आकर्षक जाहिरातींचा सोशल मिडियावर खुबीने वापर करुन फसवणूक करण्याचे प्रकार गेल्या दोन तीन वर्षात वाढले आहेत.परदेशात हमखास नोकरी मिळेल या आमिषाने शिक्षण क्षेत्रात सर्रास फसवणूक केली जाते.असाच एक फसवणुकीचा प्रकार बंगळुरात समोर आला आहे. सुमारे 2000 विद्यार्थ्यांची फसवणूक 18 रुपयांना फसवणूक केल्या प्रकरणी गिकलर्न या कंपनीच्या सीईओला अटक करण्यात आली आहे.
डेटा सायन्स कोर्ससाठी शैक्षणिक कर्ज मिळवून देतो असे आश्वासन देऊन गिकलर्नचा सीईओ श्रीनिवास याने 2000 विद्यार्थ्यांची फसवणूक केली आहे.श्रीनिवास याने प्रत्येक विद्यार्थ्याची किमान 2 लाख रुपयांची फसवणूक केल्याचे बोलले जाते. या शैक्षणिक कर्जाच्या फसवणुकीतून 18 कोटींचा घोटाळा झाला आहे.
एका 26 वर्षीय विद्यार्थ्याने डेटा सायन्स कोर्ससाठी डिसेंबरमध्ये प्रवेश घेतला होता. यात कंपनीने विद्यार्थ्याला नोकरी मिळेपर्यंत कर्जाचा मासिक हप्ता भरला होता. मात्र त्यानंतर ईएमआय भरणे बंद करण्यात आले.विद्यार्थ्याच्या खात्यात पैसे जमा करणे देखील तिसऱ्या महिन्यापासून थांबवण्यात आले. त्यानंतर करार काही कारणास्तव रद्द झाला असे सांगून उर्वरित रकमेची मागणी कंपनीकडून करण्यात आली.
गिकलर्नकडे शैक्षणिक कर्जाच्या निधीचा गैरवापर केल्याचे लक्षात येताच या विद्यार्थ्याने पोलीसांत तक्रार केली. त्याशिवाय ज्यांनी ऑनलाईन कोर्स पूर्ण केला नाही त्यांना नोकरी मिळणे अवघड बनले होते. एका तक्रारीवरुन या सगळा फसवणुकीचा प्रकार समोर आला. याच कंपनीचे दोन अधिकारी रामन आणि अमन यांचा पोलीस शोध घेत आहे.
गिकलर्नने शैक्षणिक कर्जातून अनेकांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. आतापर्यंत 13 विद्यार्थ्यांनी पुढे येत कंपनीविरोधात तक्रार केली असल्याचे पोलीसांनी म्हटले आहे. गिकलर्नमुळे महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेशातील विद्यार्थ्यांची फसवणूक झाल्याची शक्यता वरिष्ठ पोलीस अधिकारी पी. क्रिष्णनाथ यांनी व्यक्त केली.