Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Dharavi Leather Market : देशातील नव्हे तर आशियातील सर्वात मोठे धारावी लेदर मार्केट,जाणून घ्या

Dharavi

धारावीचे लेदर मार्केट स्थानिकच नाही तर देशाच्या अर्थव्यवस्थेत महत्त्वाची भूमिका बजावते, हजारो कारागिरांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देते आणि त्यांच्या कुटुंबांना आधार देत आहे. धारावीत छोटे-मोठे 500-600 लेदरची दुकाने आहेत. एका दुकानाची महिन्याची विक्री 10-15 लाखांच्या आसपास होत असते.


धारावी म्हणजे मुंबईतील एक गजबजलेलं ठिकाण. धारावीची झोपडपट्टी आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी म्हणून देखील ओळखली जाते. मात्र धारावीची स्वतःची अशी एक ओळख आहे. धारावीत शेकडो लहान-सहान उद्योग चालतात जे रोजगार निर्मिती तर करतातच पण सोबतच देशाच्या आर्थिक विकासाला देखील हातभार लावत असतात.

धारावी लेदर मार्केट देखील जगप्रसिध्द आहे. इथलं लेदर मार्केट देशातीलच नाही तर आशिया खंडातील सर्वात मोठं लेदर मार्केट असल्याचं बोललं जातं. धारावीतलं हे लेदर मार्केट हजारो लोकांना रोजगार देतं आणि करोडोंची उलाढाल करतं. चला तर जाणून घेऊया याबाबत सविस्तर माहिती…

धारावी लेदर मार्केट हे या परिसरातील अरुंद गल्ल्या आणि वर्कशॉपचे एक जाळे आहे. इथे तुम्हांला अनेक 
कुशल कारागीर चामडी पिशव्या, बेल्ट, वॉलेट, शूज आणि जॅकेटपासून ते कीचेन आणि फोन कव्हर यांसारख्या लहान ॲक्सेसरीजपर्यंत लेदर उत्पादने तयार करतात. सामान्यांना परवडतील अशी स्वस्तात मस्त ओरीजनल लेदर उत्पादने तुम्हांला येथून खरेदी करता येतील. चामड्याच्या वस्तू खरेदी करणाऱ्या मुंबईकरांसाठी हे एक आवडीचे ठिकाण आहे. देशविदेशातील पर्यटकसुद्धा येथे येतात आणि मनसोक्त खरेदीचा आनंद लुटतात.

चर्म उद्योगाची समृध्द परंपरा 

धारावी लेदर मार्केटमधील कारागिरांकडे चामड्याच्या कलाकुसरीची समृद्ध परंपरा आहे, जी पिढ्यानपिढ्या चालत आली आहे. हे कुशल कामगार मेलेल्या जनावरांचे कच्चे चामडे घेतात, ते वळवतात, त्यांनतर त्याच्यावर प्रक्रिया करून त्याच्या वस्तू बनवल्या जातात.

इथले कारागीर कालानुरूप बदलले आहेत. नव्या डिझाइनसह नवनवे उत्पादन निर्मिती ते करत असतात. तुम्ही धारावीच्या काही दुकानांमध्ये फेरफटका मारला तर तुम्हांला कळेल की किती नवनवीन उत्पादने बनवली जात आहेत.

स्वस्तात, परवडणाऱ्या दरात 

धारावीच्या लेदर मार्केटचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे इथे उत्तम क्वालिटीच्या वस्तू तुम्हांला बाजारभावापेक्षा स्वस्त किमतीत मिळतात. चामड्याच्या बेल्ट 400-500 रुपयांपासून 1500 पर्यंत तुम्हांला खरेदी करता येईल, जो तुम्ही वर्षानुवर्षे वापरू शकता. लेदर बॅग ही सध्या तरुणाईच्या आवडीचा विषय आहे. आजकाल मुले-मुली दोघेही बॅग वापरतात. या मार्केटमध्ये 200 रुपयांपासून 10 हजारपर्यंतच्या लेदर बॅग तुम्ही खरेदी करू शकता.  लेदर जॅकेटसाठी अनेक लोक या मार्केटमध्ये येत असतात. 800 रुपयांपासून 5000 पर्यंत उत्तम गुणवत्तेचे  लेदर जॅकेट तुम्हांला इथे खरेदी करता येईल. तसेच लेदर शूजच्या शेकडो व्हाराईटीज इथे उपलब्ध आहेत. शूज 500 रुपयांपासून 5 हजार पर्यंत उपलब्ध आहेत.

तसेच सध्या प्रवासासाठी वापरल्या जाणाऱ्या लेदर ट्रॉली ट्रॅव्हल बॅग देखील उपलब्ध आहेत. या महाग आहेत, कारण त्या बनविण्यासाठी अधिक कालावधी लागतो आणि त्याच्यासाठी चामडे देखील अधिक वापरले जाते. 5 हजारापासून या ट्रॅव्हल बॅगची किंमत सुरु होते.

ग्राहक त्यांच्या आवडीनुसार विशिष्ट डिझाइन, आकार आणि अगदी रंगांचे सिलेक्शन देखील करू शकतात. हा पर्सनलाइझ टच धारावी लेदर मार्केटची खासियत आहे. ऑर्डर देऊन तुम्ही तुमच्या आवडीनुसार लेदर उत्पादने खरेदी करू शकता.

आर्थिक उलाढाल 

धारावीचे लेदर मार्केट स्थानिकच नाही तर देशाच्या अर्थव्यवस्थेत महत्त्वाची भूमिका बजावते, हजारो कारागिरांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देते आणि त्यांच्या कुटुंबांना आधार देत आहे. धारावीत छोटे-मोठे 500-600 लेदरची दुकाने आहेत. एका दुकानाची महिन्याची विक्री 10-15 लाखांच्या आसपास होत असते. हे दुकानदार देशोविदेशी देखील आपला माल पाठवत असतात. तसेच भारतातील वेगवगेळ्या शहरांत देखील इथल्या उत्पादनांना मागणी असते.

खरे तर, धारावी लेदर मार्केट हे इथल्या चर्मोद्योग कारागिरांच्या उद्योजकीय भावनेचा आणि कारागिरीचा पुरावा आहे. हे असे ठिकाण आहे जिथे व्यावसायिक परंपरा कामगारांनी राखून ठेवली आहे आणि त्यात वेळोवेळी बदल देखील केले आहेत. नव्या पिढीला आकर्षित करतील अशी उत्पादने येथे बनवली जातात. तुम्ही जर अजूनही या मार्केटला भेट दिली नसेल तर इथे येण्याचा जरूर प्रयत्न करा. आव्हाने असूनही, धारावीचे लेदर मार्केट हा धारावीच्या ओळखीचे अविभाज्य अंग बनले आहे आणि स्थानिक अर्थव्यवस्थेत आणि भारतातील व्यापक चर्मोद्योगात योगदान देत आहे.