क्रिप्टो मार्केटमधील सर्वात मोठी करन्सी म्हणून ओळख असलेल्या बिटकॉईनला करन्सी 2020 नंतर प्रथमच 20 डॉलरच्या खाली आली आहे. गेल्या 2-3 दिवसांपासून बिटकॉईनच्या किमतीत मोठी घसरण होत असल्याचे दिसून येत आहे. या सततच्या घसरणीमुळे क्रिप्टो मार्केटमधील तणाव वाढला आहे.
बाजार मूल्यानुसार क्रिप्टो मार्केटमधील सर्वांत मोठी करन्सी असलेली बिटकॉईन शनिवारी (दि.18 जून) पहाटे 9 टक्क्यांपेक्षा अधिक घसरून तिचे मूल्य 18,740.52 डॉलरवर आले होते. ब्लूमबर्गच्या माहितीनुसार, सलग 12 दिवस बिटकॉईनमध्ये रेकॉर्डब्रेक घसरण सुरू आहे. इथेरियममध्येही गेल्या 24 तासांत 8.55 टक्क्यांनी घसरण झाली असून 1 हजार डॉलरच्या खाली गेलेली किंमत आता 1007.40 डॉलरवर आली आहे.
क्रिप्टो मार्केटमधील तज्ज्ञांच्या मते, जगभर सुरू असलेले मंदीचे सावट आणि महागाई यामुळे क्रिप्टो मार्केटमधील अस्थिरता वाढत आहे. याच कारणांमुळे जगभरातील शेअर मार्केट कोसळत आहेत. त्याच नियमाला अनुसरून क्रिप्टो मार्केटसुद्धा रिअॅक्ट होत आहे. पण, यामुळे गुंतवणूकदारांचे आतोनात नुकसान होत आहे.
इतर नियमित चलनांप्रमाणे बिटकॉईनच्या चलनातील घसरण नियंत्रित करता येत नाही. त्यामुळे बिटकॉईनमधील गुंतवणूकदार मोठ्या संख्येने विक्री करत आहेत. मोठ्या प्रमाणात होत असलेल्या विक्रीमुळे त्याची किंमत घसरू लागली आहे. साधारणत: बिटकॉईन लोक किती प्रमाणात खरेदी करण्यास तयार आहेत; त्यावर त्याची किंमत ठरते.
कारडानो, सोलाना, डॉजकॉईन आणि पोल्काडॉट या चलनांमध्येही गेल्या 24 तासात 7 ते 10 टक्क्यांची घसरण नोंदवली गेली आहे. तर मोनेरो आणि झेडकॅश सारख्या खाजगी टोकन्सची किंमतही 9 टक्क्यांनी कमी झाली आहे. क्रिप्टो मार्केट 2021 नंतर आता एका वेगळ्या मोडवर आहे. त्यावेळी बिटकॉईनची किंमती 69 हजार डॉलरच्या घरात होती. त्यावेळी या करन्सीत मोठ्या प्रमाणात गुंतवणूक झाली होती.
CoinGecko या संकेतस्थळाच्या माहितीनुसार, नोव्हेंबर 2021 मध्ये क्रिप्टोचे मार्केट 3 ट्रिलियन डॉलर होते. ते शनिवारी सकाळी 880 अब्ज डॉलरवर आले आहे. रशिया-युक्रेन यांच्यातील युद्ध, वाढती महागाई, अमेरिकेतील ऐतिहासिक महागाईच्या पार्श्वभूमीवर फेडरल बॅंकेने वाढवलेला व्याज दर अशा चारी बाजूंच्या नकारात्मक परिस्थितीमुळे क्रिप्टो मार्केटमध्ये मोठी घसरण होत आहे.