Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Alibaba : बाजारपेठेत वर्चस्व मिळवण्यासाठी अलिबाबाचं 'या' सहा व्यवसायात विभाजन

Alibaba : बाजारपेठेत वर्चस्व मिळवण्यासाठी अलिबाबाचं 'या' सहा व्यवसायात विभाजन

Alibaba Group : बहुराष्ट्रीय तंत्रज्ञान कंपनी असलेली अलिबाबा आपल्या सर्वांना माहीत आहेत. चीनमध्ये (China) स्थापन झालेल्या या कंपनीचा विस्तार आता जगभर झालाय. ई-कॉमर्स, तंत्रज्ञान एवढ्यापुरतं या कंपनीचं अस्तित्व नाही, तर विविध व्यवसायात उडी घेऊन त्यात यशही मिळवलंय. अलिकडेच या कंपनीचं विभाजन झालंय. सहा वेगवेगळ्या व्यवसायात हे विभाजन झालंय.

28 जून 1999ला अलिबाबा ग्रुपची स्थापना जॅक मा यांनी केली. ई-कॉमर्स, रिटेल, इंटरनेट आणि तंत्रज्ञान अशा विविध व्यवसायात ही कंपनी कार्यरत आहे. हँगझोउ, झेजियांग इथं स्थापन झालेल्या कंपनी आपल्या वेब पोर्टलद्वारे व्यावसायिक, ग्राहकांना विविध सेवा प्रदान करते. ग्राहक ते ग्राहक, व्यवसाय ते ग्राहक आणि व्यवसाय ते व्यवसाय अशी ही सेवा आहे. अलिकडेच या कंपनीचं सहा व्यवसाय विभागात विभाजन झालं. बाजारपेठेतल्या बदलांना प्रतिसाद देणं आणि संबंधित विभागाच्या यूनिट्सचं मूल्य वाढवणं हा त्यामागचा उद्देश आहे. पाहुया हे सहा व्यवसाय...

ई-कॉमर्स

सध्याच्या घडीला विविध ई-कॉमर्स कंपन्या अस्तित्वात आहेत. मात्र या सर्वांमध्ये अलिबाबानं आपला दबदबा कायम ठेवला. Alibaba.com या संकेतस्थळाचा वापर जगभरातले व्यापारी करत असतात. या माध्यमातून ते आपल्या मालाची देशांतर्गत तसंच आंतरराष्ट्रीय स्तरावर विक्री करतात. 200हून जास्त देश आणि प्रदेशांमध्ये 10 दशलक्षाहून अधिक सक्रिय खरेदीदारांपर्यंत ही कंपनी पोहोचलीय. तर 190पेक्षा जास्त देशांतल्या 40 दशलक्षांहून अधिक खरेदीदारांनी आपल्या व्यवसायाच्या संधी मिळवल्या त्याचबरोबर आपले व्यवहार पूर्ण केलेत. ही आकडेवारी 31 मार्च 2022 या आर्थिक वर्षातली आहेत. अमेरिका, ब्राझील, फ्रान्स यासोबतच इतर देशांमध्ये ई-कॉमर्स क्षेत्रात कंपनी कार्यरत आहे.

क्लाउड

अलिबाबा क्लाउड (Alibaba Cloud) ही सेवा या माध्यमातून दिली जाते. याचा विस्तार 200हून अधिक देश आणि प्रदेशांमध्ये झाला आहे. हजारो व्यवसाय, विकासक आणि सरकारी संस्थांना क्लाउड कॉम्प्युटिंग यासह इतर डेटा-प्रोसेसिंग सेवा या माध्यमातून प्रदान केली जाते. कंपनीच्या क्लाउड विभागाच्या आकडेवारीनुसार, चीन आणि संपूर्ण आशियामध्ये सर्वात मोठा बाजारात त्याचा हिस्सा आहे. कंपनीनं इतर क्लाउड व्यवसायामधून विभाजन केलंय. या ग्रुपचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॅनियल झांग हे आता अलिबाबा क्लाउड इंटेलिजन्स विभागाचे प्रमुख असतील. आर्टिफिशियल इंटेलिजन्स या प्रकारात सध्या मोठा वाव आहे. त्याची जबाबदारी त्यांच्याकडे आहे. डिंगटॉक (DingTalk) हे डिजिटल वर्कप्लेस आणि अॅप्लिकेशन डेव्हलपमेंट प्लॅटफॉर्म या माध्यमातून व्यवसाय वाढीसाठी समन्वय साधला जातो.

