Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Alibaba New Jobs : कर्मचारी कपातीच्या काळात आनंदाची बातमी! चीनी कंपनी अलिबाबा देणार 15000 लोकांना रोजगार

Alibaba New Jobs : कर्मचारी कपातीच्या काळात आनंदाची बातमी! चीनी कंपनी अलिबाबा देणार 15000 लोकांना रोजगार

Alibaba New Jobs : कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या जात असतानाच एक आनंदाची बातमी समोर आलीय. चीनी कंपनी अलिबाबा लवकरच मोठी भरती करणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार तब्बल 15000 तरुणांना रोजगार देण्याची तयारी अलिबाबा कंपनीनं सुरू केलीय.

कोविड (Covid) आणि त्यादरम्यान झालेल्या नुकसानीचं कारण पुढे करून जगभरात विविध कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्याचा सपाटा लावला. अजूनही कंपन्या टप्प्याटप्प्यात कर्मचाऱ्यांना (Employees) घरी पाठवत आहेत. मागच्या 6 महिन्यांचा विचार केला, तर विविध क्षेत्रात आणि विशेषत: आयटी (IT)  क्षेत्रातल्या लाखो तरुणांच्या आणि अनुभवी कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या गेल्या. अशा या मंदीच्या काळात अलिबाबा कंपनीनं मोठा दिलासाच दिलाय. चीनी ई-कॉमर्स (E-Commerce) वेबसाइट अलिबाबा हजारो लोकांना नोकऱ्या देण्याचं नियोजन करत आहे. अलिबाबानं 15 हजार लोकांना नोकऱ्या देण्याची घोषणा केली.

मुख्य 6 विभागांसाठी भरती

विबोनं (Weibo) या संदर्भात रिपोर्ट दिलाय. या रिपोर्टनुसार, चीनी ई-कॉमर्स वेबसाइट अलिबाबानं आपल्या 6 मुख्य व्यवसाय विभागांसाठी 15000 लोकांची भरती करेल. कॉलेजमधून नुकतंच पदवी शिक्षण पूर्ण केलेल्या पदवीधरांसाठी ही एक चांगली संधी असणार आहे. कंपनी फ्रेश ग्रॅज्युएट्समधून 3 हजार लोकांची भरती करणार आहे. एनडीटीव्ही प्रॉफिटनं हे वृत्त दिलंय.

पदवीधरांसाठी विशेष संधी

अलिबाबा आपल्या 6 प्रमुख व्यवसाय विभागांसाठी 15000 लोकांची भरती करेल. कंपनीने सांगितले की या काळात कॉलेजच्या नवीन पदवीधरांसाठी ही एक विशेष संधी असेल. कारण कंपनी फ्रेश ग्रॅज्युएट्समधून 3 हजार लोकांची भरती करणार आहे. तर कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्याविषयीही कंपनीनं स्पष्टीकरण दिलंय. अशा प्रकारच्या बातम्या म्हणजे अफवा असल्याचं कंपनीनं म्हटलंय.

हजारो कर्मचाऱ्यांना पुन्हा बाहेरचा रस्ता

ई-कॉमर्स वेबसाइट अलिबाबा कर्मचाऱ्यांची भरती करणार असलं तरी हजारो कर्मचाऱ्यांना कामावर घेण्यापूर्वी अनेकांना बाहेरचा रस्ता कंपनीनं दाखवलाय. नुकतीच कंपनीनं कर्मचारी कपात केली होती. या चीनी कंपनीनं हजारो कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याचा निर्णय घेतलाय. मीडिया रिपोर्ट्सनुसार, कंपनीला आपल्या एकूण कर्मचार्‍यांपैकी 7 टक्के कर्मचारी कमी करायचे आहेत. रिस्ट्रक्चरिंग पॉलिसीच्या अंतर्गत कंपनीनं हा निर्णय घेतलाय. दुसरीकडे, जागतिक मंदीचंही कारण कंपनी देत आहे. कर्मचारी कपातीच्या या निर्णयाला कंपनीनं सामान्य प्रक्रिया म्हटलंय. तसंच लवकरच हजारो नोकऱ्या देणार असल्याचं घोषित केलंय.

कर्मचारी कपातीचा सपाटा

जागतिक मंदीची झळ सर्वसामान्य कर्मचाऱ्यांना बसत आहे. दररोज कुठे ना कुठे कर्मचाऱ्यांची कपात सुरू असल्याचं दिसून येतंय. जागतिक स्तरावर अ‍ॅमेझॉन, गुगल, मेटा म्हणजेच फेसबुक, अ‍ॅसेंचर, डेल यासह विविध कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांना घरचा रस्ता दाखवत आहेत. यात भारतीयांची संख्याही मोठी आहे. तर भारताचा विचार केल्यास आपल्याकडेही मोठी कर्मचारी कपात सुरू आहे. नुकतीच जिओ मार्टनं 1 हजार कर्मचाऱ्यांची कपात केली. अजून यात भर पडणार असल्याचे संकेतही कंपनीनं आधीच दिले आहेत. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये धास्ती आहे.

संकटकाळात काही कंपन्यांकडून दिलासा

कर्मचारी काढून टाकण्याच्या या प्रक्रियेत खरं तर कंपनीचं नुकसान हे कारण दिलं जातं. मात्र कर्मचाऱ्यांचं होणारं नुकसान कोणतीही कंपनी ग्राह्य धरत नाही. नोकरी गेल्यामुळे पुढच्या संधी मिळवताना कर्मचाऱ्याची होणारी दमछाक, पगारात करावी लागणारी तडजोड अशा कितीतरी बाबी निर्माण होत आहेत. यात काही कंपन्यांनी आदर्श घालून दिलाय. फ्लिपकार्टनं आपण कोणत्याही कर्मचाऱ्याला काढणार नसल्याचं म्हटलंय. सव्वा लाखांहून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार असल्यातं टाटा ग्रुपच्या टीसीएस कंपनीनं नुकतंच म्हटलंय. शिवाय अ‍ॅपलनंदेखील आपण कोणतीही कर्मचारी कपात करणार नसल्याचं सांगितलंय.