Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Building Material: सिमेंट, विटांसह बांधकाम साहित्याची गुणवत्ता तपासली जाणार; निकृष्ट दर्जाचा माल ठरतोय धोकादायक

Building Material

सिमेंट, जिप्सम, विटा, टाइल्स यांची गुणवत्ता तपासण्याची कोणतीही सरकारी यंत्रणा नव्हती. मात्र, आता बांधकाम साहित्याची गुणवत्ता तपासण्यासाठी नियमावली तयार करण्यात येत आहे. निकृष्ट दर्जाच्या बांधकाम साहित्याची आयात रोखण्यासाठी हा निर्णय सरकारने घेतला आहे.

Building Material quality: भारतामध्ये बांधकाम क्षेत्राची झपाट्याने वाढ होत आहे. गृहनिर्माण आणि व्यावसायिक प्रकल्प उभे राहण्याचा वेग कोरोनानंतर वाढला आहे. मात्र, बांधकामासाठी वापरण्यात येणाऱ्या साहित्याची गुणवत्ता ढासळत चालली आहे. निकृष्ट दर्जाचे बांधकाम धोकादायक ठरू शकते. सिमेंट, जिप्सम, विटा, टाइल्स यांची गुणवत्ता तपासण्याची कोणतीही सरकारी यंत्रणा कार्यरत नव्हती. मात्र, आता बांधकाम साहित्याची गुणवत्ता सरकारकडून तपासण्यात येणार आहे.

53 बांधकामाशी संबंधित वस्तुंची यादी

डिपार्टमेंट फॉर प्रमोशन ऑफ इंडस्ट्री अँड इंटरनल ट्रेड (DPIIT) ने बांधकाम साहित्याची गुणवत्ता तपासण्यासाठी नियमावली तयार करण्यास सुरुवात केली आहे. मागील काही दिवसांपासून बांधकामासाठी आयात होणाऱ्या जिप्सप, अस्बेस्टॉस यासारखे मटेरियल निकृष्ट दर्जाचे येत आहे. त्यावर चाप बसवण्यासाठी गुणवत्ता तपासण्यात येणार आहे. 53 वस्तुंची यादी DPIIT ने तयार केली आहे.

निकृष्ट दर्जाच्या मालाची आयात बंद करून देशांतर्गत बांधकाम साहित्य निर्मितीसाठी प्रोत्साहन देणे, हा उद्देशही यामागे आहे. quality control orders (QCOs) असा ड्राफ्ट तयार करण्यात आला आहे. बांधकाम साहित्य निर्मिती करणाऱ्या कंपन्यांच्या प्रतिक्रिया आणि कमेंट्सही स्वीकारण्यात येत आहेत. त्यानुसार या ड्राफ्टमध्ये बदल करण्यात येणार आहेत. 

बांधकाम साहित्य निर्मिती कंपन्या, उद्योग संघ, राष्ट्रीय आणि राज्यनिहाय असोशिएशन्स, बांधकाम क्षेत्राशी निगडीत सरकारी विभाग, संस्थांना ड्राफ्टबाबत मत व्यक्त करण्यास वेळ दिल्याचे DPIIT ने म्हटले आहे. 20 फेब्रुवारीपर्यंत प्रतिक्रिया देण्यास वेळ दिला आहे. फ्लोअरिंग टाईल्स, पेविंग ब्लॉक, जिप्सम प्लास्टर बोर्डस, विटा, पल्वराइझ्ड फ्युअल अॅश यासह 53 साहित्यांची गुणवत्ता तपासण्यात येणार आहे.

मागील तीन वर्षात बांधकामासाठी लागणाऱ्या साहित्याच्या किंमती 32 टक्क्यांनी वाढल्या आहेत. तर दरवर्षी बांधकाम खर्चात 12 टक्क्यांनी वाढ होत आहे. त्यामुळे बांधकाम कंपन्यांना खर्च आणि त्यातून मिळणाऱ्या नफ्यावर परिणाम झाला आहे. त्याचाच परिणाम म्हणून घरांच्या किमतीही भरमसाठ वाढल्या आहेत. निकृष्ट बांधकाम साहित्यामुळे (Building Material quality) इमारतींची सुरक्षितता धोक्यात येऊ शकते. 

बांधकामाचा खर्च दिवसेंदिवस वाढत आहे. कमी खर्चात इमारत उभी करण्याकडे विकासकाचा कल असतो. त्यामुळे मागील काही वर्षात बांधकाम साहित्य वापरातही बदल घडून आले आहेत. उदाहरणार्थ, इमारतीला आतून सिमेंटचे प्लास्टर करण्याऐवजी दुसऱ्या मटेरिअलचे प्लास्टर करण्यात येते. मातीच्या विटांऐवजी सिमेंट ब्लॉक विटांचा वापर सुरु झाला आहे.