भारतामध्ये जेवढं अन्नधान्य एका वर्षात तयार होतं, त्यातील सुमारे 30 ते 40 टक्के अपुरी साठवण क्षमता आणि पुरवठा साखळीतील अडथळ्यांमुळे वाया जाते. फळे, भाजीपाला, दूध असे नाशवंत पदार्थ साठवण्यासाठी कोल्ड चैन आणि जलद वाहतुकीची सुविधाही उपलब्ध नाही. जर ही नासाडी थांबणार नसेल तर आपण कितीही विक्रमी उत्पादन घेतले तरी त्याचा काहीच उपयोग होणार नाही. कृषी तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांच्या बजेटकडून मोठ्या अपेक्षा आहेत. यात सर्वात महत्त्वाचे म्हणजे खासगी गुंतवणूक. त्यामुळे कृषी सुविधा जलद उभ्या राहतील.
कृषी क्षेत्रातील कंपन्यांना बजेटकडून प्रामुख्याने अल्प दरात पतपुरवठा आणि करसवलत प्रामुख्याने हवी आहे. त्यासोबतच सरकारी गुंतवणूक झाली तर कृषी तंत्रज्ञानात झपाट्याने वाढ होईल, असे या क्षेत्रातील जाणकारांचे मत आहे.
कृषीक्षेत्रात खासगी गुंतवणुकीची अपेक्षा (Private investment in agri sector)
कृषी क्षेत्रामध्ये साठवणूक, पुरवठा साखळी, प्रक्रिया उद्योग मोठ्या प्रमाणात वाढावे, असे वाटत असेल तर या क्षेत्रातील कंपन्यांना पतपुरवठ्याची गरज आहे. तसेच करातून सुटका मिळावी, अशीही या कंपन्यांची मागणी आहे. केंद्र सरकारने कृषी कायदे आणले होते, यामध्ये खासगी गुंतवणूक याबाबत तरतूद करण्यात आली होती. मात्र, उत्तरेकडील शेतकऱ्यांच्या विरोधामुळे हे कायदे सरकारला मागे घ्यावे लागले. त्यामुळे आता बजेटमधून कृषी क्षेत्राला अतिरिक्त मदत मिळू शकते, असे या क्षेत्रातील जाणकारांचे मत आहे.
वातावरण बदलामुळे शेतकऱ्यांचे नुकसान(Crop wastage due to bad weather)
अचानक झालेला वातावरण बदल हा देखील शेतकऱ्यांसाठी धोकादायक ठरतो. उभे पीक पाऊस, धुके आणि इतर अनेक वातावरणीय घटकांनी खराब होते. शेती करताना अल्पभूधारक शेतकऱ्यांपर्यंतही तंत्रज्ञान पोहचवायचे असेल तर मोठ्या गुंतवणुकीची गरज आहे. खासगी क्षेत्रातील कंपन्यांना सहज गुंतवणूक करता यावी, अशी तरतूद बजेटमध्ये असावी, असे मत कृषी तंत्रज्ञान क्षेत्रातील उन्नती या कंपनीचे सीइओ अशोक प्रसाद यांनी व्यक्त केले.
कोरोनानंतर तंत्रज्ञानात वाढ(Agri Technology increased after covid)
कोरोनानंतर तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे प्रमाण शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढले आहे. येत्या काळात त्यामध्ये आणखी वाढ होईल. त्यामुळे शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी आणि तयार केलेला माल सुरक्षित ठेवण्यासाठी तंत्रज्ञानाची गरज आणखी वाढेल, त्यामुळे खासगी क्षेत्रातील गुंतवणूक वाढावी, असे मत देखील त्यांनी व्यक्त केले. ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात मत्स्य शेती केली जाते. मात्र, वाढत्या खर्चामुळे मत्स्यशेती करणे अवघड बनले आहे.