वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) परिषदेने मंगळवारी ऑनलाइन गेमिंग कंपन्या, कॅसिनो आणि घोड्यांच्या शर्यतीवरील सट्टेबाजीवर 28 टक्के कर लावण्याचा निर्णय घेतला आहे. यासोबतच सामन्यांच्या खिशावरील भार कमी करण्यासाठी देखील एक महत्वाचा निर्णय घेतला गेला आहे. हा निर्णय आहे सिनेमाघरात मिळणाऱ्या खाद्य पदार्थांबाबतचा.
सिनेमा हॉलमध्ये विकल्या जाणार्या खाद्यपदार्थांवरील GST दर कमी करण्याची नागरिकांनी सरकारला अनेकदा विनंती केली होती. सामान्य हॉटेलच्या तुलनेत सिनेमाघरात मिळणारे खाद्यपदार्थ महाग दराने विकले जात होते. या खाद्यपदार्थांवर 18% जीएसटी आकारला जात होता. सामान्य नागरिकांना नाहक जादा पैसे मोजावे लागत होते. याबाबत GST परिषदेला सातत्याने विचारणा होत होती. कालच्या बैठकीत यावर सकारात्मक निर्णय घेतला असून यापुढे सिनेमाघरात मिळणाऱ्या खाद्यपदार्थावर 5% GST लागू करण्याचा निर्णय घेतला गेला आहे.
हॉटेल्स आणि रेस्टॉरंटप्रमाणे आकारले जाणार शुल्क
जीएसटी नियमावलीनुसार सामान्य हॉटेल्स आणि रेस्टॉरंटमध्ये खाद्यपदार्थांवर 5% GST आकारला जातो. सिनेमाघरांच्या बाबतीत हा कर 18% ठेवण्यात आला होता. आता मात्र परिषदेच्या निर्णयानंतर ग्राहकांना 5% GST द्यावा लागणार आहे. या निर्णयामुळे सिनेमाप्रेमींच्या खिशावरील भार हलका होणार आहे.
सिनेमा हॉल चालकांना सूचना
यापुढे सिनेमा हॉल चालकांना GST परिषदेने घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करायची आहे. खाद्यान्नावर 5% पेक्षा अधिक GST लावल्यास ग्राहक परिषदेकडे तक्रार करू शकतात. अशा प्रकरणात सिनेमाघराचा परवाना देखील रद्द केला जाऊ शकतो. त्यामुळे ग्राहकांनी देखील खाद्यपदार्थ खरेदी करताना GST बिल काळजीपूर्वक बघायला हवे.
सिनेमाप्रेमींकडून स्वागत
जीएसटी परिषदेच्या या निर्णयाचे सिनेमाप्रेमींनी स्वागत केले आहे. तसेही मल्टिप्लेक्स सिनेमागृहातील तिकीटदर महाग असतात. तसेच बाहेरील खाद्यपदार्थ सिनेमागृहांत आणू दिले जात नाही. त्यामुळे नाईलाजाने महागडे खाद्यपदार्थ खरेदी करावे लागतात. अशातच हा GST परिषदेचा निर्णय आल्यामुळे पैशाची बचत होणार आहे अशा भावना सिनेप्रेमींनी व्यक्त केल्या आहेत.