आपलं स्वतःच घर असावं असं प्रत्येकालाच वाटत. घर घेणे ही काही साधारण बाब नाही. आपल्याकडे उगाच ‘लग्न करावं बघून आणि घर पाहावं बांधून’ ही म्हण प्रचलित नाही. त्यामागे कितीतरी पिढ्यांचा अनुभव आहे. आपल्या आई-वडिलांना, आजी-आजोबांना देखील स्वतःच्या कष्टातून घर बांधताना हजारो अडचणींचा सामना करावा लागला आहे. आर्थिक नियोजन नसेल, पैशाचे व्यवस्थापन नसेल तर घर खरेदी करताना अथवा बांधताना असंख्य अडचणींना सामोरे जावे लागते. तरुण वयातच जर चांगल्या आर्थिक शिस्तीच्या सवयी लावून घेल्या तर आपल्याला आपली स्वप्ने पूर्ण करता येऊ शकतात.
घर घेण्यासाठी आता बँका कर्ज देखील देतात. गृहकर्जाचे व्याजदर दिवसेंदिवस वाढत चालले आहेत हे काही वेगळे सांगायला नको. महागाई देखील त्याच तेजीने वाढते आहे. त्यामुळे अशा महागाईच्या जमान्यात आपली स्वप्ने पूर्ण करणे जरा जिकीरीचे बनते. मुलांचे शिक्षण, लग्न-कार्य, आरोग्याच्या तक्रारी आदी गोष्टींचा खर्च कितीही टाळायचा प्रयत्न केला तरी करावाच लागतो. त्यामुळे घर घेण्याचे आपले प्लान मागेपुढे होत राहतात. बाकीच्याच गोष्टींमध्ये अडकून पडल्यामुळे अगदी उतारवयात काही लोकांची स्वतःची घरे होतात. कमी अधिक प्रमाणात सगळीकडे हेच चित्र आहे. सगळ्यांचीच आर्थिक परिस्थिती सारखी नसते. आर्थिक नियोजन देखील सारखे नसते. परंतु वेळीच आर्थिक नियोजन केले आणि बचतीच्या सवयी लावल्या तर कमी कालावधीत आपण आपल्या घराचे स्वप्न पूर्ण करू शकतो.
घराकडे गुंतवणूक म्हणून देखील आजकाल बघितले जाते. एक स्थावर मालमत्ता घराच्या रूपाने उभी राहत असते. भाड्याच्या घरात राहण्यापेक्षा आपल्या स्वतःच्या मालकीच्या घरात राहून गृहकर्जाचे हफ्ते भरण्यासाठी लोक पसंती देतात. तुम्ही सुद्धा जर तुमच्या कमी वयात घर घेण्याचा योग्य विचार करत असाल तर या काही टिप्स तुम्हाला नक्कीच उपयोगी पडतील.
1. आर्थिक शिस्त गरजेची
आपले स्वतःचे एक बजेट असायला हवे. आपण किती पैसे कमवते, महिन्याला किती खर्च करतो, याचा हिशोब आपण ठेवला पाहिजे. हा आर्थिक शिस्तीचा एक भाग आहे. त्यामुळे बचतीची एक रक्कम आपल्याला आपल्या घरासाठी बाजूला ठेवता येऊ शकते. तसेच वायफळ खर्च ज्या गोष्टींमध्ये होत असेल ते देखील आपल्याला टाळायला हवे. पैशाने पैसा वाढतो हे कायम लक्षात ठेवा. घर विकत घेतांना घराच्या मूळ किमतीच्या जास्तीत जास्त 85% इतक्या रकमेचं गृहकर्ज आपल्याला मिळत असतं. उरलेली 15% रक्कम ही आपल्याला रोख भरावी लागते. त्यामुळे गृहकर्ज घेऊन घर खरेदीचा विचार करत असाल तर एकूण किमतीच्या 15 % रक्कम तुमच्याकडे असायला हवी. यासाठी आपल्या उत्पन्नाचे स्त्रोत देखील वाढवणे गरजेचे आहे. नोकरीसोबत खूप लोक आता जोड-व्यवसाय करत आहेत. महागाईचा विचार करता घर चालवणे कठीण होऊन बसले आहे, त्यामुळे तरुण जोडपी एकत्रितपणे वेगवेगळे व्यवसाय चालवताना दिसतात.
