MHADA Kokan Mandal Lottery 2023: प्रत्येकाला वाटते असते की, आपले स्वत:चे हक्काचे घर असावे. पण सध्याच्या घरांच्या आणि जागेच्या किमती पाहता, त्या वाटेला न गेलेले बरे! अशी तऱ्हा झाली आहे. पण सर्वसामान्यांचे हे घराचे स्वप्नं मात्र म्हाडा पूर्ण करण्यासाठी हातभार लावत आहे. आताही म्हाडाने कोकण मंडळांतर्गत 4752 घरांसाठीच्या सोडतीची तारीख नुकतीच जाहीर केली आहे. यामध्ये पंतप्रधान आवास योजना, अत्यल्प, अल्प आणि मध्यम गटातील घरांचा समावेश असणार आहे.
म्हाडा म्हणजेच महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाने (MHADA) कोकण मंडळातील 4752 घरांसाठी लॉटरी जाहीर केली आहे. या लॉटरीची सोडत 11 एप्रिलला होणार असून, यासाठी अर्ज करण्याची तारीख 20 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे.
Table of contents [Show]
4,752 घरांमध्ये कोणाला किती वाटा असणार?
म्हाडाने काढलेल्या 4752 घरांमध्ये पंतप्रधान आवास योजनेतील 984 घरे, 20 टक्के योजनेतील 1,554 घरे, म्हाडाच्या गृहनिर्माण योजनेतील 129 घरे आणि प्रथम येणाऱ्या प्राधान्य या तत्त्वावरील 2,085 घरे अशी एकूण 4752 घरे सोडतीत उपलब्ध असणार आहेत.
20 फेब्रुवारीपासून अर्जविक्री सुरू
म्हाडाच्या कोकण मंडळाने जाहीर केलेल्या 4752 घरांच्या सोडतीचे अर्ज 20 फेब्रुवारी, 2023 पासून विक्रीसाठी उपलब्ध होणार आहेत. तसेच त्याच दिवसांपासून अर्ज स्वीकारलेही जाणार आहेत. इच्छुकांना 20 मार्चपर्यंत अर्ज सादर करता येणार आहेत.
सोडत कधी जाहीर होणार?
म्हाडाच्या कोकण मंडळातील 4752 घरांसाठीची सोडत 11 एप्रिल रोजी होणार आहे. ही सोडत ठाण्यातील काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात काढली जाणार आहे.
घरे कुठे उपलब्ध आहेत?
म्हाडाच्या या सोडतीतील घरे शिरढोण, विरार-बोळिंज, गोठेघर, खोणी, वसई, विरार, ठाणे, डायघर, सानपाडा, घणसोली या ठिकाणी उपलब्ध असणार आहेत. प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या उत्पन्न गटातील लोकांसाठी घरे उपलब्ध असणार आहेत. जसे की, पंतप्रधान आवास योजनेतील अत्यल्प गटासाठी शिरढोण (340), विरार-बोळिंज (328), गोठेघर (256) आणि खोणीसाठी (60) घरे उपलब्ध आहेत. या घरांच्या किमती 15 लाखापासून 17 आणि 21 लाखांपर्यंत आहेत. तर 20 टक्के योजनेतील 1554 घरे वसई, विरार, ठाणे, पाचपाखाडी, सानपाडा, घणसोली, डायघर येथे उपलब्ध आहेत. या घरांच्या किमती 7 लाखांपासून 30 लाखापर्यंत आहेत.
म्हाडा कोकण मंडळ सोडत महत्त्वाच्या तारखा
- अर्ज विक्री: 20 फेब्रुवारी 2023 पासून
- अर्ज भरण्याची शेवटची तारीख: 20 मार्च 2023
- स्वीकारलेल्या अर्जांची अंतिम यादी जाहीर: 5 एप्रिल 2023
- सोडत कधी जाहीर होणार: 11 एप्रिल 2023