Dream 11 New Guidelines: भारतातील फँटसी स्पोर्ट्स प्लॅटफॉर्म असणारी ड्रीम 11(Fantasy Sports Platform Dream 11) या कंपनीने एक नवीन गाईडलाईन काढली आहे. त्यामध्ये सुट्टीवर असणाऱ्या कर्मचाऱ्यांना ऑफिसमधील सहकारी किंवा बॉसकडून कामानिमित्त कोणताही त्रास सहन करावा लागणार नाही. नक्की काय आहे ही नवीन गाईड लाईन चला जाणून घेऊया.
ड्रीम 11 ची नवीन गाईडलाईन
ड्रीम 11 ने आपल्या नवीन गाईड लाईनमध्ये म्हटले आहे की, जे कर्मचारी रजेवर आहेत त्यांना कंपनीच्या कोणत्याही कर्मचाऱ्याने अगदी बॉसने देखील आपल्या कार्यालयीन कामादरम्यान (Official Work) त्यांना ईमेल, व्हॉट्सअॅप ग्रुप, स्लॅक किंवा कॉलवर त्रास देऊ शकत नाही. जर एखाद्या कर्मचाऱ्याने तसे केले तर त्याला 1 लाख रुपयांचा दंड भरावा लागणार आहे.
नवीन गाईडलाईन बनविण्याचे कारण काय?
सध्या कर्मचाऱ्यांचे जीवन अत्यंत त्रासदायक बनत चालले आहे. कोविड व त्यानंतर चालू झालेले वर्क फ्रॉम होम यामध्ये कर्मचारी सुट्टीवर असताना देखील वारंवार कंपनीकडून महत्त्वाचे कॉल, मेसेज किंवा ईमेल येतात. यामुळे कर्मचाऱ्याचे मानसिक स्वास्थ आणि कुटुंबासोबतचा वेळ वाया जातो. अशा घटनांमुळे कर्मचारी अशा ठिकाणी काम करण्यासाठी फार उत्सुकता दाखवत नाहीत व दीर्घकाळ कंपनीसोबत जोडले जात नाहीत. यावर पर्याय म्हणून आणि कर्मचाऱ्यांना त्यांच्या सुट्टीचा आनंद लुटता यावा याकरिता ड्रीम 11 ने ही नवीन गाईड लाईन आणली आहे. या गाईड लाईनचे सर्वच माध्यमातून कौतुक करण्यात येत आहे.
15 कोटीहून अधिक युजर्स
2008 मध्ये ड्रीम 11 या कंपनीची सुरूवात झाली. सध्या ड्रीम 11 चे 15 कोटीहून अधिक युजर्स मार्केटमध्ये आहेत. 2020 मध्ये ड्रीम 11 ने इंडियन प्रीमियर लीग (IPL) साठी शीर्षक प्रायोजक म्हणून काम केले होते. या कंपनीचे संस्थापक हर्ष जैन आणि भावित सेठ यांनी असा दावा केला आहे की, जर एखादा सहकाऱ्याने 'अनप्लग' वेळेदरम्यान दुसऱ्या इतर कर्मचाऱ्याशी संपर्क साधला तर त्याला किंवा तिला सुमारे 1 लाख रुपयांचा दंड भरावा लागेल. यामध्ये बॉसपासून नवशिक्यापर्यंत सर्वांचा समावेश करण्यात आला आहे.