2. खर्चाचा हिशोब ठेवायलाच हवा
दर महिन्याला तुमच्या घरात येणाऱ्या पगाराचे व्यवस्थित नियोजन व्हायला हवे. तसे न झाल्यास पैसा पाण्यासारखा खर्च करण्याची सवय लागते आणि महिनाअखेरीस आपल्या खिशात पैसेच शिल्लक राहत नाही. त्यामुळे आपण कुठे फिरायला जातो, काय खातो, काय खरेदी करतो, किराणा भरताना कुठल्या अनावश्यक गोष्टी देखील खरेदी करतो, या सगळ्याचा हिशोब ठेवा. यामुळे आर्थिक शिस्त तर लागेलच पन सोबत बचतीचा मार्ग देखील सापडेल.
3. घराचा संपूर्ण अभ्यास करा
घर घेताना सगळ्यात अगोदर जिथे तुम्ही मालमत्ता बघत आहात त्या ठिकाणाचा अभ्यास करा. शहरी भागात घ्यायचं की निमशहरी भागात घ्यायचं, स्टेशनपासून जवळ की लांब या सगळ्यांचा विचार करा. जितक्या जस्त सुविधा तितके जास्त पैसे हे गणित लक्षात ठेवा. तुम्ही किती रुपयांपर्यंतचा मासिक हफ्ता बँकेला भरू शकतात हे तपासूनच घर घ्या. बजेटपेक्षा अधिक किमतीचं घर घेतल्यास ईएमआय भरणं डोईजड जाणार हे नक्की.
4. बचत आणि गुंतवणूक करा
बचतीची सवय लावून तुम्ही पैसे वाचवू शकता. परंतु वाचवलेले पैसे कुठे गुंतवायचे हे माहिती नसेल तर मग बचतीला अर्थ उरत नाही. वेळीच बचतीला सुरुवात केली तर अपेक्षित असा जास्त परतावा आपल्याला मिळू शकतो. योग्य परतावा मिळवण्यासाठी तुमचे पैसे एफडी (Fixed Deposite) मध्ये ठेवून त्यावर 4-5% व्याज आपण मिळवू शकता. रिकरिंग डिपॉजीट म्हणजेच ‘आरडी’ मध्ये हे व्याज 6-7% इतके आहे. म्युच्युअल फंडमध्ये दीर्घ मुदतीसाठी आपल्या पैशांची गुंतवणूक केल्यास हा परतावा 10% ते 15% इतका मिळू शकतो. कमी वयात म्युच्युअल फंड मध्ये केलेली गुंतवणूक ही घर विकत घेतांना उपयोगी पडू शकते.
5. EMI ची तयारी करणे
अगोदर सांगितल्याप्रमाणे रेपो रेट दिवसेंदिवस वाढत आहे, त्यामुळे घराचे हफ्ते देखील वाढत आहेत. त्यामुळे वाढत्या महागाईचा विचार करता जितका झेपेल तितकाच EMI निवडला पाहिजे, तसेच घर खरेदी करताना आपल्या आवाक्याबाहेर EMI जाणार नाही ना याची काळजी घ्या. कारण भविष्यात इतर खर्च देखील वाढणारच आहेत.
6. घर खरेदी करताना लागणारे इतर खर्च
घराची मूळ किंमत दिली म्हणजे झालं असं नाही. घरखरेदी करताना इतर अनेक खर्च असतात, त्याची देखील माहिती घेणे गरजेचे आहे. डाऊनपेमेंट शिवाय स्टॅम्प ड्युटी देखील भरावी लागते, जी की 5% ते 7% इतकी असते .घराचं नोंदणी शुल्क (Home Registration Fee) हे घराच्या मूळ किमतीच्या 1% इतकं असतं.
