इव्हा (Eva) ही देशातली पहिली सौरऊर्जेवर (First Solar Car in India) चालणारी कार भारतात लाँच झाली आहे. पुण्यातली एक स्टार्ट अप कंपनी वायवे मोबिलिटीने (Vayve Mobility) ही कार बनवली आहे. या गाडीच्या छतावर सौरऊर्जा पॅनल (Solar Panel) बसवण्याची सोय असेल. आणि हे पॅनल कंपनीकडून वेगळं विकत घ्यावं लागेल. अशा प्रकारची देशातली ही पहिलीच कार असेल
पुढे एक चालकाची सीट आणि मागे दोन प्रवासी (1+2) बसण्याची सोय या गाडीत आहे. गाडीचा आकार अगदी रिक्षेएवढा आहे. त्यामुळे सुटसुटीत, सोपी आणि आनंददायी सफर देणारी कार अशी तिची जाहिरात करण्यात येतेय.
गाडीचं मॉडेल आकर्षक आहे. आणि एका चार्जवर गाडी 250 किलोमीटरचा टप्पा गाठू शकते, असा वायवे कंपनीचा दावा आहे. शहरांतर्गत प्रवासासाठी ही छोट्या कुटुंबाची कार असेल असं कंपनीचं म्हणणं आहे. सुरुवातीला पुणे आणि बंगळुरू इथं ही गाडी लाँच करण्यात येणार आहे.
इलेक्ट्रिक चार्जिंग पॉइंट बरोबरच छतावर बसवण्यासाठी सौरऊर्जा पॅनल कंपनीने तयार केलंय, जे ग्राहकांना वेगळं खरेदी करावं लागेल. आणि गाडीची बॅटरीही या सौरऊर्जेतून चार्ज होऊ शकेल. शिवाय गाडी या ऊर्जेवर चालूही शकेल.
इलेक्ट्रिक कार प्रकारातली ही देशातली पहिली सौरऊर्जा कार आहे. यापूर्वी अमेरिका आणि युरोपमध्ये यावर प्रयोग झाले आहेत. आणि तिथेही छोट्या आकाराच्या अशा गाड्या वापरल्या जातात. भारतात सौर कारची किंमत नेमकी किती असेल हे अजून स्पष्ट करण्यात आलेलं नाही.