सध्या टोमाटो, कोथिंबीर, आले, हिरव्या मिरच्या, मसाल्याचे पदार्थ यांच्या वाढत्या किमतीमुळे सामान्य नागरिक हैराण आहेत. अशातच तेल विपणन कंपन्यांनी 4 जुलैपासून 19 किलो व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमती वाढवल्या आहेत. त्यामुळे सामान्य नागरिकांना दुष्काळात तेरावा महिना अनुभवावा लागणार आहे. व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किंमतीत 7 रुपयांनी वाढ करण्यात आली असून, त्यानंतर दिल्लीत त्याची किंमत 1,773 रुपयांवरून 1,780 रुपयांवर पोहोचली आहे. तर मुंबईत 1,725 रुपयांवरून 1732 रुपयांवर पोहोचली आहे.
व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किंमतीत वाढ झाली असली तरी, सध्या 14.2 किलोच्या घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरच्या किंमतीत कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही. मात्र हॉटेल व इतर व्यावसायिक कारणासाठी वापरण्यात येणाऱ्या गॅस सिलिंडरच्या दरात वाढ झाल्यामुळे हॉटेलमधील खाद्यपदार्थ देखील महागणार आहेत.
1 जून 2023 रोजी व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमतीत तब्बल 83.50 रुपयांपर्यंत कपात करण्यात आली होती. देशात घाऊक आणि किरकोळ महागाई दरात कपात होत असताना हा निर्णय घेण्यात आला होता. तसेच जागतिक स्तरावर देखील गॅसच्या किमती कमी झाल्याचे चित्र होते. परंतु पुढच्याच महिन्यात पुन्हा एकदा सिलिंडरच्या किमतीत वाढ झाल्यामुळे सामान्य नागरिकांना आता जादा पैसे मोजावे लागणार आहेत.
विविध शहरांमध्ये किती किंमत?
19 किलोच्या व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात वाढ झाल्यानंतर विविध शहरांमध्ये त्याची किंमत पुन्हा एकदा वाढली आहे. कोलकातामध्ये व्यावसायिक एलपीजी सिलिंडरची किंमत पूर्वी 1875.50 होती, जी आता 1882.50 इतकी झाली आहे. त्याच वेळी, चेन्नईत याआधी व्यावसायिक सिलिंडर 1937 रुपयांना मिळत होता, तो आता 1944 रुपयांवर पोहोचला आहे.
घरगुती गॅस सिलिंडरच्या बाबतीत भाववाढीचा कुठलाही निर्णय अजून घेण्यात आलेला नाही. देशभरात घरगुती गॅस सिलिंडरच्या किमती आहे त्याच राहणार आहेत. मात्र येत्या काही महिन्यात घरगुती गॅस सिलिंडरच्या किमती देखील वाढू शकतात असे जाणकारांचे म्हणणे आहे.