Hero Moto Corp ED raid: दुचाकी निर्मितीतील आघाडीची कंपनी हिरो मोटो कॉर्पचे चेअरमन पवन मुंजाळ ED च्या रडारवर आले आहेत. मनी लाँड्रिंगप्रकरणी आज (मंगळवार) सक्तवसुली संचालनालय विभागाने त्यांच्या घरावर छापा मारला. दिल्ली, गुडगाव परिसरातील त्यांच्या निवासस्थानी कारवाई करण्यात आली.
परकीय चलन बाळगल्याप्रकरणी महसूल गुप्तचर (रेव्हेन्यू इंटेलिजन्स) विभागाकडून पवन मुंजाळ यांच्या निकवर्तीयाची चौकशी देखील सुरू आहे. या प्रकरणाचे धागेदोरे हिरो मोटो कॉर्पचे चेअरमन पवन मुंजाळ यांच्यापर्यंत येऊन पोहचले आहेत.
हिरो मोटो कॉर्पचा शेअर ढासळला
ईडीने दिल्ली, गुरवामध्ये छापे मारल्याची बातमी पसरताच हिरो मोटो कॉर्पचा शेअर साडेचार टक्क्यांनी म्हणजेच सुमारे 135 रुपयांनी खाली आला. सध्या शेअर 3,067 रुपयांवर ट्रेड करत आहे. छापेमारीची बातमी येण्यापूर्वी शेअर 3230 रुपयांपुढे होता. मात्र, ईडीच्या बातमीने गुंतवणुकदार संभ्रमात पडले आहेत.
शेल कंपन्यांद्वारे आर्थिक व्यवहाराचे आरोप
दरम्यान, हिरो मोटो कॉर्पविरोधात नियमांचे उल्लंघन केल्याचे आरोप मागील काही महिन्यांपासून होत आहेत. कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाने हिरो मोटो कॉर्पची चौकशी करण्याचे आदेश दिल्याची बातमी इकॉनॉमिक्स टाइम्स या वृत्तपत्राने दिली होती. हिरो मोटो कॉर्प निष्क्रिय कंपन्यांद्वारे (शेल कंपनी) आर्थिक व्यवहार करत असल्याचे आरोप होत आहेत. हिरो मोटो कॉर्पच्या सहयोगी उद्योगांची कंपनी रजिस्ट्रार कार्यालयाकडूनही सखोल चौकशी करण्यात येत आहे.
2022 साली आयकर विभागाची धाड
कर बुडवल्याच्या संशयावरून आयकर विभागाने मागील वर्षी मार्च महिन्यात हिरो मोटो कॉर्पच्या कार्यालयावर छापा मारला होता. त्यावेळीही कंपनीचे संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी पवन मुंजाळ यांच्या निवासस्थानाची झाडाझडती घेण्यात आली होती. हिरो ग्रुपच्या सहयोगी कंपनीकडून 800 कोटींचे बेकायदेशीर व्यवहार झाल्याचे चौकशीत पुढे आले होते.
दुचाकी निर्मितीत जगात पहिल्या क्रमांकावर
2001 साली हिरो मोटो कॉर्प जगातील पहिल्या क्रमांकाची दुचाकी निर्मिती कंपनी बनली होती. मागील 20 वर्षांपासून कंपनीने पहिले स्थान शाबूत ठेवले आहे. आशिया, आफ्रिका आणि दक्षिण अमेरिकेतील 40 पेक्षा देशांमध्ये हिरो कंपनीच्या गाड्यांची विक्री होते.