Gharkul Scheme: अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पाचा फायदा पुणेकरांना होणार आहे. कारण पुणे महानगरपालिकेने बंद केलेली ‘घरकुल योजना’ अर्थसंकल्पात जाहीर केलेल्या ‘पंतप्रधान आवास योजने’मुळे पुन्हा सुरू होणार आहे. त्यामुळे ही योजना पुणेकरांसाठी फायदेशीर ठरली आहे.
का बंद पडली घरकुल योजना? (Why was the Gharkul Scheme Closed)
पुणे महानगरपालिकेने घरकुल योजना सुरू केली होती. या योजनेअंतर्गत पुणे महानगरपालिकेने पंतप्रधान आवास योजनेतून आर्थिक स्थिती कमकुवत असलेल्या कुटुंबांना 2 हजार 607 घरे बांधण्याचे नियोजन केले होते. पण केंद्र शासनाने या योजनेचे अनुदान बंद केल्याने ही घरकुल योजना रद्द करण्यात आली होती. आता, मात्र काल सादर झालेल्या अर्थसंकल्पात पंतप्रधान आवास योजनेसाठी 69 हजार कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे घरकुल योजनेला मोठा आधार मिळाला आहे. त्यामुळे पुणे महानगरपालिकेने ही बंद पडलेली योजना पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच या घरकुल प्रकल्पाची उभारणी बाणेर, बालेवाडी, कोंढवा, धानोरी, हडपसर याठिकाणी पुन्हा सुरू केली जाणार आहे.
पुणे महानगरपालिकेचे प्रकल्प (Projects of Pune Municipal Corporation)
पुणे महानगरपालिकेव्दारे सातत्याने अल्प उत्पन्न गटातील नागरिकांना कमी किंमतीत फ्लॅट देण्याचे प्रयत्न सुरू असते. पालिकेने या माध्यमातून हडपसर येथे तीन तर वडगाव बुद्रूक, खराडी येथे प्रत्येकी एक प्रकल्प सुरू केले आहे. या पाच ठिकाणी 2900 फ्लॅट उपलब्ध करून दिले आहेत. तसेच याठिकाणी लॉटरी काढून नागरिकांना घराचे वाटपदेखील करण्यात आले आहे. मार्च महिन्यात लाभार्थ्यांना घराचा ताबा मिळणार असल्याची शक्यता आहे. महापालिकेने नागरिकांना 11 लाख रुपयांचे 330 चौरस फुटांचे घर उपलब्ध करून दिले आहे. यामध्ये पार्किंग, उद्यानासह इतर अनेक सुविधांचा समावेश आहे. यासाठी केंद्राकडून पुणे महानगरपालिकेला 13 कोटी व राज्याकडून 3 तीन कोटी रुपयांचे अनुदान मिळाले आहे. आता अर्थसंकल्पामुळे या योजनेसाठी मोठा दिलासा मिळाला आहे.