देशाच्या एकूण खाद्यतेल आयातीत पाम तेलाचा 60% वाटा आहे. काही दिवसांपूर्वी पाम तेलाच्या किमती 1791 डॉलर प्रति टन या किमतीवरून 1,030 डॉलर प्रति टन म्हणजेच 42% इतकी घसरली आहे. पाम, सोयाबीन आणि सूर्यफूल तेलाच्या जागतिक किमतीत घसरण झाल्यामुळे चालू वर्षाच्या पहिल्या पाच महिन्यांत (नोव्हेंबर-डिसेंबरसह) खाद्यतेलाच्या आयातीत लक्षणीय वाढ झाली आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेने खाद्यतेलाच्या आयातीत 23.7 टक्के वाढ झाली आहे.
Table of contents [Show]
मोहरी व सोयाबीनच्या किमतीत घसरण
गेल्या काही महिन्यात सूर्यफूल व मोहरी या खाद्य तेलाच्या किमतीत घट झाल्यामुळे आयात वाढली आहे. यामुळे खाद्यतेलावर प्रक्रिया करणाऱ्या कंपन्यांनी आयात शुल्कात वाढ करण्याची मागणी केली आहे. पाम तेलाची मोठ्या प्रमाणात आयात केल्यामुळे खाद्यतेलाच्या किमती कोसळल्या आहेत. याचा परिणाम थेट तेलबिया शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर दिसून येत आहे.
तेल आयातीवर आकारला जाणारा कर
क्रूड पाम, सोयाबीन आणि सूर्यफूल तेलाच्या आयातीवर 5% कृषी कर व 10 टक्के उपकर आकारला जातो. व्यापारी संस्था सोयाबीन प्रोसेसर्स असोसिएशन ऑफ इंडिया (SOPA) च्या मते, सप्टेंबर ते मार्च (2022-2023) दरम्यान, आयात केलेल्या कच्च्या सोयाबीन तेलाच्या किंमतीत 31% ने घट झाली आहे; त्याचप्रमाणे खाद्य तेलाच्या किमतीत प्रचंड घसरण झाल्यामुळे तेलबियांच्या किमतीत घसरण झाली आहे. जागतिक स्तरावर खाद्यतेलाच्या किमती कोसळल्यानंतरही अत्यंत कमी आयात शुल्क ठेवण्याच्या सरकारच्या निर्णयामुळे तेल व्यावसायिक नाराज आहेत, असे SOPA चे अध्यक्ष डेविश जैन यांनी म्हटले आहे.
एकूण वापरापैकी 56% पामतेलाची आयात
देशातील पाम तेलाच्या एकूण वापरापैकी 56% पाम तेलाची आयात केली जाते. इंडोनेशिया आणि मलेशिया येथून दरवर्षी सुमारे 8 मेट्रिक टन पाम तेल आयात केले जाते. तेलबिया व्यापाराचे प्रमुख केंद्र असलेल्या राजस्थानमधील भरतपूर मंडईत मोहरीचे भाव सध्या सुमारे 5,100 ते 5,200 रुपये क्विंटल आहे. ही किंमत MSPच्या खाली आली आहे.
वनस्पती व अखाद्य तेलाची आयातही वाढली
खाद्य व अखाद्य वनस्पती तेलाची आयात मार्चमध्ये 6 टक्क्यांनी वाढून 11,72,293 टन झाली. जी मागील वर्षी म्हणजे मार्च 2022 मध्ये 11,04,570 टन होती. नोव्हेंबर ते मार्च या कालावधीत खाद्यतेलाव्यतिरिक्त इतर अखाद्य तेलांच्या आयातीत घट झाली असून पहिल्या 5 महिन्यांत ती 79,828 टन झाली आहे. याआधी, मागील वर्षाच्या पहिल्या पाच महिन्यांत ही आयात 1,52,810 टन होती.