. मात्र, सद्य स्थितीत खताच्या किमती, मजुरांचे रोजगार, इंधनाच्या दरामध्ये वाढ झाली आहे. परिणामी ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना देण्यात आलेला उसाचा दर परवडत नाही. तसेच दुसरीकडे साखरेला चांगला दर मिळत आहे. त्यामुळे साखर कारखानदारांनी शेतकऱ्यांना 400 रुपयांचा दुसरा हप्ता द्यावा, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केली आहे.
कोल्हापुरात आज मोर्चा
साखर कारखानदारांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना टनाला 400 रुपयाचा दुसरा हप्ता द्यावा या मागणीसाठी आज शेतकरी संघटनाकडून कोल्हापुरातील प्रादेशिक साखर संहसंचालक कार्यालयावर 13 सप्टेंबर रोजी मोर्चा काढण्यात येणार आहे. दरम्यान, या मोर्चावेळी मागील वर्षातील दुसरा हप्त्यासह ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांबाबत सरकारला जाब विचारला जाणार आहे. तसेच दुसरा हप्ता मिळाल्याखेरीज यंदाचा गाळप हंगाम सुरू होऊ न देण्याचा इशारा शेतकरी संघटनांकडून देण्यात आला आहे.