केंद्र सरकारने अचानकपणे लागू केलेली गव्हाच्या निर्यातीवरील बंदी तात्काळ उठवली जाणार नाही. पण इतर देशातील सरकारांशी थेट व्यवहार केले जातील, अशी माहिती वाणिज्य मंत्री पियुष गोयल (Piyush Goyal, Commerce Minister, Govt of India) यांनी रॉयटर्स या वृत्तसंस्थेशी बोलताना दिली.
दरम्यान, उष्णतेच्या लाटेमुळे देशात पिकांच्या उत्पादनात घट झाली आहे. तसेच देशांतर्गत अन्नधान्यांच्या किमतीत विक्रमी वाढ झाल्यानंतर जगातील दुसऱ्या क्रमांकाच्या गहू उत्पादक देशाने अर्थात भारताने 14 मे रोजी खाजगी गहू निर्यातीवर बंदी घातली. या निर्णयामुळे जागतिक स्तरावर गव्हाचे बाजारभाव (Wheat Price Hike) वाढले आहेत. गव्हाच्या किमती वाढल्याने गव्हाच्या पिठाचे भाव (Wheat Flour Price Hike) ही वाढले आहेत.
सध्या संपूर्ण जगभरात अस्थिरतेचे वातावरण आहे. अशा वातावरणात जर आपण गव्हावरील बंदी उठवली तर काळाबाजार, साठेबाजी करणारे आणि सट्टेबाजांना ते फायदेशीर ठरेल आणि जे खरोखरच अन्नधान्याच्या बाबतीत असुरक्षित आहेत. ज्या देशांना खरंच मदतीची गरज आहे, अशा लोकांना आपल्याला मदत करता येणार नाही. त्यामुळेच सध्या गव्हाची खाजगी निर्यात पुन्हा सुरू करण्याची सरकारची कोणतीही योजना नाही, असे गोयल म्हणाले.
दरम्यान, दावोस येथील वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम (World Economic Forum, Davos) येथे बुधवारी एका मुलाखतीत बोलताना गोयल यांनी सांगितले की, सध्या सरकार ते सरकारी मार्ग, हा एकमेव योग्य आणि चांगला मार्ग आहे. ज्याद्वारे आम्ही असुरक्षित गरीबांना परवडणाऱ्या दरात गव्हाचे धान्य देऊ शकतो.
जी-7 (G7 Nations) देशांच्या सदस्यांसह अनेक गहू आयात करणाऱ्या देशांनी भारताला गहू निर्यात बंदीच्या निर्णयावर पुनर्विचार करण्यास सांगितले आहे. अमेरिकेचे कृषि सचिव टॉम विलसॅक यांनीही गव्हाच्या निर्यात बंदीनंतर ‘चिंताजनक स्थिती’ असे म्हटले होते. भारताने लागू केलेल्या निर्यात बंदीमागील कारणमीमांसा स्पष्ट करण्यासाठी जागतिक व्यापार संघटना (World Trade Organization - WTO) आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (International Monetary Fund - IMF) या संस्थांच्या संपर्कात असल्याचेही गोयल यांनी सांगितले.
पिठाच्या किमतीत वाढ (wheat flour price hike)
यंदा उन्हाळी हंगाम लवकर आल्याने गव्हाच्या उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता कृषि तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे. एप्रिल महिन्यातील उष्मा अचानकपणे वाढल्याने त्याचा परिणाम पिकांवर होतो आणि गव्हाचे पीक घेण्याची हीच वेळ असते. या वातावरणाचा परिणाम गव्हाच्या उत्पादनावर आणि गुणवत्तेवर होऊ शकतो. परिणामी गव्हाचे उत्पादन कमी झाले. याचाच फायदा घेत भारतातील काही खाजगी कंपन्या चढ्या दराने गहू बाजारातून विकत घेत आहेत. अशा अनेक प्रकारच्या घटकांमुळे सर्वसामान्यांना मिळणाऱ्या पिठाच्या किमतीत वाढ होत आहे.