31 मार्चला जुन्या आर्थिक वर्षाची सांगता झाली आणि 1 एप्रिल 2023 पासून नवीन आर्थिक वर्ष सुरु झाले. या नव्या आर्थिक वर्षात अनेक संस्थांनी आणि बँकांनी त्यांच्या गुंतवणूक योजनेमधील व्याजदरात वाढ केली आहे. सरकारच्या अनेक योजनांपैकी ‘कर्मचारी भविष्य निर्वाह निधी’ (EPF) आणि ‘पब्लिक प्रॉव्हिडंट फंड’ (PPF) या योजनेमध्ये आपल्यापैकी अनेक जणांनी गुंतवणूक केली आहे. नव्या आर्थिक वर्षात या योजनांच्या व्याजदरात सरकारने काय बदल केलेत आणि या दोन्ही योजनांमध्ये नेमका फरक काय आहे? हे आपण समजून घेणार आहोत.
EPF आणि PPF या दोन्ही सरकारी योजना असल्या तरी यामध्ये फरक आहे. तो आपण साध्यासोप्या भाषेत समजून घेऊयात.
EPF म्हणजेच ‘कर्मचारी भविष्य निर्वाह निधी’. एखाद्या कंपनीमध्ये 20 पेक्षा जास्त कर्मचारी काम करत असतील, तर त्यांना ही सुविधा देण्यात येते. यामध्ये पगारदार व्यक्तीचे EPF खाते उघडण्यात येते. खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना देखील EPF ची सुविधा देण्यात येते.
हे EPF खाते कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संस्थेच्या माध्यमातून चालवण्यात येते. यामध्ये कर्मचाऱ्याच्या मूळ पगारातील 12 टक्के रक्कम EPF खात्यात जमा केली जाते, ज्यामध्ये कंपनी तितकीच रक्कम जमा करते. या खात्यावरील व्याजदर हे वार्षिक आधारावर मोजले जाते. अडचणीच्या परिस्थितीत यातील रक्कम कर्मचाऱ्याला काढता येते, मात्र यासाठी नियम घालण्यात आले आहेत.
PPF म्हणजे ‘सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी’. या सरकारी योजनेत कोणतीही सर्वसामान्य व्यक्ती गुंतवणूक करू शकते. त्यासाठी त्याला पोस्ट ऑफिसमध्ये किंवा जवळच्या बँकेत जाऊन PPF खाते ओपन करावे लागते. या खात्यात किमान 500 रुपयांपासून गुंतवणूक करता येते. ही गुंतवणूक मासिक स्वरुपात केली जाते. यातील गुंतवणूकीला 15 वर्षांचा लॉक इन पीरिअड ठेवण्यात आला आहे.
नव्या आर्थिक वर्षात कोणत्या योजनेचा व्याजदर वाढला?
सध्या देशात EPF चे 6.5 कोटीहून अधिक सभासद आहेत. नव्या आर्थिक वर्षात सरकारने EPF योजनेतील व्याजदरात 0.05 टक्क्यांची वाढ केली आहे. या वाढीसह EPF मध्ये मिळणारा व्याजदर आता 8.15 टक्के झाला आहे. तर PPF योजनेतील व्याजदरात सरकारने कोणतेही बदल केलेले नाही. सध्या एप्रिल ते जून या तिमाहीसाठी या योजनेत 7. 1 टक्के व्याजदर तसाच ठेवण्यात आला आहे.