नावी म्युच्युअल फंडाने करबचत करणारा पॅसिव्ह ईएलएसएस फंड प्रकारात नावी ईएलएसएस टॅक्स सेव्हर निफ्टी 50 इंडेक्स फंड बाजारात दाखल केला आहे. नवीन फंड ऑफर (एनएफओ) 14 फेब्रुवारी 2023 पासून खुला झाला असून 28 फेब्रुवारी 2023 ला बंद होणार आहे. थेट योजनेत खर्च गुणोत्तर 0.12 टक्के इतके प्रमाण असणारा हा फंड भारतात ईएलएसएस फंड प्रकारात सर्वाधिक कमी खर्चिक करबचत फंड असल्याचा दावा कंपनीने केला आहे. (Navi ELSS Tax Saver Nifty 50 Index Fund Opens for Subscription)
आयकर कलम 80 सी अंतर्गत या फंडाला फक्त तीन वर्ष इतका कमी मुदतबंद कालावधी लागू आहे. मुदतबंद कालावधीनंतर या फंडातून बाहेर पडताना कोणतेही मुदत निर्बंध शुल्क आकारले जात नाहीत. या फंडात गुंतवणूकदार अगदी कमीत कमी पाचशे रुपयांपासून सुरुवात करु शकतात, असे कंपनीने म्हटले आहे.
सध्या करबचतीच्या इक्विटी लिंक्ड सेव्हिंग्ज स्किम (ईएलएसएस) राबवत असलेल्या फंडांसाठी सेबीने नुकत्याच जारी केलेल्या नवीन नियमावलींमुळे कार्यरत योजनांमध्ये गुंतवणूकीचा ओघ नियंत्रित झाला आहे. त्यामुळे पॅसिव्ह प्रकारात ईएलएसएस योजना सुरु करणे फंडाना शक्य झाले आहे. नावी ईएलएसएस टॅक्स सेव्हर निफ्टी फिफ्टी इंडेक्स फंड योजनेच्या शुभारंभामुळे या नियमावलींचा लाभ घेणारा नावी हा भारतातील पहिला म्युच्युअल फंड ठरला आहे.
म्युच्युअल फंड ग्राहकांच्या प्रमुख समस्यांवर तोडगा मिळवून देण्यावर लक्ष केंद्रीत करणारा नावी ईएलएसएस टॅक्स सेव्हर निफ्टी फिफ्टी इंडेक्स फंडाच्या माध्यमातून नावीने खास फंड बाजारात आणला आहे. योग्य मूल्यात कर-बचत करणाऱ्या गुंतवणूक प्रकारात अप्रत्यक्ष (पॅसिव्ह) प्रकारे गुंतवणूक करणारा हा फंड ग्राहकाभिमुख योजनेचे आणखी एक उदाहरण असल्याचे नावी समूहाचे सहसंस्थापक सचिन बन्सल यांनी सांगितले. या एनएफओत गुंतवणूकदार 14 ते 28 फेब्रुवारी 2023 दरम्यान गुंतवणूक करु शकतात. त्यासाठी नावी अॅप अथवा म्युच्यूअल फंडाच्या विविध गुंतवणूक साधनांचा वापर करु शकतात.
ELSS म्युच्युअल फंडात कशी गुंतवणूक करावी? (How to Invest in ELSS?)
ELSS मध्ये गुंतवणूक करायची असल्यास गुंतवणूकदार आर्थिक सल्लागाराशी किंवा ऑनलाइन म्युच्युअल फंड ऑफर करणाऱ्या वेबसाईट्स, शेअर ब्रोकर्स किंवा बँक यांच्याशी संपर्क साधू शकता. या म्युच्युअल फंडात किती पैसे गुंतवायचे हे फंडाची मागील कामगिरी पाहून ठरवता कामा नये. जर तुम्ही सल्लागाराची मदत घेतली तर ते सर्व धोके लक्षात घेऊन योग्य सल्ला देऊ शकतात. त्यात गुंतवणूक करण्यासाठी डायरेक्ट प्लान किंवा रेग्युलर प्लॅन घेता येईल. डायरेक्ट प्लॅनमध्ये तुम्ही स्वतः स्कीम निवडू शकता आणि नियमित प्लॅनमध्ये तुम्हाला सल्लागाराची मदत घ्यावी लागेल.
आयकर कलम 80 सी अंतर्गत मिळेल कर बचतीचा लाभ
आयकर कलम 80 सी अंतर्गत उपलब्ध असलेल्या अनेक पर्यायांपैकी ईएलएसएस हा फक्त एक पर्याय आहे. कर्मचारी प्रॉव्हिडंट फंड (ईपीएफ), शाळेची फी, जीवन विमा प्रीमियम अशा पर्यायांचा वापर करून 1.50 लाख रुपयांची मर्यादा पूर्ण करू शकतात. ईपीएफ हा स्वयंरोजगारीत लोकांसाठी उपलब्ध नसला तरी इतर सर्व पर्याय उपलब्ध आहेत. तुम्हाला तुमच्य धोरणात्मक समभाग वितरणाचा भाग म्हणून ईएलएसएसचा विचार करायचा असल्यास संपूर्ण वर्षभरात सिस्टेमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनद्वारे (एसआयपी) गुंतवणूक करणे उत्तम ठरेल, असा सल्ला जाणकारांकडून दिला जातो. ‘ईएलएसएस’चा पर्याय घ्यायचा ठरवले असल्यास प्रत्येक वर्षी वेगवेगळा निवडायची गरज नाही. उत्तम फंड मॅनेजर्सकडून दीर्घकालीन ट्रॅक रेकॉर्डसह चालवल्या जाणाऱ्या अनेक योजना उपलब्ध आहेत. इतर बाबी चांगल्या असेपर्यंत तुमच्या विद्यमान गुंतवणुकीत भर घालण्यात काहीही धोका नाही. ईएलएसएस ही तीन वर्षांसाठी लॉक केलेली असते. या तीन वर्षांच्या कालावधीत बाजारात चढउतार होऊ शकतात. त्यामुळे अलीकडेच इंडेक्स कमी झाला (किंवा वाढला) आहे म्हणून ‘ईएलएसएस’मध्ये गुंतवणूक करणे किंवा न करणे ही गोष्ट समस्येकडे पाहण्याची उत्तम पद्धत नाही.