ऑनलाईन कॅब सेवा वापरणारे असंख्य लोक आपल्या देशात आहेत. प्रवासात अनेकदा आपण आपले मौल्यवान सामान विसरतो. याच आधारावर उबरने लॉस्ट अँड फाउंड इंडेक्स 2023 (Lost and Found Index 2023) जारी केलाय. याद्वारे प्रवास करताना किती लोक त्यांचे सामान विसरतात आणि कोणकोणत्या प्रकारचे सामान विसरतात याचा तपशील कंपनीने प्रकाशित केला आहे. मोबाईल फोनपासून ते थेट वेस्टर्न कमोड देखील लोक उबर कारमध्ये विसरले असल्याचे या अहवालात म्हटले आहे. उबर कॅबमध्ये वस्तू विसरण्यात दिल्लीकर पहिल्या क्रमांकावर आहेत, मुंबईकर दुसऱ्या, हैदराबाद तिसऱ्या आणि बेंगळुरू चौथ्या क्रमांकावर आहे. मागील वर्षी या क्रमवारीत मुंबई शहर पहिल्या क्रमांकावर होते.
अहवालानुसार, गेल्या वर्षी देशभरात उबर कॅब सेवा वापरकर्ते मोबाईल फोन, बॅग,पैशाचे पाकीट, कॉलेजचे प्रवेशपत्र, चष्मा, दागिने आणि कपडे यासारख्या वस्तू कॅबमध्ये विसरले होते. या वस्तूंसोबतच पाण्याची बाटली, चाव्या आणि इतर बारीक सारीक गोष्टी देखील लोक कॅबमध्ये विसरतात असे या अहवालात म्हटले आहे. एक प्रवासी तर मोठ्या मोठा स्क्रीनचा टेलिव्हिजन कॅबमध्ये विसरला होता असेही या अहवालात म्हटले आहे.
कोणत्या दिवशी विसरले जाते अधिक सामान
उबरच्या लॉस्ट अँड फाउंड इंडेक्स 2023 मध्ये दिवसानुसार देखील विसरलेल्या वस्तूंचे वर्गीकरण केले आहे. या माहितीनुसार शनिवारी सर्वात जास्त लोक त्यांचे सामान उबर कॅबमध्ये विसरले असल्याचे म्हटले आहे. शनिवार खालोखाल रविवारी आणि शुक्रवारी देखील लोक आपले सामान लोक कॅबमध्ये विसरतात असे निरीक्षण अहवालात नोंदवले गेले आहे.
मोबाईल फोनबद्दल अहवालात म्हटले आहे की, आयफोन च्या तुलनेत 3 पट अधिक अँड्रॉइड फोन लोक कॅबमध्ये विसरले होते. संध्याकाळच्या वेळी सर्वात जास्त वस्तू विसरण्याचे प्रमाण असल्याचे देखील या अहवालात म्हटले आहे. संध्याकाळी शक्यतो ऑफिसवरून घरी जाणारे कर्मचारी उबरचा वापर करत असतात. दिल्ली, मुंबई, हैदराबाद आणि बेंगळूरू या शहरांत संध्याकाळच्या वेळी वाहतुकीची कोंडी अधिक प्रमाणात होत असते. अशावेळी घाईघाईने घरी पोहोचण्यासाठी प्रयत्न करणारे प्रवासी कॅबमध्ये सामान विसरतात, असे या अहवालात म्हटले आहे.
Uber मध्ये विसरलेल्या वस्तू कशा मिळवाल?
उबर कॅबमध्ये प्रवास केल्यानंतर जर तुम्ही कॅबमध्ये सामान विसरलात तर लागलीच कंपनीशी तुम्ही संपर्क साधला पाहिजे. https://help.uber.com/ वर जाऊन लॉग इन करा. इथे तुमचा नोंदणीकृत मोबाईल फोन नंबर टाकून तुम्ही तुमची तक्रार नोंदवू शकता. त्यांनतर जे सामान तुम्ही कॅबमध्ये विसरला आहात त्याचे तपशील लिहा. सोबतच कुठल्या प्रवासादरम्यान तुम्ही सामान विसरला आहात ते देखील लिहा. त्यांनतर कंपनीद्वारे तुम्हांला फोन केला जाईल आणि कॅब ड्रायव्हरसोबत तुमचा संपर्क करून दिला जाईल. अशाप्रकारे तुम्ही तुमचे उबर कॅबमध्ये विसरलेले सामान परत मिळवू शकता.