Consumer Goods demand: मागील दोन महिन्यांपासून किरकोळ महागाई दर आटोक्यात आला आहे. किराणा, भाजीपाला, तेल, साबण, विविध पेये अशा वस्तुंचे दर कमी झाले आहेत. डिसेंबर 2022 पूर्वी महागाईचा दर 7% होता. मात्र, आता हा महागाई दर 5.72% वर आला आहे. वस्तुंच्या उत्पादनासाठी खर्च कमी येऊ लागल्याने कंपन्यांनी ग्राहकांसाठी वस्तुंवर डिस्काऊंट आणि प्रमोशनल स्कीम देण्यास सुरुवात केली आहे. तसेच दररोज घरी लागणाऱ्या किरकोळ वस्तू उत्पादक कंपन्यांनी (फास्ट मुव्हिंग कन्झ्युमर गुड्स -FMCG) ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी जाहिरातींवरील खर्चात वाढ केली आहे.
वस्तुंची मागणी रोडावली (Consumer Goods demand reduced)
देशात महागाई वाढली असताना वस्तुंची मागणी कमी झाली होती. मात्र, आता किरकोळ भाववाढ आटोक्यात आली असली तरीही वस्तुंची बाजारातील मागणी वाढलेली नाही. FMCG क्षेत्रातील कंपन्यांकडून चालू वर्षासाठी विक्रीचे मोठे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. मात्र, वस्तुंची मागणी कमी झाल्याने विक्री रोडावली आहे. त्यामुळे ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी प्रमोशन स्कीम देण्यात येत असल्याचे या क्षेत्रातील कंपन्यांनी म्हटले आहे.
कंपन्यांच्या जाहिरातींवरील खर्चात वाढ (FMCG companies promotional cost increased)
तेल, शाम्पू, साबण आणि ब्रेकफास्ट उत्पादने बनवणाऱ्या हिंदुस्तान युनिलिव्हर कंपनीने जाहिरातींचे बजेट तीन महिन्यांसाठी 160 कोटी रुपये केले आहे. वस्तू उत्पादनाचा खर्च कमी येत असल्याने कंपनीने प्रमोशनसाठीच्या खर्चात वाढ केली आहे. कोलगेट पामोलिव्ह कंपनीने जाहिरात खर्चात 13% वाढ केली आहे. तसेच गोदरेज कन्झ्युमर प्रॉडक्ट्स कंपनीने 200 कोटी रुपयांपेक्षा जास्त जाहिरातीचे बजेट ठेवले आहे. शॉपर्स स्टॉप, रिलायन्स, डिमार्ट सारख्या रिटेल चैनमधून ग्राहकांना अतिरिक्त सूट देण्यात येत आहे. तसेच विविध प्रमोशनल योजनांचे माध्यमांतून प्रमोशन करण्यात येत आहे.
भारतामध्ये FMCG कंपन्याची मार्केट सुमारे दिडशे बिलियन डॉलर इतकी आहे. अनेक बहुराष्ट्रीय कंपन्या भारतामध्ये कार्यरत आहेत. आयटीसी, नेस्ले, हिंदुस्तान युनिलिव्हर, अमूल, ब्रिटानिया, पारले अशा अनेक आघाडीच्या कंपन्या आहेत. FMCG कंपन्या टेलिव्हिजन, डिजिटल आणि प्रिंट माध्यमांतून सर्वात जास्त जाहिराती करतात.