राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. सातव्या वेतन आयोगानुसार कर्मचाऱ्यांना 38% ऐवजी 42% महागाई भत्ता दिला जाणार आहे. त्यापैकी जानेवारी 2023 ते मे 2023 या कालावधीत वाढीव महागाई भत्ता हा जून 2023 च्या वेतनात रोखीने मिळणार आहे. यासंदर्भात वित्त विभागाने 30 जून 2023 रोजी अध्यादेश जारी केला आहे.
राज्यात जवळपास 17 लाख कर्मचारी आहेत. राज्यातील कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगानुसार महागाई भत्ता वाढवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यानुसार महागाई भत्ता 38% वरुन 42% इतका वाढवण्यात आला आहे. मात्र तो अद्याप कर्मचाऱ्यांना अदा करण्यात आला नव्हता.
सरकारने वाढीव महागाई भत्त्याची थकबाकी रोखीने कर्मचाऱ्यांना अदा करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्याच्या वित्त विभागाने शुक्रवारी 30 जून 2023 रोजी याबाबत अध्यादेश जारी केला आहे. त्यानुसार राज्य शासकीय कर्मचारी आणि इतर पूर्णकालीन कर्मचाऱ्यांना सातव्या वेतना आयोगाच्या सुधारित वेतन संरचेनुसार मूळ वेतनावरील 42% महागाई भत्ता अदा करण्यात येणार आहे.
कर्मचाऱ्यांना जून महिन्याच्या वेतनात वाढीव महागाई भत्ता थकबाकीसह अदा केला जाणार आहे. 1 जानेवारी 2023 ते 31 मे 2023 असा पाच महिन्यांची महागाई भत्त्याची रक्कम कर्मचाऱ्यांना मिळणार आहे. राज्य सरकारने थकबाकीसह महागाई भत्ता रोखीने अदा करण्याचा निर्णय घेतल्याने वाढत्या महागाईपासून लाखो कर्मचाऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.
यापूर्वी केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ केली होती. शेजारच्या कर्नाटकात देखील राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढवण्यात आला होता. राज्य सरकारने याबाबत अर्थसंकल्पात तरतूद केली होती. त्यानुसार वित्त विभागाने शुक्रवारी शासन निर्णय जारी केला आहे.