काही दिवसांपूर्वी फेडरेशन ऑफ ऑल इंडिया फार्मर्स असोसिएशनने (FAIFA - Federation of All India Farmers Association) केंद्र सरकारकडे तंबाखू पिकाला इतर कृषी उत्पादनांप्रमाणेच वागणूक द्यावी, अशी मागणी केली आहे. भारतात कायदेशीररित्या उत्पादित तंबाखू उत्पादनांवर (Tobacco Products) कराचा बोजा त्याच्या उत्पादकांवर विपरित परिणाम करत आहे. तंबाखू पिकाला (Tobacco Crop) इतर कृषी उत्पादनाप्रमाणे मान्यता मिळाल्यास शेतकऱ्यांना मोठा फायदा होईल असे एफएआयएफएने म्हटले आहे. या मागणीमुळे देशातील तंबाखू उत्पादकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
उद्योगांवर परिणाम होईल असे पाऊल उचलू नये
यासोबतच FAIFA ने तंबाखू क्षेत्रासाठी निर्यात केलेल्या उत्पादनांवर (RODTEP) लादलेल्या कराच्या परताव्याची मुदत वाढवण्याची मागणीही केली आहे. वास्तविक, FAIFA आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक आणि गुजरातमधील व्यावसायिक पिकांचे शेतकरी आणि शेतमजुरांचे प्रतिनिधित्व करण्याचा दावा करते. FAIFA चे अध्यक्ष जावरे गौडा यांनी निवेदनात म्हटले आहे की, आम्ही धोरणकर्त्यांना आगामी केंद्रीय अर्थसंकल्पात निष्पक्ष आणि न्याय्य राहण्याचे आवाहन करतो आणि तंबाखू उत्पादक शेतकऱ्यांच्या जीवनमानावर गंभीर परिणाम होऊन कायदेशीरपणे सुरु असलेल्या घरगुती उद्योगावर कोणताही परिणाम होईल असे कोणतेही पाऊल उचलू नये.
आरओ-डीटीईपी अंतर्गत लाभांचा विस्तार
एफएआयएफए (FAIFA) ने अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडे तंबाखू पिकाला इतर कृषी उत्पादनांप्रमाणे वागणूक देण्याची मागणी केली आहे आणि भारतात कायदेशीररित्या उत्पादित केलेल्या उत्पादनांवर कराचा अतिरिक्त बोजा लादू नये कारण त्याचा तंबाखूच्या शेतकर्यांवर विपरीत परिणाम होईल. वाढत्या मनमानी करांमुळे भारत हा जगातील चौथ्या क्रमांकाचा अवैध सिगारेट बाजार बनला आहे. यासोबतच एफएआयएफए (FAIFA) ने उत्पादकांना तंबाखू क्षेत्रासाठी Ro-DTEP अंतर्गत लाभांचा विस्तार हवा असल्याचे म्हटले आहे.
आंध्र प्रदेशातील शेतकऱ्यांना सरकारची मदत
केंद्र सरकारने आंध्र प्रदेशातील तंबाखू उत्पादक शेतकऱ्यांना बिनव्याजी कर्ज देण्यासाठी 28.11 कोटी रुपये मंजूर केले आहेत. वाणिज्य मंत्रालयाने नुकतेच एका निवेदनात म्हटले आहे की, या निर्णयामुळे तंबाखू उत्पादक शेतकऱ्यांना पावसामुळे झालेल्या नुकसानातून सावरण्यास मदत होईल. पात्र शेतकऱ्यांना तंबाखू बोर्डकडून बिनव्याजी कर्ज दिले जाईल. वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी तंबाखू बोर्डच्या उत्पादक कल्याण योजनांच्या प्रत्येक सदस्याला 10,000 रुपयांचे विशेष व्याजमुक्त कर्ज देण्यासाठी 28.11 कोटी रुपये मंजूर केले आहेत, असे निवेदनात म्हटले आहे. या उपक्रमाचा 28,112 शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.