जागतिक पातळीवर भारताने आशियातील वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था म्हणून ओळख मिळवली आहे. यामुळे स्वित्झर्लंडमधील दावोस येथे सुरु असलेल्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये भारताला गुंतवणूकदारांची पहिली पसंती मिळण्याची शक्यता आहे. या परिषदेत भारताकरिता मोठे गुंतवणूक करार होतील, अशी अपेक्षा इन्व्हेस्ट इंडियाचे सीईओ दिपक बागला यांनी व्यक्त केली आहे. (India at World Economic Forum 2023)
मागील आठ वर्षात भारतात तब्बल 523 बिलियन डॉलर्सचे थेट परकिय गुंतवणूक (FDI) झाली आहे. मागील 22 वर्षातील गुंतवणुकीच्या तुलनेत 40% गुंतवणूक ही मागील आठ वर्षात झाल्याचे बागला यांनी सांगितले. परदेशी गुंतवणूकदारांसाठी भारत गुंतवणुकीचे प्रमुख केंद्र बनत असल्याचे त्यांनी सांगितले.
जागतिक परिषदा आणि फोरम्समध्ये भारताचा सहभाग वाखणण्याजोगा आहे. यातून भारत झपाट्याने विकसित होत असल्याचे जागतिक पातळीवर सातत्याने दिसून आले आहे. यामुळे भारतातील नेतृत्वावर परदेशी गुंतवणूकदारांचा विश्वास वाढला असल्याचे बागला यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले की, देशात पायाभूत सेवा सुविधांचा विकास, स्टार्टअप्स आणि नाविन्यतेला सरकारने प्रोत्साहन दिले जात आहे. ज्यामुळे परदेशी गुंतवणूकदारांचे भारताबाबतचे आकर्षण वाढले आहे. वर्ष 2021-2022 मध्ये भारतात 83.57 बिलियन डॉलर्सची थेट परकीय गुंतवणूक झाली होती.
स्टार्टअप्स आणि युनिकॉर्नमधून भारतात नाविन्यपूर्ण बिझनेस सोल्यूशन्स तयार करण्याची क्षमता असल्याचे सिद्ध झाले आहे. मात्र दिर्घकाळ सुरु असलेले रशिया आणि युक्रेन युद्ध तसेच महागाईचा भडका, हवामान बदलाचे परिणाम या मुद्द्यांवर देखील सरकारने लक्ष द्यायला हवे, असे मत बागला यांनी व्यक्त केले. जागतिक गुंतवणूकदारांना सर्वसमावेश वातावरण देण्यासाठी सरकार प्रयत्न करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.