गेल्या वर्षभरात ट्वीटरमध्ये खूप महत्वाचे बदल झाले आहेत. आता तर ट्वीटरचे नाव आणि लोगो देखील बदलला आहे. आता ट्वीटर ‘एक्स’ नावाने ओळखले जात आहे. कंपनीने तर आता पेड वेरीफिकेशन आणि सबस्क्रिप्शनची (Paid Verification and Subscription) ऑफर ग्राहकांना दिली आहे. याआधी ग्राहकांना मोफत वापरता येणारे ‘एक्स’ आता वार्षिक शुल्क देऊन वापरावे लागत आहे. तसेच पेड सबस्क्रिप्शन घेणाऱ्यांना अधिक सुविधा देण्यात येत आहे.
एलन मस्क आता यावरच थांबणार नाहीये तर ते आता येणाऱ्या काळात X वर पेमेंट सुविधा देखील आणण्याच्या तयारीत आहे. यासाठी कंपनीने एक योजना आखली असून याबाबत सर्व शक्यता तपासून घेतल्या जात आहेत. लवकरच ही सुविधा ग्राहकांसाठी सुरु केली जाईल असा अंदाज आहे.
‘X’ ने पेमेंट सुविधा आणल्यानंतर गुगल पे, पेटीएम आदी डिजिटल पेमेंट प्लॅटफॉर्म सुविधा देणाऱ्या कंपन्यांची स्पर्धा वाढणार आहे.
a hint of what's to come... (in higher res) pic.twitter.com/bMeKX1bgb7
— Linda Yaccarino (@lindayaX) September 21, 2023
‘X’ च्या सीईओ लिंडा याकारिनो (linda yaccarino) यांनी एक्सवर एक व्हिडियो शेयर केला आहे. या व्हिडियोत त्यांनी एक्सच्या आजवरच्या सुविधांची माहिती दिली आहे. सोबतच येणाऱ्या काळात एक्सवर पेमेंट सुविधा देखील समाविष्ट होणार आहे याचे संकेत दिले आहेत. लिंडा यांनी हा व्हिडियो शेयर केल्यानंतर डिजिटल पेमेंटची सुविधा लवकरच आणली जाईल असा कयास बांधला जात आहे.
सबस्क्रिप्शन धारकांना मिळेल सुविधा?
आधीच सांगितल्याप्रमाणे ब्लू टिक वेरीफेकेशन करण्यासाठी युजर्सला पैसे मोजावे लागत आहेत. 900 रुपये दरमहा असा या सबस्क्रिप्शनचा दर आहे. सबस्क्रिप्शन घेतलेल्या युजर्सला कंपनी अधिक कालावधीचा व्हिडियो पोस्ट करण्याची, मोठमोठे लेख पोस्ट करण्याची सुविधा देत आहे. ‘X’ ने पेमेंट सुविधा आणल्यानंतर ही सुविधा देखील केवळ पेड युजर्सलाच मिळणार आहे असे जाणकारांचे म्हणणे आहे.