सध्या जगभरातील स्टार्टअप्स कंपन्यांना आर्थिक मंदीचा सामना करावा लागत आहे. बंगळुरु स्थित स्टार्टअप कंपनी कू (Koo) म्हणजेच देशी ट्विटर या नावाने आपल्या सर्वांच्याच परिचयाची आहे. अनेक मोठमोठ्या कंपन्यांप्रमाणे या कंपनीने देखील कर्मचारी कपात केली आहे. एकूण कर्मचारी संख्येपैकी कंपनीने 30% कर्मचाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवला आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून कंपनीला आर्थिक तोटा सहन करावा लागत असल्याने आणि नवीन फंडिंग मिळत नसल्याने हा निर्णय घेतल्याचे कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सांगितल्याचे मीडिया रिपोर्ट्समधून कळते.
30 % कर्मचारी झाले बेरोजगार
स्टार्टअप कू (Koo) कंपनीसोबत गेल्या तीन वर्षांपासून 260 कर्मचारी काम करत होते. यामधून कंपनीने 30 % कर्मचाऱ्यांची कपात केली आहे. यामुळे अंदाजे 40 लोकांना नोकरी गमवावी लागणार आहे. याबाबत कंपनीने ग्लोबल सेंटीमेंटचे कारण पुढे करत कंपनी सध्या कार्यक्षमेतवर भर देत असल्याचे सांगत आहे. कंपनीच्या मॅनेजमेंटने सध्या कंपनीचा आर्थिक स्तर सुधारण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे. कपात करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांना कंपनीकडून हेल्थ इन्शुरन्स (Health Insurance) दिला जाणार आहे. त्याचबरोबर कमी केलेल्या कर्मचाऱ्यांना नवीन नोकरी (New Job) शोधण्यासाठी कंपनी मदत करणार आहे.
'कू' वर 6 कोटीहून अधिक युझर्स
ट्विटर आणि भारतीय अधिकाऱ्यांमध्ये ज्यावेळी वाद सुरु झाला होता, त्यावेळी कू कंपनीला याचा फायदा झाला होता. त्यावेळी अनेक सिनेकलाकार क्रिकेटर्स आणि सरकारी अधिकाऱ्यांनी भारतीय मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्म असणाऱ्या कू या भारतीय सोशल प्लॅटफॉर्मला पाठींबा दिला होता. त्या दरम्यान कू चे युझर्स झपाट्याने वाढायला सुरुवात झाली होती. वाढती युझर्सची संख्या पाहून कू कंपनीमध्ये टायगर ग्लोबलने पैसे गुंतवले होते. सध्या कू या सोशल प्लॅटफॉर्मवर एकूण 6 कोटीहून अधिक युझर्स ॲक्टिव्ह आहेत.
Source: moneycontrol.com