गृहकर्जासोबत घराचा विमा, लाईट कनेक्शन, पाणी कनेक्शन, सोसायटीचा व्यवस्थापन खर्च आधी गोष्टी देखील विचारात घेतल्या पाहिजे.
7. क्रेडिट स्कोअर वाढवा
गृहकर्ज मिळवण्यासाठी बँक आधी तुमचे क्रेडिट स्कोअर बघते. तुमच्या आर्थिक शिस्तीचे प्रतिबिंब म्हणजे क्रेडिट स्कोअर असतो. 750 पेक्षा अधिक जर तुमचा क्रेडिट स्कोअर असेल तर तुम्ही गृहकर्ज मिळवण्यासाठी पात्र असतात. तुमचा क्रेडिट स्कोअर जितका जास्त तितकं तुम्हाला कमी व्याजदरात गृहकर्ज मिळू शकतं. क्रेडीट कार्ड वापरत असाल तर तुम्ही नियमित त्याचे हफ्ते भरले आहेत किंवा नाही हे तपासले जाते. जर तुम्ही हफ्ते चुकवले असतील तर तुम्हांला एक तर कर्ज देण्यास बँक नकार देऊ शकते अथवा जास्त व्याजदर लावू शकते.
8. गृहकर्जाची तुलना करा
प्रत्येक बँकेची गृहकर्जे वेगवेगळ्या नियम आणि अटींवर दिली जातात. वेगवेगळ्या बँकांसाठी व्याजदर देखील वेगवेगळा असतो. त्यामुळे जी बँक तुम्हांला कमी व्याजदर आणि जास्त सुविधा देईल अशाच बँक निवडा. गृहकर्ज घेतांना बँकांसोबत इतर उपलब्ध असलेल्या वेबसाईटवर तुलना करून मगच गृहकर्ज घ्यावं. मागील काही वर्षात सतत गृहकर्जाच्या व्याजदरात होणारी कपात लक्षात घेता गृहकर्ज हे ‘फ्लोटिंग’ व्याजदराने घेणं चांगलं असं अर्थतज्ज्ञ सांगत असतात.
9. घर घेण्याची योग्य वेळ ठरवा
रिजर्व्ह बँकेच्या अखत्यारीत येणारा ‘रेपो’ रेट हा गेली दोन वर्षे कमी झालेला नाही. वाढत्या रेपो रेटमुळे गृहकर्जाचे हफ्ते देखील वाढत आहेत. त्यामुळे स्वतःचे आर्थिक नियोजन करा आणि मगच घर घेण्याची वेळ निश्चित करा. जेव्हा फार काही आर्थिक जबाबदारी नसेल तेव्हा घराचा विचार अगोदर करा. कमी वयात लागलेली आर्थिक शिस्त भविष्यात कामी येईल आणि स्वतःची एक मालमत्ता देखील तुम्ही तयार करू शकाल.
10. कर वाचवण्याची संधी
गृहकर्ज नियमितपणे फेडत असतांना आपल्याला आयकराच्या सेक्शन 24 च्या अंतर्गत गृहकर्जाचा व्याजाच्या रकमेत दरवर्षी २ लाख रुपये इतकी सूट मिळत असते. त्यामुळे घर खरेदी करण्यासाठी कर्ज घेतले असेल तरी आयकरातून सूट मिळवता येते हे लक्षात घ्या.
या दहा गोष्टींचा गांभीर्याने विचार आणि नियोजन केल्यास घर घेण्यासाठी आपल्याला प्लानिंग करता येईल आणि वेळीच योग्य निर्णय घेतल्यास स्वतःचे घर देखील उभे करता येईल.