Examination fee: शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती लक्षात घेता विदर्भातील संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय घेतला आहे. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांना येत्या शैक्षणिक वर्षापासून परीक्षा फी माफ केली जाणार आहे. निसर्गाच्या अवकृपेमुळे या वर्षी शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती डबघाईला आली. अवकाळी पावसामुळे झालेले नुकसान शेतकऱ्याला सहन करावे लागत आहे.
घरात कापूस भरलेला आणि घराचे छत फाटलेले, पावसाचे पाणी घरात आले असतांना शेतकऱ्याने करायचे तरी काय? त्याचबरोबर शेतात काही उन्हाळी पिके आहेत त्याचे सुद्धा मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अशा परिस्थितीमध्ये मुलांचा शैक्षणिक खर्च शेतकऱ्याला झेपणारा नाही. ज्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केली त्यांच्या घराची जबाबदारी त्यांच्या पत्नीवर आली. मुलांचे शिक्षण करणार की, शेतीची कामे? त्यावर आणखी कर्जाचा बोजा. या सर्व बाबी लक्षात घेऊन आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांना परीक्षा फी माफ करण्यात यावी, असे अमरावती विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी सांगितले.
शहीद सैनिकांच्या मुलांचेदेखील परीक्षा शुल्क माफ होणार
'एआयएसएफ'चे सिनेट सदस्य प्रा. कैलास चव्हाण यांनी परीक्षा फी माफ करण्याबाबत ठराव मांडला होता तो एकमताने मंजूर करण्यात आला. मूळ ठरावामध्ये आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांचा उल्लेख केलेला नव्हता, सैन्यातील शहिदांच्या पाल्यांची फी माफ करण्यात यावी, इतकेच त्या प्रस्तावामध्ये होते. अमरावती विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांचा देखील यामध्ये समावेश करण्यात यावा असे आदेश दिले. त्यानंतर शहीद सैनिकाचे मुलं तसेच आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचे मुलं अशा दोघांचे परीक्षा फी माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला.
जाहीर केलेल्या मदतीसाठी पात्र असलेल्या विद्यार्थ्यांची यादी प्रत्येक महाविद्यालयाकडून मागविली जाईल. पश्चिम विदर्भातील अमरावती, अकोला, बुलडाणा, वाशीम व यवतमाळ हे या विद्यापीठाचे कार्यक्षेत्र आहे. या भागात शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण सर्वाधिक असल्याने शेतकऱ्यांच्या मुलांना शिक्षणासाठी मदत करणे हे संत गाडगेबाबांच्या दशसूत्रीतील एक सूत्र विद्यापीठाने पूर्ण करण्याचा निर्णय घेतला आहे.
कोणते शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची फी माफ केली जाणार?
लाभार्थी विद्यार्थ्यांच्या पदवी, पदव्युत्तर, पीएचडी व विद्यापीठाशी संबंधित इतर सर्व अभ्यासक्रमासाठी फी माफ केली जाईल. पात्र विद्यार्थ्यांना प्रवेश फी, परीक्षा फी व इतर सर्व प्रकारच्या फी माफ केल्या जाईल.