तुम्ही जर येणाऱ्या सणासुदीच्या दिवसांत विमान प्रवास करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी वाचाच. ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात सणांचा हंगाम सुरु होणार आहे. गणेशोत्सव पाठोपाठ दसरा, दिवाळी सण येतोय, त्याचबरोबर वर्ल्ड कपचे क्रिकेट सामने देखील भारतात होऊ घातले आहे. या सगळ्यांचा परिणाम देशांतर्गत आणि आंतराष्ट्रीय विमान प्रवासावर पाहायला मिळणार आहे.
Table of contents [Show]
भाडेवाढ अटळ
ऐन सणासुदीच्या काळात ग्राहकांना विमान प्रवासासाठी भाडेवाढ सहन करावी लागणार आहे. याचे मुख्य कारण म्हणजे ‘गो फर्स्ट’ एयरलाईन्सचे दिवाळखोरी प्रकरण. 3 मे 2023 रोजी गो फर्स्ट या विमान कंपनीच्या विरोधात दिवाळखोरीची कारवाई सुरु करण्यात आली आहे. त्यामुळे कंपनीने त्यांची अनेक नियोजित उड्डाणे रद्द केली आहेत. पुढील दोन महिन्यातील सर्व नियोजित उड्डाणे कंपनीने रद्द केल्यामुळे प्रतिस्पर्धी विमान कंपन्यांनी तिकीट दरात वाढ केली आहे. ही विमान प्रवास भाडेवाढ राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय अशा दोन्ही विमान प्रवासावर पाहायला मिळणार आहे.
नागरिक उड्डयन मंत्रालयाची नजर
कोणती विमान कंपनी किती उड्डाणे करतील, कोणत्या मार्गावर करतील याची माहिती केंद्रीय नागरिक उड्डयन मंत्रालयाला देणे आवश्यक असते. मंत्रालयाने मंजुरी दिलेल्या मार्गावरच कंपन्यांना विमानसेवा देता येते. कोणतीही एअरलाइन्स दिलेल्या मर्यादेपेक्षा जास्त उड्डाणे करू शकत नाहीत. त्यामुळे ‘गो फर्स्ट’ विमान कंपनी दिवाळखोरीत निघाल्यानंतर इतर प्रतिस्पर्धी कंपन्यांनी मंत्रालयाकडे अतिरिक्त मार्गांवर विमानसेवा देण्यासाठी अर्ज केले होते.
ज्या मार्गावर ‘गो फर्स्ट’ विमान सेवा देत होती, त्याच मार्गावर बहुतांश कंपन्यांनी विमानसेवा देण्यासाठी अर्ज दखल केले होते. तुम्हांला माहितीच असेल की विमान तिकिटाचे दर हे ‘डायनॅमिक’ असतात. म्हणजेच मागणीनुसार तिकीट भाडेवाढ करण्याची मुभा विमान कंपन्यांना दिलेली असते. त्यामुळे गो फर्स्टचे प्रवासी आकर्षित करण्यासाठी इतर विमान कंपन्या निरनिराळ्या योजना आखताना दिसत आहे.
गो फर्स्ट ऐवजी कुणाला संधी?
मिडीया रिपोर्टनुसार, गो फर्स्टने दिवाळखोरी प्रकरण सुरु होण्याच्या आधीच काही मार्गांवर विमानसेवा देण्यासाठी अर्ज केला होता आणि मंजुरी देखील मिळवली होती. दर आठवड्याला मलेशियासाठी 3 हजार प्रवासी , दुबईसाठी 9 हजार प्रवासी, थायलंडसाठी 8 हजार प्रवासी आणि सिंगापूरसाठी 1200 प्रवासी वाहतुकीसाठी गो फर्स्टने मंजुरी मिळवली होती.
मात्र आर्थिक अडचणीत असलेल्या गो फर्स्टला या मार्गांवर विमानसेवा देता येत नाहीये आणि सरकारी विभागाकडून हे अधिकार इतर कंपन्यांना हस्तांतरित केले जात नाहीये. यामागे काही तांत्रिक अडचणी असल्याचे सांगितले जात आहे. मात्र यामुळे आधीच बुकिंग केलेल्या प्रवाशांना आणि बुकिंग करू इच्छिणाऱ्या प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागू शकतो.
सणासुदीत खिशाला कात्री
एवढेच नाही तर ऐन सणासुदीच्या काळात ग्राहकांना तिकीट मिळवण्यास अडचणींचा सामना करावा लागू शकतो. थायलंड, मलेशिया, दुबई, सिंगापूर येथे अनेक भारतीय कामानिमित्त, व्यवसायानिमित्त जात असतात, सणासुदीला घरी येण्यासाठी त्यांना अधिकचे पैसे मोजावे लागू शकतात. तसेच ऑक्टोबर महिन्यात भारतात दिल्ली, मुंबई, चेन्नई, अहमदाबाद येथे काही महत्वाचे सामाने होणार आहेत. यानिमित्त देखील क्रिकेटप्रेमी एका शहरातून दुसऱ्या शहरात जाण्यासाठी विमान प्रवासाचा पर्याय निवडू शकतात. क्रिकेटप्रेमींना देखील आता महाग विमानप्रवास करावा लागणार आहे.