Tail Strike Incidents: इंडिगो एअर लाइन्सला नागरी वाहतूक विभागाने (DGCA) 30 लाख रुपये दंड ठोठावला आहे. मागील 6 महिन्यात कंपनीच्या वैमानिकांकडून 4 अपघाताच्या घटना घडल्यामुळे ही कारवाई करण्यात आली. एअरलाइन्सला चूक सुधारण्यासाठी नियमांमध्ये बदल करण्यास सांगण्यात आले आहे.
'टेल स्ट्राइक' अपघात म्हणजे काय?
जेव्हा विमान लँड होत असते तेव्हा अती वाऱ्यामुळे किंवा इतर घटकांमुळे लँडिंग नीट होत नाही. विमान धावपट्टीवर उतरताना शेपटीकडचा भाग खाली आपटतो. त्यामुळे विमानाचा समतोल ढासळतो. यातून मोठा अपघात होण्याचीही शक्यता असते. असे अपघात रोखण्यासाठी वैमानिकाला नियमांचे पालन करावे लागते तसेच कौशल्य दाखवावे लागते. मात्र, मागील सहा महिन्यात शेपटी धावट्टीवर आदळण्याचे 4 अपघात इंडिगो एअरलाइन्ससोबत घडल्याने कारवाई करण्यात आली.
विमान लँड होत असताना अपघात
खराब हवामान आणि वाऱ्यामुळे असे अपघात सहसा घडत असतात. मात्र, एखाद्या विमान कंपनीकडून कायम असे अपघात घडत असतील तर कारवाई केली जाते. विमान लँड होत असताना एकाच बाजूचे चाक धावपट्टीवर आल्यानेही शेपटीकडीचा भाग जोरात खाली आपटतो.
एअरबस A321 विमानांचा अपघात
टेल स्ट्राइक अपघाताच्या घटनानंतर DGCA ने इंडिगो एअर लाइन्सचे जून महिन्यात ऑडिट केले होते. यामध्ये त्रुटी आढळून आल्या. शेपटी धावपट्टीवर आदळण्याच्या चार घटना एअरबस A321 या विमानासोबत घडल्या. अशा घटनांमुळे प्रवाशांची सुरक्षितता धोक्यात येते. अहमदाबाद विमानतळावर लँडिंग करताना टेल स्ट्राइक झाल्यामुळे DGCA ने इंडिगोच्या दोन वैमानिकांचा परवाना मागील महिन्यात तात्पुरता रद्द केला होता.
इंडिगो ही देशातील सर्वात मोठी विमान कंपनी आहे. कंपनीचा प्रवासी वाहतुकीतील एकूण वाटा 63.2% आहे. DGCA च्या निर्णयाचा अभ्यास करून उत्तर देणार आहोत. तसेच इंडिगो सुरक्षेसबंधी कोणताही तडजोड करत नाही, असे एअरलाइन्सने कारवाईनंतर म्हटले आहे.