भारतात आजही गुंतवणूक करायची असल्यास सोने खरेदी करण्याला प्राधान्य दिले जाते. प्रामुख्याने महिलांकडून सोन्याचे दागिने खरेदी केले जातात. सोन्याचे दागिने खरेदी करण्यामागे गुंतवणुकीसोबतच हौस, प्रतिष्ठा हा देखील हेतू असतो. मात्र, आता गुंतवणुकीसाठी डिजिटल गोल्ड, सार्वभौम सुवर्ण रोखे, गोल्ड ईटीएफ सारखे अनेक पर्याय उपलब्ध आहे.
या लेखातून महिलांसाठी सोन्याचे दागिने की डिजिटल सोने यापैकी नक्की कशात गुंतवणूक करणे फायद्याचे आहे, हे जाणून घेऊयात.
Table of contents [Show]
सोन्याचे दागिने खरेदी करण्याचे फायदे-तोटे
खरेदी-विक्री करणे सोपे | सोन्याचे दागिने खरेदी करण्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे याची खरेदी-विक्री करणे खूपच सोपे असते. तुम्ही तुमच्या जवळील सोन्याच्या दुकानातून सहज दागिने खरेदी करू शकता. याशिवाय, तुम्ही बँकेतून देखील सोन्याची नाणी खरेदी करू शकता. सर्वसाधारणपणे दागिन्यातील सोने पूर्ण शुद्ध असते व याची खात्री करणारे बिल सुद्धा मिळते. |
कर्जाची सुविधा | सोन्याच्या दागिन्यात गुंतवणूक करण्याचा आणखी एक फायदा म्हणजे तुम्ही तारण ठेऊन या बदल्यात कर्ज काढू शकता. आर्थिक अडचणीच्या काळात हेच सोन्याचे दागिने तुमच्या मदतीस येतात. तुम्ही कर्जाची परतफेड केल्यास दागिने परत मिळतात. मात्र, कर्ज वेळेत न फेडल्यास सोने परत मिळत नाही. |
मजूरी खर्च व सुरक्षेची चिंता | सोन्याचे दागिने अथवा नाणी खरेदी करण्याचा सर्वात मोठा तोटा म्हणजे सुरक्षेची चिंता. दागिने घरात ठेवले तर चोरीला जाण्याची चिंता सतत सतावते. बँकेच्या लॉकरमध्ये ठेवल्यास यासाठी अतिरिक्त शुल्क द्यावे लागते. तसेच,दागिने बनवताना मजूरी शुल्क देखील द्यावे लागते. यामुळे दागिने खरेदी केल्यास अतिरिक्त पैसे खर्च करावे लागतात. |
डिजिटल सोने खरेदी करण्याचे फायदे-तोटे
डिजिटल सोने – डिजिटल सोन्यात गुंतवणूक करण्याचा कल वाढताना दिसत आहे. याचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्ये म्हणजे अवघ्या 1 रुपयांपासून ते लाखो रुपयांपर्यंत यात गुंतवणूक करणे शक्य आहे. यूपीआय व इतर ऑनलाइन पेमेंट अॅप्स जसे की पेटीएम, गुगल पे आणि फोन पेच्या माध्यमातून देखील तुम्ही डिजिटल सोने खरेदी करू शकता. तसेच, एका क्लिकवर डिजिटल सोन्याची विक्री करून पैशात रुपांतर शक्य आहे. डिजिटल सोने सुरक्षित देखील असते.
मात्र, तुम्ही ज्याप्रमाणे सोन्याचे दागिने घालून समारंभात जाऊ शकता, हौस करू शकता. तसे डिजिटल सोन्याच्याबाबतीत करता येत नाही. तुम्हाला जर हौस म्हणून दागिने खरेदी करायचे असल्यास डिजिटल सोन्यात गुंतवणूक करण्याची गरज नाही. याशिवाय, तुम्हाला यावर कर देखील भरावा लागेल.
सोन्यात गुंतवणुकीचे इतर पर्याय
दागिने व डिजिटल सोने या व्यतिरिक्त सार्वभौम सुवर्ण रोखे अथवा गोल्ड ईटीएफमध्ये देखील गुंतवणूक करू शकता. सार्वभौम सुवर्ण रोखे हे सोन्यात गुंतवणुकीचा सर्वात सुरक्षित मार्ग असून, हे रोखे RBI द्वारे जारी केले जातात. तसेच, गोल्ड ईटीएफ हे म्युच्युअल फंड्स असतात. यामध्ये गुंतवणूक करणे सुरक्षित आहे. याशिवाय, तुम्ही एकाच दिवशी खरेदी व विक्री करू शकता.
थोडक्यात, तुम्ही जर केवळ गुंतवणुकीचा विचार करत असाल तर डिजिटल सोने, सार्वभौम सुवर्ण रोखे आणि गोल्ड ईटीएफ हे सर्वोत्तम पर्याय आहेत. यातील गुंतवणूक ही पूर्णपणे सुरक्षित मानली जाते. हौस, प्रतिष्ठेच्या दृष्टीने विचार करत असाल तर सोन्याचे दागिने खरेदी करू शकता. मात्र, सोन्याच्या दागिने सुरक्षित ठेवणे सर्वात महत्त्वाचे आहे.