Dr Reddy's Q4 Profit: फार्मा क्षेत्रातील आघाडीच्या डॉ. रेड्डी कंपनीच्या चौथ्या तिमाहीतील नफ्यात 959 कोटींची वाढ झाली. मागील वर्षी याच काळात कंपनीने फक्त 87.5 कोटी रुपये नफ्याची नोंद केली होती. मागील वर्षीच्या तुलनेत खूप जास्त नफा कमावल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. उद्या भांडवली बाजारात कंपनीच्या शेअर्सचा भाव वाढू शकतो.
भागधारकांना लाभांश जाहीर
कंपनीच्या संचालक मंडळाने 40 रुपये प्रति शेअर लाभांश देण्याची शिफारस केली आहे. वार्षिक सर्वसाधारण सभा (AGM) झाल्यानंतर पाच दिवसांनी लाभांशाचे वितरण केले जाईल.
मागील वर्षी नफा कमी का होता?
मागील वर्षी जानेवारी-मार्च तिमाहीत कंपनीने फक्त 87.5 कोटी नफा कमावला होता. जागतिक मंदीमुळे व्यवसायातील घट, अमेरिकन मार्केटमधील तीव्र स्पर्धा, मालमत्तेचे घसरलेले मूल्य याचा फटका कंपनीला बसला होता. मात्र, आता ही परिस्थिती बदलली आहे.
सौजन्य गुगल
कंपनीचा नफा 1,093.6 कोटी रुपये होईल, असा अंदाज विश्लेषकांनी वर्तवला होता. मात्र, हा अंदाज खरा ठरला नाही. चौथ्या तिमाहीत कंपनीचा महसूल 6296.8 हजार कोटी झाला. मागली वर्षीच्या तुलनेत ही वाढ 15.81 टक्के ठरली. FY22 च्या चौथ्या तिमाहीत महसुली नफा फक्त 5,436.8 कोटी इतका झाला होता.
नफा वाढण्यामागील प्रमुख कारणे
जेनेरिक औषध Revlimid आणि इतरही नवीन ब्रँड्सचा खप वाढल्याने नफाही जास्त झाला.. त्वचारोगावरील औषधांची विक्री चांगली झाल्याने कंपनीच्या नफ्यात 275 कोटींची भर पडली. विशेषत: अमेरिकेतील मार्केटमधून कंपनीला जास्त नफा झाला. देशांतर्गत औषध मिश्रण (फॉर्म्युलेशन) व्यवसायातही वाढ झाली. निकाल जाहीर करण्याआधी आज दिवसभर कंपनीचा शेअर सुमारे दीड टक्क्यांनी खाली आला. मात्र, उद्या निकालाचा सकारात्मक परिणाम दिसू शकतो.
फार्मा क्षेत्राची स्थिती
सनफार्मा, सिप्ला, डॉ. रेड्डी आणि डिव्हिस लॅब या कंपन्यांचा निप्टी 50 निर्देशांकात सर्वाधिक वाटा आहे. तर निफ्टी 50 निर्देशांकात एकूण फार्मा क्षेत्राचा वाटा 3.22% आहे. सध्याचे फार्मा कंपन्यांचे मूल्य चांगले आहे. पुढील 12 महिन्यात फार्मा कंपन्यांचा नफा आणखी वाढण्याची शक्यता आहे. ब्रँडेड औषध निर्मिती कंपन्याचा नफा 30%-90% दरम्यान वाढू शकतो, असा अंदाज वर्तवला जात आहे. त्यामुळे येत्या काळात फार्मा कंपन्यांमधील गुंतवणूक फायद्याची ठरू शकते, असा अंदाजही तज्ज्ञ वर्तवत आहेत.