Pankaj Mehadia Investment Fraud: मुंबई आणि नागपूर शहरात सक्तवसुली संचलनालयाने (ED) धडक कारवाई करत 15 ठिकाणी छापेमारी केली आहे. या कारवाईत कोट्यवधी रुपयांची रोकड आणि दागिने जप्त करण्यात आले आहेत. पंकज मेहाडिया गुंतवणूक घोटाळा प्रकरणी ही छापेमारी केल्याचे सांगण्यात येत आहे. या कारवाईत ईडीच्या ताब्यात मोठा ऐवज लागला आहे. या कारवाईने मोठी खळबळ उडाली आहे.
दागिने आणि रोकड जप्त
ईडीने पंकज मेहाडिया, लोकेश आणि कार्तिक जैन यांनी केलेल्या गुंतवणूक व्यवहारांशी संबंधित मुंबई आणि नागपुरातील 15 ठिकाणी छापे टाकले आहेत. एएनआय वृत्तसंस्थेने याबाबतचे वृत्त दिले आहे. पंकज मेहाडिया हा एक मोठा गुंतवणूक घोटाळा असल्याचे पुढे येत आहे. या कारवाईत ईडीला 5.52 कोटी रुपयांचे बेहिशेबी दागिने आणि 1.21 कोटी रुपयांची रोकड सापडली आहे. या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे.
500 कोटी रुपयांच्या गुंतवणूक घोटाळा (Pankaj Mehadia Investment Fraud)
पंकज मेहाडिया यांनी नागपुरातील काही व्यापाऱ्यांना गुंतवणुकीवर जास्त परतावा देण्याचे आमिष दाखवले होते. अनेक व्यापाऱ्यांनी त्यांच्याकडे पैसे दिले होते. मात्र, गुंतवणुकदारांना कोणत्याही प्रकारचा परतावा देण्यात आला नाही. सोबतच त्यांचे पैसेही परत केले नाहीत. फसवणूक झालेल्या काही व्यापाऱ्यांनी नागपूर पोलिसांकडे याबाबत 2021 साली तक्रार दाखल केली होती. तेव्हा फसवणुकीचा गुन्हाही दाखल झाला होता. त्यानंतर हे प्रकरण ईडीच्या ताब्यात देण्यात आले होते. शुक्रवारपासूनच ईडीने छापे मारण्यास सुरुवात केली आहे.
12 टक्के व्याजाचे आमिष दाखवून पंकज मेहाडियाने अनेक गुंतवणूकदारांची फसवणूक केली होती. (Pankaj Mehadia Investment Fraud) याप्रकरणी पंकजसह त्याची आई प्रेमलता नंदलाल मेहाडिया, लोकेश आणि कार्तिक जैन, बालमुकुंद लालचंद केयाल यांच्याविरोधात यापूर्वी गुन्हा दाखल केला आहे. अशातच आता पंकज मेहाडिया आणि त्याच्याशी संबंधित सुमारे 15 ठिकाणांवर ईडीने छापेमारी केली आहे. या छापेमारीत आता मोठी रक्कम हाती लागल्याचं समोर आले आहे.