Form 16: पगारदार आणि नोकरदार व्यक्तींसाठी सर्वांत महत्त्वाचे काम करण्यासाठी फक्त दीड महिना उरला आहे. असेसमेंट इअर 2023-24 साठी इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करण्यापूर्वी अगोदर राहिलेल्या चुका दुरूस्त करून घ्या. कारण कंपन्यांकडून कर्मचाऱ्यांना आर्थिक वर्ष 2022-23 चे Form 16 पाठवणे सुरू झाले आहे. त्या फॉर्ममध्ये काही चुका असल्यास त्या चुका रिटर्न फाईल करण्यापूर्वी दुरूस्त करून घ्या.
पगारदार आणि नोकरदार व्यक्तींसाठी इन्कम टॅक्स रिटर्न भरण्यासाठी फॉर्म 16 हे अत्यंत महत्त्वाचे कागदपत्र आहे. साधारणत: इन्कम टॅक्स विभागाच्या नियमानुसार 15 जूनपर्यंत कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना Form 16 देणे गरजेचे आहे. त्यानुसार बऱ्याच कंपन्यांकडून ही प्रक्रिया सुरू झाली आहे. पण कर्मचाऱ्यांनी रिटर्न फाईल करण्यापूर्वी तो बरोबर आहे की, हे तपासून घेतले पाहिजे. पण काही कर्मचाऱ्यांना तो अजून कंपन्यांकडून मिळालेला नाही. असे कर्मचारी इन्कम टॅक्स विभागाच्या ट्रेसेस (Income Tax TRACES) वेबसाईटवरून डाऊनलोड करता येऊ शकतो. तो ट्रेसेस या साईटवरून डाऊनलोड कसा करायचा. हे आपण जाणून घेणार आहोत.
इन्कम टॅक्सच्या साईटवरून असा Form 16 डाऊनलोड करा
इन्कम टॅक्सच्या Traces या वेबसाईटवरून पॅनकार्डच्या आधारे लॉगिन करून फॉर्म 16 डाऊनलोड करू शकता. यासाठी सर्वप्रथम www.tdscpc.gov.in या वेबसाईटवर जा. तिथे युझरआयडी म्हणून तुमचा पॅनकार्ड टाका. लॉगिन केल्यानंतर डाऊनलोड मेनूवर जाऊन Form 16 वर क्लिक करा. त्यानंतर तिथे तुम्हाला ज्या आर्थिक वर्षाचा फॉर्म हवा आहे. ते वर्ष निवडा आणि डाऊनलोड यावर क्लिक करा.
Form 16 मध्ये चुका दुरूस्त करता येतात का?
कंपनीकडून मिळालेला फॉर्म 16 किंवा ट्रेसेस साईटवरून डाऊनलोड केलेल्या फॉर्म 16 मध्ये सर्व तपशील बरोबर आहेत का हे तपासून घ्यावेत. त्यामध्ये काही चुका किंवा त्रुटी असतील तर त्या लगेच कंपनीच्या संबंधित विभागाच्या लक्षात आणून द्या. कारण फॉर्म 16 मध्ये काही त्रुटी असल्यास त्या दुरुस्त करण्याचा अधिकार फक्त कंपनीलाच असतो. तो दुरूस्त करण्यासाठी थोडा वेळा लागतो. पण एखादी चूक तुमच्या लक्षात आली असेल तर ती लगेच निदर्शनास आणून देणे गरजेचे आहे.
कंपनीकडून फॉर्म 16 मध्ये एखादी त्रुटी राहिली असल्यास कर्मचाऱ्याच्या विनंतीनुसार कंपनी ती चूक सुधारून नवीन सुधारित फॉर्म 16 दिला जातो. पण यासाठी कंपनीला योग्य पुरावे सादर करणे गरजेचे आहे. इन्कम टॅक्स रिटर्न भरताना फॉर्म 16 आणि फॉर्म 26AS हो दोन महत्त्वाची कागदपत्रे लागतात. त्यातील आकडे एकमेकांशी जुळणे गरजेचे आहे. ते जुळत नसतील तर ते लक्षात आणून देणे गरजेचे आहे.
असेसमेंट वर्ष 2023-24 (Assessment Year 2023-24)साठी इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची अंतिम तारीख 31 जुलै, 2023 आहे. त्यामुळे तुम्हाला जर कंपनीकडून अजून फॉर्म 16 मिळाला नसेल तर त्याबद्दल संबंधित विभागाकडे विचारणा करा आणि फॉर्म 16 मिळाला असेल तर त्यात दिलेली सर्व माहिती योग्य आहे की नाही, ते तपासून घ्या.