गेल्या सहामाहीत देशभरातील मुख्य शहरांमध्ये घराच्या किमतीत घट झाल्याचे पाहायला मिळाले आहे. ॲनारॉक (Anarock) या रिअल इस्टेट कंपनीच्या एका अहवालानुसार ही माहिती समोर आली आहे. देशातील प्रमुख सात शहरांमध्ये जानेवारी ते जून या कालावधीत परवडणाऱ्या घरांच्या विक्रीत 18 टक्क्यांची घट झाल्याचे या अहवालात म्हटले आहे. याचे मुख्य कारण नोंदवताना ॲनारॉकने म्हटले आहे की, कमी पुरवठा आणि वाढलेले व्याजदर यामुळे घराची खरेद-विक्री घटली आहे. जानेवारी ते जून 2023 दरम्यान 40 लाखांपेक्षा कमी किमतीच्या घरांच्या विक्रीबाबत हा अहवाल आहे. या कालावधीत दिल्ली, मुंबई, पुणे, कोलकाता, बेंगळूरू, हैदराबाद आणि चेन्नई या शहरांमध्ये केवळ 46,650 घरे विकली गेली आहेत. मागील वर्षी पहिल्या सहामाहीत 57,060 घरांची विक्री झाली होती.
परवडणारी घरे झाली महाग!
मध्यम वर्गातील कुटुंबियांच्या गरजा लक्षात घेऊन 40 लाखांपेक्षा कमी किमतीच्या घरांच्या विक्रीचा अभ्यास या अहवालात केला गेला आहे. ॲनारॉकच्या आकडेवारीनुसार, जानेवारी-जून 2023 मध्ये एकूण घरांच्या विक्रीमध्ये परवडणाऱ्या घरांचा हिस्सा 20 टक्क्यांवर आला आहे. वर्षभरापूर्वी याच कालावधीत तो 31 टक्के इतका होता. या वर्षी जानेवारी ते जून या कालावधीत एकूण 2.28 लाख घरांची विक्री झाली आहे, जी मागील वर्षी याच कालावधीत 1.84 लाख होती.
मध्यमवर्गाला परवडणारी घरे महाग झाल्याचे हे चित्र आहे, तसेच वाढते व्याजदर आणि मागणीच्या तुलनेने परवडणाऱ्या घरांची उपलब्धता यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी घर खरेदी करणे मध्यम वर्गीयांनी टाळले आहे.
दिल्ली-एनसीआरमध्ये सर्वाधिक घट!
ॲनारॉकच्या अहवालानुसार ज्या प्रमुख 7 शहरांमध्ये हा सर्व्हे करण्यात आला होता, त्यापैकी दिल्ली-एनसीआरमध्ये परवडणाऱ्या घरांची विक्री जानेवारी-जूनमध्ये 38.6 टक्क्यांनी घसरली आहे. गेल्या सहामाहीत दिल्ली-एनसीआर परिसरात केवळ 8,680 घरे खरेदी झाल्याची नोंद आहे. याशिवाय मुंबई महानगरात (MMRDA) घर खरेदीच्या बाबतीत किरकोळ घट नोंदवली असून, सहामाहीत 17470 घरे विकली गेली आहेत. याशिवाय बंगळुरूमध्ये परवडणाऱ्या घरांची मागणी 3,990 वरून 3,270 युनिट्सवर आली आहे.
पुण्यातील परवडणाऱ्या घरांची विक्री 11,240 वरून 9,700 युनिट्सवर घसरली असून हैदराबादमध्ये 50% घट नोंदवली गेली असून तिथे एकूण 720 युनिट्सची विक्री झाली आहे.