नोकरदार वर्गाला नियमित उत्पन्न (Regular income) मिळत असतं. निवृत्त झाल्यानंतर केवळ सरकारी नोकरदारांना पेन्शनच्या रुपात नियमित उत्पन्न मिळत असतं. मात्र खासगी नोकरदारांना उत्पन्नाचा नवा पर्याय शोधावा लागतो. अशात एसबीआयनं (State bank of India) एक योजना आणलीय. वार्षिकी ठेव योजनेच्या माध्यमातून तुमची नियमित उत्पन्नविषयत समस्या सुटू शकते. कारण या योजनेत तुम्हाला एकरकमी पैसे जमा करावे लागतात. तर त्या बदल्यात तुम्ही व्याजाच्या (Interest) स्वरूपात नियमित उत्पन्नाची व्यवस्था करू शकता.
Table of contents [Show]
कालावधी काय?
स्टेट बँक ऑफ इंडियानं आपल्या वेबसाइटवर या योजनेची सविस्तर माहिती दिलीय. कोणतीही व्यक्ती वार्षिकी ठेव योजनेचा लाभ घेऊ शकते. या माध्यमातून 3 वर्षे ते 10 वर्षांपर्यंत नियमित उत्पन्न मिळवता येतं. या योजनेत 36, 60, 84 किंवा 120 महिन्यांसाठी पैसे जमा करण्यात येतात. साधारणपणे तुम्ही निवडलेल्या कालावधीपर्यंत तुम्हाला दर महिन्याला किमान 1000 रुपये मिळू शकतील एवढे पैसे या योजनेत जमा करणं गरजेचं असतं. या योजनेत कमाल रक्कम किती असावी, याला कोणतीही मर्यादा नाही.
किती व्याज मिळणार?
व्याज हा आपल्यासाठी सर्वात महत्त्वाचा घटक आहे. नियमित उत्पन्नातून जे काही पैसे मिळतात ते व्याजदरानुसार मोजले जातात. या योजनेतला व्याजदर हा बचत खात्यापेक्षा जास्त आहे. बँकेच्या मुदत ठेवीवर म्हणजेच एफडीवर मिळणाऱ्या ठेवीवर तेच व्याज मिळते. त्याचप्रमाणे खातं उघडण्याच्या वेळी जो कोणता व्याजाचा दर उपलब्ध असेल, तोच तुम्हाला या योजनेच्या कालावधीसाठी उपलब्ध राहणार आहे.
मुदतपूर्व पैसे काढण्याचे नियम काय?
अॅन्युइटी डिपॉझिट स्कीममध्ये तुम्हाला मुदतपूर्व ठेवीचा पर्यायदेखील मिळतो. अत्यावश्यक परिस्थितीत कोणत्याही एका खात्यातून जास्तीत जास्त 15 लाख रुपये काढता येवू शकतात. 15 लाखांपेक्षा जास्त रक्कम जमा राहील आणि त्या बदल्यात ठरलेल्या वेळेपर्यंत दर महिन्याला असणारे हफ्ते मिळत जातील. दंडाचा नियमही ठरलेला आहे. याबाबत एफडीचे जे नियम आहेत. तेच याठिकाणीही लागू होतात. तसंच खातेदाराचा मृत्यू झाला तर नॉमिनीद्वारे संपूर्ण रक्कम काढता येवू शकते.
गरजेची योजना
एसबीआयची ही योजना म्हणजे गरजेच्या वेळी कामाला येणारी योजना होय. यात तुम्हाला कर्जाची सुविधाही मिळते. गरज असेल तेव्हा खात्यातल्या शिल्लक रकमेच्या 75 टक्क्यांपर्यंत ओव्हरड्राफ्ट किंवा कर्ज मिळू शकतं. कर्ज घेतल्यानंतर अॅन्युइटी पेमेंट कर्ज खात्यात जमा केलं जातं. ग्राहकांना युनिव्हर्सल पासबुकही यात दिलं जात. बँकेची ही सुविधा एसबीआयच्या सर्व शाखांमध्ये उपलब्ध असणार आहे.
विविध योजना ऑफर
एसबीआय ही सार्वजनिक क्षेत्रातली सर्वात मोठी बँक आहे. या बँकेमार्फत विविध मुदत ठेव योजना, विमा पॉलिसी तसंच गुंतवणुकीच्या योजना राबविल्या जातात. दीर्घ मुदतीत एफडीवर 7 ते 8 टक्क्यांपर्यंत व्याज दिलं जातं. तर क्रेडिट कार्य आणि तत्सम सुविधांमार्फत ग्राहकांना बँक विविध ऑफर देत असते.