Twitter New Logo: मागील वर्षी ट्विटर कंपनी विकत घेतल्यानंतर एलन मस्क यांनी एकापाठोपाठ एक धडाकेबाज निर्णय घेतले आहेत. त्याच साखळीतील मस्क यांचा आणखी एक निर्णय ट्विटरचा चेहरामोहरा बदलून टाकणार आहे. ट्विटरचा आयकॉनिक पक्षाचा लोगो बदलणार असल्याची घोषणा एलन मस्क यांनी केली आहे. नवा लोगो कसा असेल याची झलकही त्यांनी शेअर केली आहे.
ट्विटरचा लोगो बदलणार असल्याची घोषणा त्यांनी रविवारी केली. त्यांच्या या घोषणेनंतर ट्विटरवर चर्चेला उधाण आले. अनेकांनी हा निर्णय चुकीचा ठरेल असे ट्विट केले तर काहींनी मस्क यांच्या या निर्णयाचे स्वागत केले.
कसा असेल ट्विटरचा नवा लोगो?
एलन मस्क यांना अल्फाबेटमधील X लेटर अतिशय प्रिय आहे. हे लेटर ट्विटरचा लोगो म्हणून ठेवण्यात येणार आहे. पांढरा आणि काळ्या रंगामध्ये X लेटर ट्विटरचा नवा लोगो असणार आहे. मस्क यांनी ट्विटर फॉलोवर्सलाही नव्या लोगोची डिझाइन कशी असावी, याबाबत आयडिया मागितल्या आहेत. युझर्सनी इंटरनेटवर x.com असे सर्च केल्यास ट्विटरचे संकेतस्थळ सुरू होत आहे.
एलन मस्क यांची स्पेस एक्स या कंपनीच्या नावात सुद्धा एक्स लेटर आहे. तसेच ट्विटर कंपनी एक्स कॉर्प या नावाने नोंदणी केली आहे. ट्विटर अॅप फॉर एव्हरिथिंग अशी जाहिरात मस्क यांच्याकडून केली जात आहे. म्हणजेच मेसेजिंगशिवाय इतरही अनेक गोष्टी येत्या काळात ट्विटरवर करता येतील, असे सुतोवाच त्यांनी केले आहेत.
ट्विटरमध्ये नवीन फिचर्स काय असतील?
ट्विटरचा लोगो बदलून एलन मस्क थांबणार नाहीत. येत्या काळात ते ट्विटरमध्ये अनेक फिचर्स अॅड करणार आहेत. ऑनलाइन पेमेंट, बँकिंग, ऑडिओ, व्हिडिओ, मेसेजिंग, जॉब सर्च सह इतरही नवीन फिचर्स ट्विटरमध्ये पाहायला मिळतील. चिनी वुईचॅटच्या या अॅपसारखे ट्विटर होऊ शकते. ट्विटरचे उत्पन्न वाढवण्यासाठी मस्क यांच्याकडून नवनवीन संकल्पना राबवण्यात येत आहेत.