महागाई वाढीची आपण अनेक कारणे ऐकली असतील, वाचली असतील परंतु स्वीडन मधील महागाई वाढण्यासाठी तेथील अभ्यासकांनी थेट पॉप सिंगर बेयॉन्सला जबाबदार धरले आहे. युवा वर्गाला ही बेयॉन्स कोण हे काही वेगळे सांगायला नको. पॉप गाण्यांच्या जगतातील ती एक आघाडीची आणि जागतिक कीर्तीची सिंगर आहे. गेल्या महिन्यात स्वीडनमध्ये बेयॉन्सच्या गाण्यांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला केवळ स्वीडनच नाही तर आसपासच्या देशातील नागरिकांनी देखील हजेरी लावली होती. या दरम्यान देशात जे आर्थिक व्यवहार झाले त्यामुळे कमी होत असलेली स्वीडनची महागाई पुन्हा शिगेला पोहोचली आहे असे तेथील अभ्यासकांनी म्हटले आहे.
स्वीडनची राजधानी स्टॉकहोममध्ये बियॉन्सची कॉन्सर्ट झाली नसती, तर मे महिन्यातील महागाईचे आकडे वेगळे दिसले असते असते असे स्वीडिश अर्थतज्ञांचे म्हणणे आहे. अमेरिकन नागरिक असलेली बियॉन्स एक उत्तम गायिका तर आहेच परंतु एक उद्योजक म्हणूनही ती ओळखली जाते. गेल्या सात वर्षांपासून तीने अमेरिकेच्या बाहेर कॉन्सर्ट केल्या नव्हत्या. मध्यंतरी कोरोनाच्या काळात तसेही तिचे कार्यक्रम बंद होते. त्यामुळे बियॉन्सची ही कॉन्सर्ट तिच्या चाहत्यांसाठी एक मोठी पर्वणीच होती. पर्यटनाच्या दृष्टीने इतर देशातील लोक स्वीडनमध्ये आले हे जरी सकारात्मक असले तरी विदेशी पाहुण्यांनी सर्वाधिक खर्च हा बियॉन्सच्या कॉन्सर्टवर केला गेला आणि ज्याचा फारसा फायदा हा स्वीडनला झाला नाही असे देखील अभ्यासकांचे म्हणणे आहे. डॅन्स्के बँकेचे अर्थशास्त्रज्ञ मिशेल ग्राहान यांनी स्वीडिश मिडीयाला याबाबत माहिती दिली आहे.
The Beyoncé effect ? ?
— Curiously (@CuriouslyMedia) June 16, 2023
Beyoncé has been blamed for the surprise rise in inflation in Sweden due to her two concerts in Stockholm which kicked off her #RenaissanceWorldTour. pic.twitter.com/MwkFPgtKuD
बियॉन्सच्या कॉन्सर्टसाठी देशभरातून आणि जगभरातून तिच्या चाहत्यांनी स्टॉकहोम शहरात गर्दी केली होती. यादरम्यान हॉटेल आणि खाद्यपदार्थांच्या किंमती अपेक्षेपेक्षा अधिक वाढल्या. मागणी जास्त असल्यामुळे दुकानदारांनी आणि पुरवठादारांनी देखील चढ्या किमतीत जीवनावश्यक वस्तूंची विक्री केली. त्यामुळे 0.2% ने महागाईचा दर वाढला असे मिशेल ग्राहान यांचे मत आहे.
अमेरिकन-युरोपियन चाहत्यांची स्वीडनमध्ये गर्दी
बियॉन्सच्या कॉन्सर्टला हजेरी लावण्यासाठी अमेरिकन-युरोपियन चाहत्यांनी देखील स्टॉकहोममध्ये गर्दी केली होती. त्यांच्या देशात या कॉन्सर्टची तिकिटे तुलनेने महाग असल्यामुळे त्यांनी हा पर्याय निवडल्याचे सांगितले जात आहे. अमेरिकन डॉलर आणि युरोच्या तुलनेत स्वीडनचे चलन ‘स्वीडिश क्रोना’ हे कमकुवत आहे. त्यामुळे तेथील नागरिकांनी पर्यटन आणि बियॉन्सच्या कॉन्सर्ट असा दुहेरी पर्याय स्वीकारला.
भारतीय चलनात विचार करायचा झाला तर स्टॉकहोममधील कॉन्सर्टची तिकीट किंमत रु. 5,000 ते रु. 12,000 इतकी होती. तसेच लास वेगास येथील कॉन्सर्टची तिकीट किंमत रु. 7,500 ते रु. 57,000 इतकी होती. त्यामुळे अमेरिकन-युरोपियन चाहत्यांनी स्वीडनमधील कॉन्सर्टला हजेरी लावली.
मे महिन्यातील महागाई
स्वीडन सरकारने जारी केलेल्या आकडेवारीनुसार मे-2023 मध्ये चलनवाढीचा दर 9.7 टक्के होता, जो स्वीडिश अर्थशास्त्रज्ञांच्या अंदाजापेक्षा जास्त आहे. डिसेंबरमध्ये स्वीडनमधील चलनवाढ 12.3% वर पोहोचली. होती. तर एप्रिलमध्ये चलनवाढीचा दर 10.5 टक्के इतका नोंदवण्यात आला होता. मे महिन्यात तो 9.4 टक्क्यांपर्यंत घसरेल, असा तज्ज्ञांचा अंदाज होता. पण, बियॉन्सच्या कॉन्सर्टमुळे महागाईचा दर अपेक्षेपेक्षा अधिकच राहिला असे अर्थतज्ञांचे मत आहे.
Beyoncé at Ambani & Piramal’s Pre-Wedding Party in India pic.twitter.com/bcWhNfIwxR
— BEYTHOVEN | non-affiliated fan account (@beyonceparkwood) April 28, 2021
भारतात 2018 साली उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या मुलीच्या, म्हणजेच ईशा अंबानीच्या लग्नात बियॉन्स आली होती. खासगी मैफिलीत तीने तिचे गायन सादर केले होते. भारतात यावर मोठी चर्चा रंगली होती. या लग्नाचा प्री-वेडिंग इवेंट उदयपुर येथे पार पडला होता. मिडीया रिपोर्टनुसार या कार्यक्रमासाठी बियॉन्सने 21-28 कोटी रुपयांचे मानधन घेतले होते. बियॉन्सचे भारतात देखील खूप सारे चाहते आहेत.