आर्थिक व्यवहाराबाबत नागरिकांमध्ये चांगल्या सवयी लावण्यासाठी रिझर्व्ह बँकेने पुढाकार घेतला आहे. रिझर्व्ह बँकेकडून आर्थिक साक्षरता सप्ताहाचे (Financial literacy week) आयोजन करण्यात आले आहे. आज सोमवारी 13 फेब्रुवारी 2023 रोजी नागपूरमधील रिझर्व्ह बँकेच्या क्षेत्रीय कार्यालयात आर्थिक साक्षरता सप्ताहाचा शुभारंभ करण्यात आला. आर्थिक साक्षरता सप्ताहात 13 ते 17 फेब्रुवारी दरम्यान विदर्भातील गडचिरोली, चंद्रपूर या जिल्ह्यातील दूर्गम भागात आर्थिक व्यवहार कसे करावेत, डिजिटल पर्यायांचा कसा योग्य वापर करावा याबाबत जनजागृती केली जाणार आहे.
केंद्र सरकारच्या आर्थिक शिक्षणासाठी राष्ट्रीय रणनिती 2020-2025 या उद्देशासाठी रिझर्व्ह बँकेकडून वर्ष 2016 पासून आर्थिक साक्षरता सप्ताह आयोजित केला जातो. दरवर्षी या सप्ताहासाठी खास थीम ठरवली जाते. यंदाच्या आर्थिक साक्षरता सप्ताहासाठी ‘’चांगले आर्थिक व्यवहार, तुमचे तारणहार!'' (Good Financial Behaviour - Your Saviour) ही थीम ठरवण्यात आली आहे. या थीमनुसार बचत , आर्थिक नियोजन, बजेटिंग आणि डिजिटल सेवांचा सुयोग्य वापर (savings, planning and budgeting, and prudent use of digital financial services) यासंदर्भात जनजागृती केली जाईल, अशी माहिती रिझर्व्ह बँकेच्या वित्तीय समावेश विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.
फेब्रुवारी महिन्यात या चार मुद्द्यांवर जनजागृती करण्याचे निर्देश बँकांना देण्यात आले आहेत. बँकांनी ग्राहकांमध्ये आर्थिक साक्षरता सप्ताहाच्या निमित्ताने आर्थिक व्यवहारांबाबत सोप्या भाषेत माहिती उपलब्ध करावी असे निर्देश देण्यात आले आहे. आजच्या मोहीमेत विदर्भ कोकण ग्रामीण बँक, चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक या बँका सहभागी झाल्या आहेत. या बँकांची वाहने विदर्भातील ग्रामीण भागात आर्थिक साक्षरतेबाबत जनजागृती करणार आहेत.
वर्ष 2022 मधील आर्थिक साक्षरता सप्ताहात गो डिजिटल गो सिक्युर ही थीम होती. डिजिटल व्यवहार करताना ग्राहकांनी कोणती खबरदारी बाळगावी याबाबत बँकांकडून 14 ते 18 फेब्रुवारी या दरम्यान जनजागृती करण्यात आली होती. सुरक्षित डिजिटल आर्थिक व्यवहार, ग्राहकांचे संरक्षण याबाबत माहिती देण्यात आली होती.