डिमॅट खात्यांची संख्या वार्षिक आधारावर 26 टक्क्यांनी वाढून 12.7 कोटी झाली आहे. कारण, शेअर मार्केटमधून मिळणारा जबरदस्त रिटर्न आणि खाते उघडण्याची सोपी प्रक्रिया, यामुळे खात्यांच्या संख्येत वाढ झालेली पाहायला मिळत आहे. तसेच, मध्यंतरी मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात तेजी पाहायला मिळाली होती. त्यामुळे किरकोळ गुंतवणुकदार नशीब बदलवायला मार्केटमध्ये उतरल्याचे दिसून येत आहे.
ऑगस्टमध्ये खात्यात झाली वाढ
मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेसच्या विश्लेषणानुसार, जुलै महिन्याच्या 30 लाखाच्या तुलनेत ऑगस्टमध्ये नव्या खात्यांची संख्या मासिक आधारावर 4.1 टक्के वाढून 31 लाख झाली आहे. सेबीच्या आकडेवारीनुसार, ऑगस्ट 2023 च्या शेवटी डिमॅट खात्यांची संख्या 12.7 कोटी झाली आहे. यात एनएसडीएल (NSDL), सीडीएसएलमध्ये (CDSL) अनुक्रमे 3.3 कोटी आणि 9.35 कोटी डिमॅट खात्यांची नोंदणी झाली आहे.
ही आहेत कारणे
मार्केट तज्ज्ञांच्यानुसार, शेअर मार्केटमधून मिळणारा आकर्षक रिटर्न आणि ब्रोकरने खाते उघडण्यासाठी ग्राहकांना करुन दिलेली सोपी प्रक्रिया यामुळे डिमॅट खात्यात पर पडली आहे. तसेच, वाढती आर्थिक साक्षरता आणि तरुणांमध्ये व्यापाराची वाढती लोकप्रियता या देखील गोष्टी डिमॅट खात्यात वाढ होण्यास कारणीभूत आहेत. याशिवाय अजूनही बरीच प्रमुख कारणे आहेत.
या ब्रोकर्सचा आहे मोठा वाटा
मार्केटमध्ये सलग दोन महिन्यांपासून एनएसईच्या (NSE) अॅक्टिव्ह युजर्सची संख्या वाढत आहे. एकूणच उद्योगातील अॅक्टिव्ह युजर्स ऑगस्टमध्ये 2.5 टक्क्यांनी वाढून 3.27 कोटी झाले आहेत. तर झिरोधा, एंजल वन, ग्रो, आयसीआयसीआय सिक्युरिटीज आणि आयआयएफएल सिक्युरिटीज या टॉप पाच डिस्काऊंट ब्रोकर्सचा एनएसईच्या (NSE)अॅक्टिव्ह युजर्समध्ये गेल्या महिन्यात 60.8 टक्के वाटा होता, जो जुलैमधील 61.2 टक्क्यांवरुन खाली आला आहे.