Core sectors Growth: अर्थव्यवस्थेतील प्रमुख 8 क्षेत्रांची वाढ मार्च महिन्यात खुंटल्याचे सरकारी आकडेवारीतून समोर आले आहे. या मूलभूत क्षेत्रांमधून अर्थव्यवस्थेची स्थिती कळते. स्टील, सिमेंट, खते, नैसर्गिक वायू, इलेक्ट्रिसिटी, क्रूड ऑईल, पेट्रोलियम रिफायनरी आणि कोळसा या क्षेत्रांची वाढ मार्च महिन्यात 3.6% झाली. पाच महिन्यांतील ही सर्वात खराब कामगिरी आहे. एक वर्षांपूर्वी याच काळात मूलभूत क्षेत्रांतील वाढीचा दर 4.3% होता.
फेब्रुवारी 2023 मध्ये अर्थव्यवस्थेतील मूलभूत क्षेत्रांची वाढ 7.2 या दराने झाली होती. यातील प्रामुख्याने सिमेंट, इलेक्ट्रिसिटी आणि क्रूड ऑइल या क्षेत्रांना जास्त फटका बसला. म्हणजेच या क्षेत्रांमधील निर्मिती (प्रॉडक्शन) रोडावले. सध्या उन्हाळा सुरू असून वीज क्षेत्रातील मंदी चिंता वाढवणारी आहे. विजेचे उत्पादन कमी झाल्यामुळे त्याचा परिणाम पुढील काही महिन्यांमध्ये दिसू शकतो. तसेच उन्हाळ्यात उद्योग आणि घरगुती विजेची मागणी सर्वाधिक असते.
क्रूड ऑइल उत्पादनाचा दर सर्वाधिक म्हणजे 2.8 टक्क्यांनी खाली आला. त्यानंतर वीज 1.8 आणि सिमेंट निर्मिती 0.8 टक्क्यांनी खाली आले. गृहनिर्माण क्षेत्र तेजीत असून घरांची मागणी वाढत आहे. विकासकांकडून प्रमुख शहरांत नवे प्रकल्प सुरू करण्यात येत आहेत. सरकारचा पायाभूत सुविधा निर्मितीवरचा खर्चही वाढला आहे. मात्र, तरीही सिमेंटची मागणी घटल्याचे दिसून येत आहे. नैसर्गिक वायू आणि पेट्रोलियम उत्पादनांची निर्मितीही साधारण राहिली.
कोळसा, खते आणि स्टील क्षेत्राची स्थिती
इतर क्षेत्रांच्या तुलनेने कोळसा, खते आणि स्टील निर्मितीची आकडेवारी सकारात्मक राहिली. मात्र, इतर पाच क्षेत्रांच्या सुमार कामगिरीमुळे सरासरी वाढ खाली आली. कोळशाचे उत्पादन 12.2 टक्क्यांनी वाढले. तर खत निर्मिती 9.7 टक्क्यांनी वाढली. स्टीलचे उत्पादनही 8 टक्क्यांपेक्षा जास्त राहिले. औद्योगिक उत्पादन निर्देशांकात मूलभूत क्षेत्रांचे 40% योगदान असते. या क्षेत्रांच्या विकासावरून इतर उद्योगांच्या वाढीचा अंदाज बांधला जातो.
मूलभूत क्षेत्रांचे घटलेले उत्पादन अर्थव्यवस्थेची एकंदर स्थिती दर्शवतो. फक्त कोळसा आणि क्रूड ऑईल क्षेत्रांनी चांगली वाढ नोंदवली. मार्च महिन्यात अनेक भागात मुसळधार पाऊस झाला. त्याचा परिणाम मूलभूत क्षेत्रांच्या उत्पादनावर झाला, असे ICRA संस्थेच्या प्रमुख अर्थतज्ज्ञ अदिती नायर यांनी म्हटले.