वाणिज्य - डिजीटल प्लॅटफॉर्म, किराणा

ताओबाओ (Taobao) ही चीममधली ऑनलाइन शॉपिंग वेबसाइट आहे. या माध्यमातून व्यापारी एकमेकांशी संवाद साधतात. शॉर्ट-फॉर्म व्हिडिओची सुविधाही यात आहे. 2003मध्ये ही सेवा सुरू झाली. या प्लॅटफॉर्मवर प्रामुख्यानं लहान व्यापारी आहेत. मागील आर्थिक वर्षाचा विचार केल्यास 31 मार्च 2022 रोजी संपलेल्या आर्थिक वर्षात या प्लॅटफॉर्मचं मूल्य चीनमध्ये किरकोळ बाजारात सर्वात जास्त होतं. टीमॉल (Tmall) या माध्यमातून ग्राहकांना उच्च दर्जाची उत्पादने पुरवली जातात. Freshippo ही एक किरकोळ किराणा मालाची साखळी आहे. तर आयडल फिश, जुन्या वस्तू खरेदी-विक्री तसंच ग्राहक ते ग्राहक बाजारपेठ उपलब्ध करून दिली जाते.

लॉजिस्टिक्स

लॉजिस्टिक हा विभाग वेगळा करण्यात आला आहे. कैनियाओ (Cainiao) ही अलीबाबाची लॉजिस्टिकची शाखा आहे. देशभरात (चीन) 24 तासांच्या आत तसंच जगभरात कुठेही 72 तासांच्या आत ग्राहकांना त्यांनी केलेल्या ऑर्डर्स वेळेत उपलब्ध करून दिल्या जातात. त्यासाठी नेटवर्क मजबूत करण्याचा कंपनीचा प्रयत्न आहे. मागच्या वर्षापर्यंत, कंपनीतर्फे विदेशात म्हणजे चीनच्या बाहेर नऊ सेंटर्स चालवली जात होती. यासाठी 500हून अधिक लॉजिस्टिक कंपन्यांशी भागीदारी कंपनीनं केली होती.

स्थानिक सेवा

फूड डिलिव्हरी, किराणा, फुले यासह ग्राहकांना विविध गृहोपयोगी वस्तूंची गरज पडते. त्यांची ही गरज पूर्ण करण्यासाठी कंपनी एक मोबाइल अॅप चालवते. एमॅप (Amap) या माध्यमातून नेव्हिगेशन, रिअल टाइम ट्रॅफिक यासंबंधीची माहिती यूझरला दिली जाते.

डिजिटल मीडिया आणि मनोरंजन

मनोरंजन क्षेत्रात यूकू हे अलिबाबाचं डिजीटल मीडिया प्लॅटफॉर्म आहे. चीनमधले लाँग-फॉर्म व्हिडिओ या प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहेत. हे व्हिडिओ पाहणं, सर्च करणं आणि शेअर असे पर्याय यूझर्सला मिळतात. लिंगशी (Lingxi) या प्लॅटफॉर्मवर मोबाइल गेम्स उपलब्ध आहेत. तर पिक्चर्स सामग्रीची निर्मिती आणि वितरण, लायसन्स आणि व्यावसायिक व्यवस्थापन त्याचबरोबर सिनेमा तिकीट यासाठीही प्लॅटफॉर्म उपलब्ध आहेत.

इतर

दामो (DAMO) अकादमी हा अलीबाबाचा अत्याधुनिक तंत्रज्ञान विकसित करणारा जागतिक संशोधन कार्यक्रम आहे. विज्ञान आणि उद्योग यांच्यातली ज्ञानाची देवाणघेवाण एकत्र करणं आणि गतिमान करणं हा याचा उद्देश आहे. यासह स्मार्ट स्पीकर, लाइट्स, रिमोट कंट्रोल यासह विविध अप्लायन्सेस विकते.