Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

New Vs Old Tax Regime : याच महिन्यात ठरवा तुम्ही नवी की जुनी कर प्रणाली निवडणार

Old v/s New Tax Regime

New Vs Old Tax Regime : एप्रिल महिन्यामध्ये कोणत्या करप्रणाली (Tax Regime) नुसार आपला कर कापला जावा हे निश्चित करायचं असतं. जी करप्रणाली आपण ठरवतो त्यानुसारच पूर्ण वर्षभराचा कर कंपनीकडून कापला जातो. मात्र, पुढील आर्थिक वर्षामध्ये कर भरताना आपल्यापुढे पुन्हा करप्रणाली निवडण्याचा पर्याय उपलब्ध असतो.

एप्रिल महिना आर्थिक वर्षाचा पहिला महिना आहे. त्यामुळे या महिन्यात काही गोष्टींचं नियोजन आपण करू शकलो तर पुढचं अख्खं वर्षं आपल्याला सोपं जातं. असाच एक महत्त्वाचा निर्णय तुम्हाला या महिन्यात घ्यायचा आहे. तो म्हणजे, पुढच्या आर्थिक वर्षात जुनी कर प्रणाली तुम्हाला वापरायची आहे की, नवी. हे तुम्ही आताच ठरवलंत तर तुमचं करदायित्व तुम्ही आटोक्यात ठेवू शकणार आहात. कसं ते समजून घेऊया. 

नव्या आर्थिक वर्षाच्या पहिल्याच महिन्यामध्ये नोकरदार वर्गाला महत्त्वाचं काम पूर्ण करायचं आहे ते म्हणजे आपली करप्रणाली (Tax Regime) निश्चित करणं. आयकर कायदा 1961 नुसार नोकरदार वर्गाला आपली करप्रणाली निश्चित करणे अनिर्वाय असते. कारण यानुसारच आपल्या पगाराची रचना (Salary Structure) ठरवली जाते.  त्यामुळे जर तुम्ही एप्रिल महिन्यामध्ये करप्रणाली निश्चित केली नाही तर तुमचं आर्थिक नुकसान होऊ शकते.

पगाराची रचना ठरवणे

आयकर कायदा 1961 नुसार  नव्या आर्थिक वर्षाच्या पहिल्याच महिन्यात म्हणजे एप्रिल महिन्यामध्ये नोकरदार वर्गाला आपली करप्रणाली ठरवावी लागते. या करप्रणाली पद्धतीनुसार आपल्या पगाराची रचना कंपनीकडून निश्चित केली जाते. त्यानंतर संपूर्ण वर्षभरात या करप्रणाली नुसारच आपल्या पगारातून करकपात केली जाते. त्यामुळे जर आपण या एप्रिल महिन्यामध्ये आपली करप्रणाली निश्चित करून ती आपल्या कंपनीच्या अकाउंट विभागाला कळवली नाही, तर आपल्या पगारामधून मोठ्या प्रमाणात कर कापला जाऊ शकतो. त्यामुळे सतर्क राहुन लवकरात लवकर आपली करप्रणाली निश्चित करा.

टीडीएस कट

नोकरदार वर्गाच्या पगारामधून टीडीएस कर कापला जातो. जर आपण योग्य वेळी आपण निवडलेल्या करप्रणालीची माहिती कंपनीला दिली नाही तर आपल्या पगारामधुन जास्त रकमेचा टीडीएस कापला जाईल. याचा परिणाम आपल्या हातात येणाऱ्या पगारावर होतो. ज्याला आपण टेक-होम सॅलरी म्हणतो ती कमी येऊन आपल्या महिन्याभराच्या आर्थिक बजेटवर याचा नकारात्मक परिणाम होईल.

कर परताव्यास उशीर

आपल्या उत्पन्नानुसार जर चालु आर्थिक वर्षात आपल्या पगारामधुन अधिक कर कपात झाली असेल तर    त्याचा आपल्याला कर परतावा मिळत असतो. मात्र, तो उशीराने मिळतो. कारण नवे आर्थिक वर्ष सुरू झाल्यानंतर आपण आयकर परतावा फाईल करतो. अशा सर्व प्रक्रियेनंतर आपल्याला आयकर विभागाकडून कर परतावा मिळत असतो. तुमच्याच पैशांसाठी तुम्हाला इतका वेळ तात्काळत राहायचं नसेल तर आत्ताच करप्रणाली निश्चित करणं गरजेचं आहे.

तर चालु आर्थिक वर्षाच्या सुरूवातीला आपण करकपातीसाठी जी करप्रणाली निवडत असतो त्यानुसारच त्या संपूर्ण वर्षात करकपात केली जाते. मात्र, ज्यावेळी आपण आयकर परतावा फाईल भरत असतो तेव्हा आपल्यापुढे पुन्हा कोणत्या पद्धतीने कर कपात लागू करायची आहे याचा पर्याय दिला जातो. अशावेळी तज्ज्ञांच्या सल्ल्याने, आणि टॅक्स कॅल्यूलेटरच्या साहय्याने कोणत्या करप्रणालीमध्ये आपला कमी कर कापला जाणार आहे, त्यानुसारची करप्रणाली निश्चित करता येईल.